पाळीदरम्यान होणारे संसर्ग ही गंभीर व चिंताजनक समस्या आहे. योग्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि संसर्ग नियंत्रण उपायांचा अवलंब केल्यास हे संसर्ग मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसह महिला, मुली व पालकांनी आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे.

नेहमीच शाळेत उत्साही असणारी क्षमा काही दिवसांपासून शांत-शांत राहू लागली होती. मासिक पाळीचे दिवस सुरू होते. पॅड वेळेवर न बदलणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे यामुळे तिला जळजळ आणि अस्वस्थता जाणवू लागली होती. पण तिने संकोचामुळे कुणालाच सांगितले नव्हते. शेवटी तिने आपल्या शिक्षिकेशी मन मोकळे केले. शिक्षिकेने तिला प्रेमाने समजावले की मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता राखली नाही, तर संसर्ग होऊ शकतो आणि तो आरोग्यास घातक ठरू शकतो. तसेच मासिक पाळीदरम्यान संसर्ग कसा टाळावा याबद्दल तिला ज्ञात केले..
आपल्याला माहितच आहे की, मासिक पाळी (मेन्स्रुएशन) ही स्त्री प्रजनन संस्थेची नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. या काळात गर्भाशयाचे आतील अस्तर (एंडोमेट्रीयम) रक्तासह शरीराबाहेर टाकले जाते, यामुळे योनीमार्ग अधिक संवेदनशील बनलेला असतो. यादरम्यान रक्तस्राव सुरू असल्याने योनीमार्ग ओलसर असतो आणि गर्भाशयाचे मुख (सर्वीक्स) किंचित उघडे असते. तसेच या काळात हार्मोनल बदल, योनीतील नैसर्गिक जिवाणू संतुलनात होणारे बदल यांमुळे संसर्ग होण्याची शक्यता सामान्य दिवसांपेक्षा अधिक असते. विशेषतः बॅक्टेरियल, फंगल व व्हायरल संसर्ग पाळीदरम्यान उद्भवू शकतात किंवा आधीपासून असलेले संसर्ग तीव्र स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे पाळीदरम्यान संसर्गाची कारणे, त्याची लक्षणे, निदान व प्रतिबंध याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळणे हे प्रत्येक स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
पाळीदरम्यान संसर्ग का होतो?
पाळीच्या रक्तात प्रथिने (प्रोटीन्स), लोह (आय्रन) व इतर पोषक घटक असतात. हे घटक बॅक्टेरिया व फंगल जंतूंच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण करतात.
संसर्ग होण्याची मुख्य कारणे:
जास्त वेळ ओलसरपणा राहणे
अस्वच्छ सॅनिटरी साधनांचा वापर करणे
योनीमार्गातील नैसर्गिक पी.एच. मधे बदल झालेला असणे
रोगप्रतिकारशक्ती कमी असणे
स्वच्छतेच्या चुकीच्या सवयी असणे
पाळीमध्ये होणाऱ्या सामान्य संसर्गाचे प्रकार
योनीमार्गाचा संसर्ग (वजायनल इंफेक्शन / वजायनायटीस)
बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस
कँडिडिआसिस (फंगल इंफेक्शन)
यामधे खाज, जळजळ, पांढरा किंवा दुर्गंधीयुक्त स्त्राव, सूज किंवा वेदना ही लक्षणे दिसतात.
मूत्रमार्गाचा संसर्ग (यु.टी.आय.)
पाळीदरम्यान अस्वच्छता असल्यास जंतू मूत्रमार्गात प्रवेश करतात. लक्षणांमधे लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी होणे, खालच्या पोटात वेदना होणे यांचा समावेश असतो.
गर्भाशय व श्रोणी भागाचा संसर्ग (पी.आय.डी. – पेल्विक इंफ्लेमेटरी डीसीज)
हा संसर्ग गंभीर असून दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास वंध्यत्वाचा धोका वाढतो.
