निर्णयाच्या मागची अदृश्य गणितं!

आयुष्याच्या एखाद्या वळणावर थांबलात, तेव्हा फक्त “योग्य काय?” असं विचारू नका. तर स्वतःला विचारा, ही निवड मला माझ्याजवळ नेतेय की माझ्यापासून दूर?

Story: मनी मानसी |
30th January, 10:21 pm
निर्णयाच्या मागची अदृश्य गणितं!

अापण आयुष्यात दररोज निवडी करत असतो. काही अगदी किरकोळ, तर काही आयुष्याची दिशा बदलणारे. कधी चुकल्यासारखं वाटतं, कधी उशिरा का होईना पण “हेच बरोबर होतं” असं मन म्हणतं. मग प्रश्न असा पडतो, आपण निवड करताना नेमकं काय मोजतो? फक्त परिस्थिती? की स्वतःलाही? निवड म्हणजे फक्त “हो” किंवा “नाही” नव्हे तर ती आपल्या मनात चाललेल्या एका अदृश्य चर्चेचा देखील निकाल असते. पण ही चर्चा नेमकी कशावर आधारलेली असते? चला, निवडींचे काही मापदंड थोडे स्पष्टपणे पाहूया.

१. फायदा तोटा : डोक्याचं गणित

हा पहिला आणि सर्वात ओळखीचा, बहुतेक वेळा लाॅजिकल असणारा मापदंड. ह्यात पगार, सुरक्षितता, वेळ, समाजमान्यता सगळं मोजलं जातं. यातून काय मिळेल? काय गमवावं लागेल? पैसा, वेळ, सुरक्षितता, स्थैर्य, डोकं लगेच आकडेमोड करायला लागतं. उदाहरणार्थ, नोकरी सुरक्षित आहे, पगार चांगला आहे, पण रोज सकाळी कामावर जावसं वाटत नाही. नोकरी आवडतच नाही. उठताना अंगावर ओझं येतं. सगळं सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या योग्य असूनही समाधान नाही. मन शांत राहत नाही. त्यामुळे प्रश्न असा नाही की आपलं लाॅजिक अर्थात तर्क चुकतोय का तर मुळात फक्त तर्क पुरेसा आहे का हे विचारणं गरजेचे होय. 

२. भावना आणि अंतःप्रेरणा : मनाचा आवाज

“हे बरोबर वाटत नाहीये”

“हे केल्यावर हलकं वाटेल”

बहुतेकवेळा हा आपला आतला आवाज खूप सूक्ष्म असतो, पण प्रामाणिक असतो. उदाहरणार्थ, आपल्याला कधीतरी एखाद्यं नातं टिकवता येईल, सगळं निभावून नेता येईल असं वाटतं खरं, परंतू तरीही मनात सतत अस्वस्थता जाणवत राहते. बाहेरून सगळं ठीक, पण काहीतरी गुदमरल्यासारखं वाटतं. त्यामुळे इथे लक्षात घेण्यायोग्य गोष्ट ही की आपल्या भावना भले नेहमी अचूक नसतात, पण त्या पूर्णतः दुर्लक्षित केल्या तर आपले निर्णय मात्र कोरडे होण्याची शक्यता असते.

३. भीती की मूल्यं : हा फार महत्त्वाचा मापदंड आहे.

मी ही निवड लोक काय म्हणतील या भीतीतून घेतोय?अपयश टाळण्यासाठी घेतोय? की माझ्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्यासाठी? उदाहरणार्थ, “नाही” म्हणायचं आहे, पण नातं बिघडेल या भीतीने “हो” म्हणणं. ह्याने होतं काय? क्षणभर शांतता मिळते, पण मनात राग साठून राहतो. लोक काय म्हणतील, नकार मिळाला तर, एकटा पडलो तर? ह्याने मन अगदी व्याकूळ होवून जातं. त्यामुळे भीतीतून केलेली निवड आधी सुरक्षित वाटते, परंतू मूल्यांतून केलेली निवड मानसिक दृष्ट्या माणसाला मुक्त करते.

४. भूतकाळाचे अनुभव : जुन्या जखमांची सावली

एकदा फसवणूक झाली असेल, तर पुन्हा विश्वास ठेवताना मन धजावत नाही किंवा एकदा अपयश आलं असेल, तर कुठलीही नवीन संधी कायम धोकादायकच वाटू शकते. ह्यात “मागे असंच झालं होतं” ही ओळ अनेक निर्णय ठरवते. भुतकाळातील अपयश, फसवणूक, नाकारले जाण्याचा अनुभव हे सगळं नकळत आपल्या वर्तमानाच्या निर्णयात डोकावत असतात.

५. जबाबदारी घेण्याची तयारी : परिपक्वतेची कसोटी

ही निवड चुकली तर मी तिची जबाबदारी घेऊ शकतो का? कोणाला दोष न देता “ही माझी निवड होती” असं म्हणू शकतो का? जिथे हे स्वीकारण्याची तयारी असते, तिथेच निर्णय प्रगल्भरित्या घेण्यात येतो, आणि तो परफेक्ट नसला तरी प्रामाणिक असतो. 

त्यामुळे थोडा थांबा, स्वतःला विचारा :

  मी ही निवड कोणाला खुश ठेवण्यासाठी करतोय?

  ️डोकं “हो” म्हणतंय, पण मन काय म्हणतंय?

  ️ही निवड भीती कमी करतेय की स्वतःचा सन्मान वाढवतेय?

  ️चूक झाली तर मी स्वतःसोबत उभा राहीन का?

निवड करताना उपयोगी पडतील असे छोटे उपाय :

  ️निर्णय लगेच घेऊ नका, थोडा pause घ्या.

  ️कागदावर ‘डोक्याचं मत (तर्क)’ आणि ‘मनाचं मत’ (भावना) वेगळं लिहा.

  ️भीती आणि मूल्य यांत फरक ओळखायचा सराव करा.

  ️‘परफेक्ट’ नव्हे, ‘प्रामाणिक’ निवड करा. 

  ️निवडीनंतर स्वतःला दोष देऊ नका, शिका. 

योग्य निवड म्हणजे नेहमी धाडसी किंवा परिपूर्ण निर्णय नसतो. कधी कधी ती फक्त एवढीच असते, की ज्या निवडीनंतर स्वतःकडे पाहताना नजर खाली जात नाही, आणि मनात एक स्थैर्य निर्माण होते. आणि कदाचित तीच निवड आपल्या मापात बसलेली असते. त्यामुळे, पुढच्या वेळी जर आयुष्याच्या एखाद्या वळणावर थांबलात, तेव्हा फक्त “योग्य काय?” असं विचारू नका. तर स्वतःला विचारा, ही निवड मला माझ्याजवळ नेतेय की माझ्यापासून दूर?

उत्तर लगेच मिळालं नाही, तरी हरकत नाही.

कारण योग्य प्रश्न विचारणं हेच अनेकदा योग्य निवडीचं पहिलं पाऊल असतं.


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४