२०२७ च्या विधानसभा निवडणुका एक वर्षावर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे गोव्यात भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच तयारीला लागण्याची आवश्यकता आहे. दिल्लीतील बैठकीचे परिणाम पुढील काही काळात गोव्यात दिसतात का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

निवडणुकीला एक वर्ष असताना आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठांनी गोव्यातील काँग्रेसला काहीसे गांभीर्याने घेतले, असेच म्हणावे लागेल. नेहमीचे पक्ष बांधणीचे रडगाणे गात काँग्रेसने गोव्यात पक्ष कसा मजबूत करायला हवा, त्यावर चर्चा केली हे विशेष. गेल्या तेरा-चौदा वर्षांत काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि सलग दोन निवडणुकांत पक्षांतर कायद्याचा आधार घेत आवश्यक तेवढे संख्याबळ घेऊन काँग्रेसचे आमदार फुटले असले तरी काँग्रेसने भाजपसमोर शरणागती पत्करलेली नाही. भलेही भाजपप्रमाणे काँग्रेसला पक्षाची बांधणी करणे जमलेले नसले, तरीही सर्वात बलाढ्य असलेल्या भाजपला अशा स्थितीतही काँग्रेस जुमानत नाही. यावेळी जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजीपी या पक्षांना मिळालेले यश हे भाजपची चिंता वाढवणारेच आहे. या निकालानंतर भाजपने अंतर्गत बदल करण्यासाठी पावले उचलली आहेत. पक्षांतर्गत आणि सरकारमध्ये काही बदल करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिल्यामुळे काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीला एका वर्षाचा अवकाश असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्लीत गोव्यातील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून आढावा घेतला. अशा बैठका वारंवार होण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसमध्ये हवे असलेले बदल करण्यासह निवडणुकीची तयारी, पक्षाची मतदारसंघनिहाय बांधणी, उमेदवारांची चाचपणी, उमेदवार निवड अशा अनेक गोष्टींवर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली आहे. गेल्या काही वर्षांत अशी बैठक दिल्लीत प्रथमच झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना गोव्यातील विषय चर्चेला घेण्यासाठी वेळ मिळाला. गोव्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि दरवेळी उमेदवारी देण्यात घातला जाणारा घोळ, पक्ष विस्ताराच्या मुद्द्यावर असलेली पक्षातील निराशा या गोष्टींमुळे गोव्यात काँग्रेस गेल्या तेरा-चौदा वर्षांत मजबूत होऊ शकली नाही. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या, पण त्यानंतर तो आकडा प्रचंड खाली आला. भाजप गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने मोठा झाला आणि आजही गोव्यातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दावा भाजप करत असतो. असे असले तरी जेवढे भाजपचे सदस्य असतात, तेवढी मतेही भाजपला मिळत नाहीत. त्या तुलनेत काँग्रेसला काही तालुक्यांमध्ये नेहमीच चांगले वातावरण राहिले आहे. तिसवाडी, सासष्टी, फोंडा, बार्देश, मुरगाव या तालुक्यांमध्ये काँग्रेसने कंबर कसली तर चांगले यश मिळू शकते. हे यश मिळण्यासाठी काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठांनी गोव्यातील काँग्रेसकडे लक्ष द्यायला हवे. जे जिंकू शकतात अशा लोकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देणे, त्यांच्या मदतीने पक्षाची बांधणी करणे अशा गोष्टी करण्यावर भर दिला तर निश्चितच काँग्रेसला त्याचे फळ मिळू शकेल.
गोव्यातील काँग्रेसने केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारचे गैरकारभार व सरकारमधील लोकांकडून होत असलेला भ्रष्टाचार लोकांसमोर मांडला तर त्याचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो. स्थानिक नेत्यांना या मोहिमेत सहभागी करून घेऊन लोकांसमोर सरकारची गैरकृत्ये मांडा, असा सल्ला काँग्रेसच्या गोव्यातील नेत्यांना दिल्लीतील नेत्यांनी दिला आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी आतापासून प्रदेश काँग्रेसने मतभेद बाजूला सारून काम करण्याचा सल्ला काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी दिला आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे एव्हाना दिल्लीतील नेत्यांनाही कळले असेल. अशा पद्धतीने हे नेते एकमेकाच्या विरोधात राहिले, तर २०२७ मध्येही काँग्रेसची घसरण कोणी रोखू शकणार नाही. काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाने दिल्लीत बैठका घेण्यापेक्षा गोव्यात येऊन इथे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना भेटण्यासाठी वेळ दिला आणि इथल्या पदाधिकाऱ्यांना मानसिक बळ दिले तर बऱ्याच गोष्टी काँग्रेससाठी सोप्या होऊ शकतात. २०२७ च्या विधानसभा निवडणुका एक वर्षावर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे गोव्यात भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच तयारीला लागण्याची आवश्यकता आहे. दिल्लीतील बैठकीचे परिणाम पुढील काही काळात गोव्यात दिसतात का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.