आमचे तेंडुलकर सर : मायेचा आधार!

शिक्षण पूर्ण करून आज १६ वर्षे झाली, तरी सरांना माझे प्रत्येक गुण आठवत होते. त्यांनी माझ्या पतीला सांगितले की, "सोनी काय बरें वाचताले. बरें भुरगें." हे ऐकून खूप समाधान वाटलं.

Story: लेखणी |
30th January, 10:10 pm
आमचे तेंडुलकर सर :   मायेचा आधार!

सोनी कशे आसा गो? खूब दिसांनी दिसले मुगो." काही दिवसांपूर्वी मी मामाच्या गावी जत्रेला गेले होते. देवळात पालखी निघण्याची वेळ झाली असल्याने खूप गर्दी होती. पालखी बाहेर येताच गर्दी थोडी ओसरली आणि एक ओळखीचा चेहरा दिसला - तेंडुलकर सर म्हणजेच संजय तेंडुलकर! त्यांना कधीही पाहिले तरी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असतेच. त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की, आयुष्यात हसत कसं जगावं हे त्यांच्याकडूनच शिकावं.

सरांना मी दोन वर्षांनंतर भेटले होते. त्यांनी माझी सर्व चौकशी केली. सरांचा एक ठरलेला संवाद, "कुठे आहेस हल्ली सोनी? नाच मगो तू.(हल्ली दिसलीच नाहीस ना गं तू)" खरंच, किती माया आहे या एका वाक्यात! माझ्या मुलीला आशीर्वाद म्हणून त्यांनी पैसे दिले. तिला जवळ घेऊन त्यांनी मारलेल्या गप्पा पाहून मनात विचार आला की, हे सगळं सरांना किती सहज जमतं!

'श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालया'तून शिक्षण पूर्ण करून आज १६ वर्षे झाली, तरी सरांना माझे प्रत्येक गुण आठवत होते. त्यांनी माझ्या पतीला सांगितले की, "सोनी काय बरें वाचताले. बरें भुरगें." हे ऐकून खूप समाधान वाटलं. एरवी मोठ्या शाळांमध्ये आपण हरवून जातो, तिथे कोणी विचारणारं नसतं. चार दिवस शाळेत नाही गेलो तरी रजेचा अर्ज दिला की विषय संपतो; कोणी चौकशी करत नाही. पण सर तसे नव्हते, ते नेहमीच आपुलकी दाखवायचे.

खरं सांगायचं तर पहिली ते पदवीपर्यंत मला कोणत्याच शिक्षकांचे तास आठवत नाहीत, पण तेंडुलकर सरांचा प्रत्येक तास आजही जसाच्या तसा आठवतो. एखादा कंटाळवाणा धडा वाचता वाचता सर म्हणायचे, "किदे बरयला  गो? हे वाचूक सुद्धा बेजार" तेव्हा आम्ही म्हणायचो, "सर आम्ही हा धडा परीक्षेला सोडणार आहोत, तुम्ही शिकवू नका." आणि सर मनापासून हसायचे.

कधी कधी आम्ही त्यांचे लेक्चर 'बंक' करून दुसऱ्या खोलीत लपायचो आणि ते आम्हाला शोधत फिरायचे. मला खिडकीतून पाहून "सोनी, तुम्ही तरी या गं" असे ते प्रेमाने म्हणायचे आणि आम्ही जोरात हसायचो. "स्पर्धा आसा कविता बरय. प्रयत्न कर." अशा त्यांच्या आग्रहामुळे मी माझी पहिली कविता 'माय म्हजी मायेची' लिहिली. त्या कवितेला मिळालेले पहिले पारितोषिक आणि त्यानंतर मिळालेली सर्व बक्षिसे मी सरांनाच अर्पण करते. सरांनी वर्गात वाचन स्पर्धा घेणे, बक्षीस म्हणून पुस्तके देणे, हे सर्व आजही डोळ्यांसमोर उभे राहते. माझ्या लग्नाला पोहोचता येणार नाही म्हणून त्यांनी सकाळीच येऊन दिलेली भेट आणि शुभेच्छा आजही आठवणीत कैद आहेत.

मला एक किस्सा आठवतो - जेव्हा सरांच्या घरी सत्तरीला कवी संमेलन होते, तेव्हा मी पहिल्यांदाच मॅडमना (सरांच्या पत्नीला) भेटले होते. मॅडम म्हणाल्या होत्या, "अगं, सोनी म्हणजे तूच का? सर नेहमी सोनी-सोनी म्हणून तुझ्याबद्दल सांगत असतात." ते ऐकून खूप छान वाटले होते.

काल-परवाच एका मैत्रिणीशी बोलणे झाले. ती म्हणाली, "कॉलेजमध्ये चारित्र्य प्रमाणपत्र (Character Certificate) आणायला गेले होते, तेव्हा तेंडुलकर सर खूप छान बोलले, खूप बरं वाटलं." मी तिला म्हणाले, "हो गं, तिथे गेल्यावर असं वाटतं की कोणीतरी आपलं माणूस तिथे आहे." शांतादुर्गा विद्यालय एवढे मोठे असूनही तिथे कोणत्याही विद्यार्थ्याला 'हरवून' जाऊ दिले जात नाही. सरांच्या याच गुणामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हृदयात तेंडुलकर सर नेहमीच अढळ राहतील.


- सोनिया परब