संसर्ग टाळण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक उपाय
योग्य सॅनिटरी साधनांची निवड करणे
सॅनिटरी पॅड: हायजेनिक, सुती आवरण असलेले पॅड वापरावेत. प्लास्टिक जास्त असलेले पॅड घाम वाढवतात.
टॅम्पॉन:४–६ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नयेत. जास्त वेळ ठेवल्यास टॉक्सिक शॉक सिंड्रोम(टी.एस.एस.) होण्याचा धोका असतो.
मेंस्ट्रुअल कप: हे वापरण्यापूर्वी व नंतर उकळून निर्जंतुक करणे आवश्यक असते. योग्य प्रशिक्षणाशिवाय याचा वापर टाळावा.
सॅनिटरी पॅड वेळेवर बदलणे.
४–६ तासांनंतर पॅडमध्ये बॅक्टेरियांची संख्या झपाट्याने वाढते, अमोनिया व दुर्गंधी निर्माण होते, त्वचेची अॅलर्जी व इन्फेक्शन वाढते. म्हणून रक्तस्राव कमी झाला असला तरी पॅड बदलणे आवश्यक.
जननेंद्रियांची योग्य स्वच्छता (जेनायटल हायजीन)
योनीमार्ग ही स्वतः स्वच्छ होणारी रचना आहे.
त्यामुळे फक्त बाह्य भाग (वल्वा) स्वच्छ करावा
योनीमार्ग आतून धुणे (डाऊचींग) टाळावे- यामुळे नैसर्गिक लॅक्टोबॅसीलस बॅक्टेरिया नष्ट होतात. pH बिघडून संसर्ग वाढतो.
हात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व
डब्ल्यु.एच.ओ. नुसार हात स्वच्छ न ठेवल्यामुळे 70% संसर्गाचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी पॅड बदलण्या आधी व नंतर साबणाने हात अनिवार्यपणे धुवावे
योग्य अंतर्वस्त्रांचा वापर
सिंथेटिक कपडे वापरल्याने आतला भाग ओला राहतो. यामुळे त्या भागात बुरशी वाढ होऊ शकते. असे सिंथेटिक कपडे टाळून सूती अंतर्वस्त्रे वापरावीत म्हणजे हवेचा योग्य प्रवाह राहतो
रोज अंतर्वस्त्र बदलावी व उन्हात वाळवावी.
आहार, रोगप्रतिकारशक्ती व संसर्ग:
पाळीदरम्यान शरीराची प्रतिकारशक्ती थोडी कमी होते
उपयुक्त आहार: लोहयुक्त पदार्थ (पालक, डाळी, खजूर), व्हिटॅमिन सी (आवळा, संत्री), प्रोबायोटिक अन्न (दही, ताक)
प्रतिबंध: जास्त साखरयुक्त आहाराने फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. जंक फूड खाल्ल्याने दाह वाढतो.
कोणती लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे?
खालील लक्षणे संसर्गाच्या धोक्याच्या घंटा आहेत:
दुर्गंधीयुक्त किंवा हिरवट स्त्राव
सतत खाज व वेदना
ताप
पाळीबाहेर रक्तस्राव
पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना
सामाजिक मौन व त्याचा आरोग्यावर परिणाम
समाजात पाळीविषयी अज्ञान व लाज असल्याने बहुतांश वेळा संसर्ग लपवला जातो, चुकीच्या सवयी वाढतात व उपचार उशिरा मिळतात. पण वैद्यकीयदृष्ट्या वेळेत उपचार मिळाला तरच भविष्यातील गंभीर आजार टाळले जाऊ शकतात.
एकूणच पाहता, पाळीदरम्यान होणारे संसर्ग ही गंभीर व चिंताजनक समस्या आहे. योग्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि संसर्ग नियंत्रण उपायांचा अवलंब केल्यास हे संसर्ग मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसह महिला, मुली व पालकांनी आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. शांळा-विद्यालयांत याबद्दल जागरूकता आणणे, तसेच घर, नोकरी व इतर प्रत्येक ठिकाणी सुरक्षित व स्वच्छ वातावरण निर्माण करणे हे या समस्येवरचे प्रभावी समाधान ठरू शकते.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर