अजित पवार यांचे विमान अपघातात निधन होणे ही घटना जेवढी सर्वांना धक्का देणारी ठरली, तेवढीच पुढे ती महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांच्यानंतर आता अजित पवार यांनी एक्झिट घेतल्यामुळे एक मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात झाली आहे.

महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात एक अग्रगण्य नाव जे नेहमी चर्चेत असायचे, ते म्हणजे अजित पवार. त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे, विधानांमुळे आणि स्पष्टक्तेपणामुळे त्यांच्यावर प्रसारमाध्यमांचेच नव्हे तर जनतेचेही लक्ष असायचे. सोशल मीडियामध्ये महाराष्ट्रातील हा नेता नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असायचा. एखाद्या घटनेवर अजित पवार काय बोलतात याची उत्सुकता जेवढी प्रसारमाध्यमांना, तेवढीच लोकांनाही असे. त्यांना आपल्या कार्यकर्त्यांची नावे तोंडपाठ असायची. अनेकदा जाहीर सभेत ते त्यांची नावे घेऊनच कोट्या करायचे. एखाद्याची कानउघाडणी करायची असेल, तर ते काम ऑन कॅमेरा करायला ते मागे हटत नसत. धरणातल्या पाण्यापासून ते अधिकाऱ्यांना फोनवरून तंबी देईपर्यंत आणि पहाटे राजभवनावर जाऊन शपथविधी करण्यापासून ते भाजपला पाठिंबा देईपर्यंत अनेक गोष्टींवर अजित पवार नेहमी चर्चेत राहिले.
महाराष्ट्राने मोठमोठे लोकनेते देशालाही दिले आणि महाराष्ट्रालाही. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, आर. आर. पाटील, नितीन गडकरी अशा अनेक नेत्यांनी महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यानंतरच्या फळीत उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे अशा नेत्यांची नावे येतात; जे नेहमी चर्चेत राहतात. काही नेते कितीही केले तरी लक्षात येत नाहीत. पण काही नेते सत्तेत असोत किंवा नसोत, ते नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अजित पवार यांनी सत्तेत राहण्यासाठी चुलते शरद पवारांची साथ सोडली, पण त्यांनी पवारांना दुखावले नाही. एकेकाळी अजित पवारांनीच शरद पवारांसाठी खासदारकी सोडली होती. शरद पवारांना दिल्लीत जावे लागले तेव्हा अजित पवारांनी केलेला त्याग आजही महाराष्ट्रात उल्लेखला जातो.
महाराष्ट्राच्या राजकारणात चव्हाण, ठाकरे, पवार अशी अनेक घराणी आपले वर्चस्व अबाधित ठेवून आहेत. राजकारणाच्या नावाने नाक मुरडणाऱ्यांनाही या कुटुंबांनी दिलेल्या योगदानांचा विसर होणार नाही.
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन होणे ही घटना जेवढी सर्वांना धक्का देणारी ठरली, तेवढीच पुढे ती महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांच्यानंतर आता अजित पवार यांनी एक्झिट घेतल्यामुळे एक मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात निर्माण झाली आहे. अर्थात या विमान अपघातानंतर आता अनेक वादग्रस्त विधाने व्हायला लागली आहेत. काहींना हा घातपात आहे असे वाटते. दुर्दैवाने विमान आणि हेलिकॉप्टर अपघात भारतात आणि जगातही होतच आहेत. त्यामुळे हाही अपघातच आहे, असे प्रथमदर्शनी म्हणावे लागेल. या अपघाताने एक उमदा आणि कामासाठी झोकून देणारा नेता महाराष्ट्राने गमावला. 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात शरद पवारांनी अजित पवारांचा उल्लेख 'भावनाप्रधान' म्हणून केला आहे. अजित पवार यांनी पहाटे भाजपसोबत जाण्याची कृती केली, त्यावेळी पवार कुटुंबही हादरले होते. त्या घटनेनंतर शरद पवार यांच्या पत्नीसोबत बोलताना अजित पवार यांनी जे घडले ते चुकीचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली होती. त्या घटनेनंतर अजित पवार यांनी घेतलेली भूमिका निवळायला लागली. पवार आपल्या पुस्तकात म्हणतात की, ‘अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटात मानणारा मोठा वर्ग आहे. विधिमंडळ सदस्यांमध्ये त्यांना सन्मानाचे स्थान आहे. त्यांची ती स्वकष्टार्जित कमाई आहे.’ यावरून अजित पवार यांनी बंड केले तरी त्यांच्याविषयी पवार कुटुंबात आणि पक्षातही आदराचेच स्थान होते, हे स्पष्ट होते. शरद पवार यांचा लोकसंग्रह प्रचंड. अजित पवार यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम केले. त्यांची वागणूक शरद पवारांपेक्षा वेगळी होती, पण त्यातही मिश्किलता असल्यामुळे सध्याच्या राजकारणात अजित पवारच जनतेमध्ये अग्रेसर होते. अजित पवार यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे राजकारण शोकसागरात बुडाले आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांकडे लक्ष वळवून अजित पवार कामाला लागले होते. त्याच प्रचारासाठी ते मुंबईहून खासगी विमानाने बारामतीला गेले. तिथे लँड होण्यापूर्वी विमान कोसळून दुर्घटना घडली. एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली !