विद्यार्थ्यांच्या मनातील कोलाहल आणि शिक्षिकेचा संवेदनशील भूमिका मांडणारा हा लेख. वर्गातील केवळ अभ्यासच नव्हे, तर मुलांच्या भावविश्वाचा आदर करत माणुसकीची पेरणी करणाऱ्या एका शिक्षकाचा हा हृदयस्पर्शी प्रवास.

टिचर, का हो रागावलात माझ्यावर? सकाळी मी तुम्हाला पटांगणात तीन वेळा गुड मॉर्निंग म्हटले पण तुम्ही मला इग्नोर केल्यासारखे केले आणि बोललाही नाही." हे शब्द होते माझ्या बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या माधवचे. मी घाईत असताना त्याने म्हटलेल्या गुड मॉर्निंगला रिप्लाय दिला नाही, म्हणून त्याला खूप वाईट वाटले होते. हा प्रसंग खूपच छोटा, पण नंतर मी त्याला समजवले की खरंच मी घाईत असल्यामुळे त्याच्याशी त्या वेळी बोलले नाही. पण मला समजले की, किशोरवयीन मुलांच्या मनात भावनांचा खूप कल्लोळ माजलेला असतो. टीचरने बोललेली छोटीशी गोष्ट सुद्धा त्यांना दुखावू शकते.
दुसरा प्रसंग माझ्या वर्गात शिकणारी सरिता. मी तिला वही पूर्ण नसल्यामुळे, "उद्या आईला घेऊन ये, नाहीतर मी घरी येऊन तुझ्या आई-बाबांशी बोलेन" असे म्हटले. त्यावर ती रडायलाच लागली. नंतर तिच्या बाजूला बसलेल्या रेश्माने सांगितले की, सरिताचे आई-वडील ती छोटी असतानाच वारले आहेत आणि तिची आजीच तिचा सांभाळ करते. हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. नकळत मी सरिताला दुखावले होते. पण तासानंतर तिला बाहेर आणून तिच्याशी बोलले आणि या बोलण्यामुळेच सरिता माझ्या वह्या नियमित पूर्ण करून बारावीच्या अभ्यासाला
लागली.
खरंच खूपदा असे वाटते की, शिक्षक होणे सोपे नसतेच मुळी. शिक्षक म्हणजे फक्त शिकवून घरी येणे नाही, कारण अनेक भावना हाताळाव्या लागतात रोज मुलांच्या. सकाळी सकाळी आठच्या पूर्वी लगबगीने तयार होऊन आलेली मुले; त्यात थोडी रात्रभर झोप न लागलेली, काही नाश्ता न करून आलेली, थोडी अशी ज्यांच्या घरात काहीतरी बिनसलेले असते आणि आरडाओरडा ऐकून आलेली असतात. हे थोडे हताश, थोडे निराश, तर त्यात काही प्रेमभंगामुळे काळजात वेदनेने भरलेली असतात.
काही भयाने, तणावाचे ओझे झेलत नाईलाजाने वर्गात बसलेली मुले, तर काही ADHD, 'स्लो लर्नर्स' (slow learners) किंवा 'गिफ्टेड' (gifted) मुले असतात. त्यात काही अतिउत्साही आणि आनंदाने हसणारी पिल्लंसुद्धा असतात. अशा या सगळ्यांच्या भावना समजून घेणारी वर्गातील एकमेव व्यक्ती म्हणजेच शिक्षक. एका शिक्षकाला मुलांची नावे, त्यांचे वाढदिवस, त्यांना काही शारीरिक किंवा मानसिक त्रास आहे का, याची आठवण ठेवावीच लागते. वर्गात जाऊन फक्त आपला विषय शिकविणारा कधीच 'चांगला गुरू' होऊ शकत नाही. एका शिक्षकाला प्रत्येक दोन मिनिटांनी वर्गावर नजर ठेवावी लागते, जणू विमानात होणारी सुव्यवस्थित हालचाल सांभाळणाऱ्या एखाद्या विमानसेविकेप्रमाणे.
शिक्षकाचे लग्न झालेले असो वा नसो, त्याला मुलांशी वागण्याची सवय लावून घ्यावीच लागते. त्याला दुसऱ्याच्या मुलावर आपल्या मुलासारखेच प्रेम करावे लागते, त्यांची काळजी घ्यावी लागते. मुख्य म्हणजे मुलांच्या भावना समजून घेऊन त्या वेळी कधी राग, कधी दया, तर कधी प्रेम व्यक्त करावे लागते. कधी कधी खरा राग नसताना सुद्धा, चूक केल्यास रागावून दाखवावे लागते. माझ्या अनुभवानुसार मला वाटते की, मुलांशी बोलल्यावरच आपण त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो. म्हणूनच आजपर्यंत बारावी, पंधरावी पास होऊन गेलेली मुले सुद्धा अजूनही शाळा-कॉलेजच्या वाटेत भेटल्यास बोलतात, फोन करतात. त्यात काही अशीही असतात जी आम्हाला आपली 'दुसरी आई' समजतात. आवर्जून वाढदिवसाला किंवा चतुर्थीला घरी सुद्धा न बोलवता पोहोचतात. हीच मला एका शिक्षकाची खरी पूजा वाटते. कारण ज्या वेळी त्यांना समजावण्याची व समजून घेण्याची गरज होती, तेव्हा शिक्षक म्हणून आम्ही सोबत होतो, याचीच आठवण ते ठेवतात.
भविष्यातील मानव घडवण्यासाठी प्रेम, दया, माया आणि वेळ खपवून शिक्षक झटत असतो. शिक्षक हे केवळ एक काम नसून, ते प्रत्यक्षात माणुसकी रुजवणारे, समाजात संवेदनशीलता व सहकार्याची भावना जोपासणारे थोर आणि मोलाचे योगदान आहे.

- श्रुती करण परब