आलमारी मनाची

​आम्ही स्त्रिया स्वभावतः हळव्या असतो, त्यामुळे भावना जपण्याचा प्रयत्न करतो. त्या वस्तूंमागच्या भावना आम्हाला महत्त्वाच्या वाटतात. त्या वस्तू पाहिल्या की त्याशी निगडित आठवणी जाग्या होतात. म्हणून काही काढून टाकणे किंवा कुणाला देऊन टाकणे जीवावर येते.

Story: ललित |
30th January, 10:14 pm
आलमारी  मनाची

हळदीकुंकवाच्या निमित्ताने कपाटाची आवराआवर करत होते, तेव्हा मनात आले की हे कपाट म्हणजे आलमारी आणि आपले मन यात किती साधर्म्य आहे! मनालाही कपाटासारखे अनेक कप्पे असतात, ज्यात आपण आपल्या आठवणी साठवून ठेवतो. अगदी एक छुपा चोरकप्पा सुद्धा असतो त्यात; कुणालाही सांगता न येण्यासारख्या आठवणी, काही किस्से आणि अनुभव आपण तिथे लपवून ठेवलेले असतात. ते कुणी पाहू नये, कुणालाही कळू नये, अशी तजवीज असते. पण कपाटासारखी आपण आपल्या मनाची कवाडे हवी तेव्हा उघड-बंद करू शकतो का? कपाट बंद केले की विषय संपला, असे आपल्या मनाच्या बाबतीत होत नाही.

​कपाटात आपण कपडे, दागिने आणि वस्तू ठेवतो; तर मनात आठवणी, भावना, सुख-दुःखाचे प्रसंग, अनुभव आणि विचार साठवून ठेवतो. कपाटात आधीच सामानाची पुरेशी गर्दी असतानाही आपण नवनवीन खरेदी करतच असतो, त्याचीही भर पडत जाते. नवीन सामान कोंबत जातो आणि मग एक वेळ अशी येते की कपाटाची दारे लागता लागत नाहीत. खूप पसारा होतो, अस्वच्छता वाढते. मग आपल्याला जाणीव होते की, यातले जुने, सध्या वापरात नसलेले किंवा जास्तीचे सामान काढून टाकले पाहिजे. थोडी जागा रिकामी करण्यासाठी कपाटाची आवराआवर करायला पाहिजे; तसेच मनाचेही होते.

​नको इतक्या विचारांच्या गोंधळामुळे, नकारात्मकतेमुळे आणि गैरसमजांमुळे मन गच्च भरून जाते. अस्वस्थता वाटू लागते. तेच नीटनेटके कपाट आवरून ठेवले की हवी ती वस्तू शोधणे सोपे पडते; तसेच मनात सकारात्मक विचार असतील, तर निर्णय घेणे सोपे जाते. विचारांची गर्दी होत नाही, ठोसपणे निर्णय घेता येतात. विचारांची स्पष्टता नवा मार्ग दाखवते.

​कपाटात ठेवलेल्या वस्तू, कपडे, दागिने आणि अनमोल गोष्टी आपण अनेक वर्षांपासून जपून ठेवलेल्या असतात. पण कधीकधी जुन्या गोष्टी कालबाह्य होतात, मग त्यांची अडचण वाटू लागते. तसेच मनातले जुने विचार सध्याच्या परिस्थितीत कालबाह्य ठरलेले असतात, ते काढून टाकता आले पाहिजेत. त्यांना किती वर्षे चिकटून राहायचे, हे ठरवता आले पाहिजे. जशी कपाटाला जुन्या गोष्टींची अडचण होते, तशीच मनाला जुन्या समजुतींची, गैरसमजांची आणि एखाद्याविषयी धरून ठेवलेल्या आढीची अडचण होते.

​आलमारी म्हणजे एक निर्जीव फर्निचर, पण त्यात ठेवलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे आठवणींची ठेव असते. ही 'काळी चंद्रकळा' आणि 'कोल्हापुरी साज' सासूबाईंनी पहिल्या संक्रांतीला दिलेला; ही 'पैठणी' आणि 'तन्मणी' लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला आईने दिलेली भेट; ही 'नायटी' हनिमूनची आठवण, तर ही 'सिल्क साडी' बंगळूरहून मुलाने आणलेली... मग हळूहळू त्याचा वापर कमी झाला की मी ती सुनेला देईन, मुलीला देईन किंवा नातीच्या लग्नासाठी साठवून ठेवेन; अशा विचारांनी आणि आठवणींनी कपाट व मन गच्च भरून राहते. कपाटाचे दार लागेनासे होते आणि गोंधळ वाढतो. मग हवी ती गोष्ट पटकन सापडत नाही आणि चिडचिड होते. तसेच आपल्या मनाचे असते. कधीकधी उगाच इतके विचार गर्दी करतात की आता डोके फुटते की काय, असे वाटू लागते. आपण दुर्लक्ष केल्यामुळे मनात साठलेले नको ते विचार आपल्याला त्रास देत असतात. म्हणून मनातला कडवटपणा, कटुता, दुःख आणि गैरसमज काढून टाकले की, तिथे शांती, प्रेम आणि आनंदाला जागा मिळते.

​कपाट जसे आपले सामान जपते, तसे मन आपले विचार, भावना आणि नाती जपते. दोन्हीही आपल्याला साठवण्याची कला शिकवतात, पण त्याचबरोबर नको ते काढून टाकण्याची गरज असते, हेही पटवून देतात. पसाऱ्याचा निपटारा होणे गरजेचे आहे, हे त्यातून समजते.

​आम्ही स्त्रिया स्वभावतः हळव्या असतो, त्यामुळे भावना जपण्याचा प्रयत्न करतो. त्या वस्तूंमागच्या भावना आम्हाला महत्त्वाच्या वाटतात. त्या वस्तू पाहिल्या की त्याशी निगडित आठवणी जाग्या होतात. म्हणून काही काढून टाकणे किंवा कुणाला देऊन टाकणे जीवावर येते. कारण काही नाती आठवणींवर जतन केलेली असतात; ती वस्तू देऊन टाकणे म्हणजे आठवणी पुसून टाकण्यासारखे वाटते. पण त्याच वेळी काही नाती नव्याने फुललेली असतात, त्यांचाही स्वीकार करायचा असतो. या ओढाताणीत मनाची दमछाक होते. म्हणूनच, दुःखदायक आणि क्लेश देणाऱ्या आठवणींची ठेव वेळीच मनातून 'डिलीट' केली पाहिजे, जेणेकरून मनाच्या आलमारीचे सौंदर्य टिकून राहील. आलमारीवरच्या आरशाची स्वच्छता केल्यावर जसे आपले प्रतिबिंब स्पष्ट आणि सुंदर दिसते, तसेच संपूर्ण आलमारीचे सौंदर्य टिकवण्यासाठी तिचे वेळोवेळी 'सर्व्हिसिंग' होणे गरजेचे आहे.


- प्रतिभा कारंजकर 

फोंडा