जवळजवळ चाळीस वर्षे त्यांनी आपले काम चोख बजावले. ते चाळीत राहत नव्हते, तरीही ते 'चाळकरी' झाले होते. कालांतराने पिढी बदलली, तंत्रज्ञान आले आणि बँकिंग व्यवहार सुरू झाले. नवीन मालकांनी चेकने भाडे भरण्याचा फतवा काढला. आता जयरामजींची गरज उरली नव्हती.

आमच्या गिरगावातील चाळी म्हणजे जणू 'मिनी भारत'च! वेगवेगळ्या प्रांतांचे, जातीधर्माचे लोक भांडत-तंटत गुण्यागोविंदाने राहतात, तीच खरी मुंबईची चाळ संस्कृती. अर्थात, या संस्कृतीत होणारी भांडणे ही पाण्याचे नळ किंवा गॅलरीत कपडे वाळत घालण्यावरून अशा मर्यादित स्वरूपाची असत. पण ती तेवढ्यापुरतीच. संध्याकाळी नाक्यावरच्या इराण्याच्या हॉटेलात एक चहा दोघात संपवला की त्या दिवसपुरते वाद 'फिनिश'. मग दुसऱ्या दिवशी नवीन काहीतरी. खूप मजा यायची, दिवस कसा जायचा ते समजायचे नाही.
जुन्या चाळींचे बांधकाम मजबूत असे. त्या काळात चाळी देवादिकांच्या नावावरून किंवा मालकाच्या आडनावावरून ओळखल्या जात. चाळीच्या मालकाला कित्येक भाडेकरूंनी कधीच पाहिलेले नसे. तो कुठे राहतो, काय करतो, याच्याशी कोणालाही देणे-घेणे नसे. भाडेवसुलीसाठी किंवा इतर कामांसाठी मालकाचा एक विश्वासू माणूस पंधरा दिवसांतून एकदा चक्कर मारत असे. आमची आणि आसपासच्या तीन चाळी एकाच मालकाच्या होत्या. त्यांचा विश्वासू प्रतिनिधी म्हणून एक 'पुरभैया' आमच्याकडे येत असे.
पूर्वी ब्रिटिश काळात उत्तर हिंदुस्थानातील काही विशिष्ट समाजातील लोक पोटापाण्यासाठी मुंबईत आले. ते रखवालदार किंवा अंगरक्षक म्हणून काम करीत. ती फार विश्वासू जमात होती. आज 'पुरभैया' हा शब्द विस्मृतीत गेला असला, तरी ऐंशीच्या दशकात तो प्रचलित होता. आमच्याकडे मालकाचे प्रतिनिधी म्हणून येणारे जयरामजी हे त्यांपैकीच एक. उंच, गोरेपान, डोक्यावर बारीक केस, गाठ मारलेली शेंडी, पांढरा सदरा, दुटांगी धोतर आणि पायात पंपशू (काळ्या रंगाची मोजडी).
जयरामजी रविवारी सकाळी चाळीत येत. भाडेवसुली, नवीन भाडेकरू आणणे आणि चाळीच्या समस्या सोडवणे ही त्यांची कामे. दारात उभे राहून ते मोठ्याने "जय रामजी की" म्हणत. कदाचित याचमुळे त्यांचे नाव 'जयरामजी' पडले असावे. ते आमच्या सासर्यांचे चांगले मित्र होते. त्यांच्या खूप गप्पा रंगत. कितीही जवळीक असली, तरी ते गरजेबाहेर कोणाच्याही घरात प्रवेश करत नसत. लहाकांपासून वृद्धांपर्यंत सर्व स्त्रियांना ते आदराने 'माई' म्हणत. गॅलरीत हिशेबाची वही, टाक आणि शाईची बाटली घेऊन ते बसत. वाराणसीच्या भागातले असल्याने त्यांचे हिंदी अतिशय गोड होते. कोणालाही शिवीगाळ नाही की आवाजात चढ-उतार नाही; पण जे बोलतील ते ठाशीव! त्यांच्या प्रत्येक वाक्यामागे "रामजी की दुआ से" हे पालुपद असेच.
जयरामजी परळ भागात एका छोट्या खोलीत एकटे राहत, तर कुटुंब गावी असे. पूर्णपणे शाकाहारी असलेल्या जयरामजींना वाराणसीचे खूप कौतुक. गंगाघाट आणि तिथली गरम जिलेबी यांचा उल्लेख निघाला की, ते अख्खी वाराणसी आमच्या डोळ्यांसमोर उभी करीत. त्यांच्या तोंडात नेहमी पान असे. ते हनुमानाचे कट्टर भक्त होते.
चाळीत काही नाठाळ भाडेकरूही होते. तळमजल्यावरचा 'छेडा वाणी' नेहमी भाड्यावरून जयरामजींशी वाद घालायचा. एक दिवस छेडाची बडबड ऐकून शांत असणाऱ्या जयरामजींना पहिल्यांदा राग आलेला आम्ही पाहिला. त्यांनी छेडाला एका फटक्यात उचलून खाली आपटले. सर्वांनी मध्यस्थी केल्यावर वाद मिटला, पण जयरामजींनी हिशेब पूर्ण करूनच सोडले.
जयरामजी चाळीतील अंतर्गत गोष्टी कधीच मालकापर्यंत जाऊ देत नसत. ते मालकाशी वफादार असले तरी नेहमी आमच्या बाजूने उभे राहत. ते मालक आणि आमच्यामधील एक 'फिल्टर' होते. जेव्हा काही बिल्डर चाळीचा सौदा करण्यासाठी मालकाकडे गेले, तेव्हा जयरामजींनीच आम्हाला वेळीच सावध करून चाळ वाचवली.
जवळजवळ चाळीस वर्षे त्यांनी आपले काम चोख बजावले. ते चाळीत राहत नव्हते, तरीही ते 'चाळकरी' झाले होते. कालांतराने पिढी बदलली, तंत्रज्ञान आले आणि बँकिंग व्यवहार सुरू झाले. नवीन मालकांनी चेकने भाडे भरण्याचा फतवा काढला. आता जयरामजींची गरज उरली नव्हती. नवीन पिढीने त्यांना कामावरून काढले नाही, उलट विनाकाम पगार सुरू ठेवला; पण स्वाभिमानी जयरामजींना ते मान्य नव्हते. रविवारी दिवसभर चाळीत असूनही कधी कोणाकडे चहाचा घोट न घेणारे जयरामजी फुकटचा पगार कसा घेणार?
मुले कमावती झाल्यावर, टॅक्सी चालक असलेल्या मोठ्या मुलाकडे परळच्या खोलीची चावी देऊन जयरामजी कायमचे गावी निघून गेले. त्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही. परवाच मालकाच्या नातवाने आम्हाला न कळवता बिल्डरची माणसे चाळीच्या सर्वेक्षणासाठी पाठवली होती... बघुया आता पुढे काय होते ते!

- रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.