बाळाच्या जन्मानंतरचा दुसरा आठवडा हा नव्या सवयींचा आणि महत्त्वाच्या बदलांचा असतो. या काळात नाळेची निगा, आहार आणि आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याची सविस्तर माहिती

नवजात बाळाच्या आयुष्यातील दुसरा आठवडा हा बाळ आणि पालक दोघांसाठीही जुळवून घेण्याचा काळ असतो. पहिल्या आठवड्याचा ताण कमी झालेला असतो, पण या आठवड्यात काही नवीन शंका आणि निरीक्षणे समोर येतात. या काळात बाळाच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.
नाळ (Umbilical Cord) काळजी
बहुतेक बाळांमध्ये नाळ दुसऱ्या आठवड्यात सुकून गळून पडते. नाळेचा भाग कोरडा आणि स्वच्छ ठेवा. त्यावर कोणतेही तेल, पावडर किंवा घरगुती उपाय लावू नका. नाळेभोवती लालसरपणा, पू, दुर्गंधी किंवा रक्तस्राव दिसल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा. ही नाळेची इन्फेक्शनची लक्षणे असू शकतात.
डोळ्यांची काळजी
दुसऱ्या आठवड्यात काही बाळांच्या डोळ्यांत पाणी येणे किंवा चिकट स्राव दिसू शकतो. स्वच्छ कापसाने आणि उकळून थंड केलेल्या पाण्याने आतील बाजूपासून बाहेरच्या बाजूकडे हलक्या हाताने पुसावे. डोळे लाल होणे, पिवळा स्राव किंवा सूज आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लघवी आणि शौच (Potty–Urine Pattern)
दुसऱ्या आठवड्यात बाळाने साधारण ६–८ वेळा लघवी करणे अपेक्षित असते. आईचे दूध पिणाऱ्या बाळांमध्ये शौच दिवसातून अनेक वेळा किंवा कधी 1–5 दिवसांनी एकदाच होऊ शकते. लघवी कमी होणे, शौचेत रक्त दिसणे किंवा खूप कडक शौच ही चिंतेची लक्षणे आहेत.
स्तनपानातील अडचणी
या आठवड्यात अनेक मातांना स्तन दुखणे, सूज येणे, दूध कमी असल्याची शंका येते. योग्य पकड (latch) महत्त्वाची आहे. दिवसातून ८–१२ वेळा स्तनपान होणे सामान्य आहे. सतत वेदना, निप्पलवर जखमा किंवा बाळ पोटभर दूध न पिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काविळ (Jaundice)
दुसऱ्या आठवड्यापर्यंत सौम्य काविळ असू शकते. मात्र डोळे व त्वचा खूप पिवळी दिसणे, दूध कमी पिणे, खूप झोपाळूपणा दिसल्यास तपासणी आवश्यक आहे.
बाळाची हालचाल आणि जागरूकता
बाळ सक्रिय असणे, दूध पिण्यासाठी जागे होणे, हात-पाय हलवणे अपेक्षित असते. हालचाल कमी होणे, दूध न पिणे, रडण्याचा आवाज कमजोर होणे ही धोक्याची लक्षणे आहेत.
वजन वाढ
बहुतेक बाळे १०–१४ दिवसांत जन्माचे वजन परत मिळवतात. वजन वाढत असल्यास बाळाची वाढ योग्य आहे असे समजावे.
शंका असल्यास थांबू नका. वेळीच डॉक्टरांना भेटणे हेच बाळाच्या सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम आहे.

- डॉ. पूनम संभाजी
बालरोगतज्ज्ञ