लुथरा बंधू, रोशन रेडकरांच्या आस्थापनांवर ईडीचे छापे, चिंबल तळ्याचे सर्वेक्षण सुरू

पणजी : उत्तर गोव्यातील हरमल आणि मोरजी या प्रसिद्ध किनारी भागांत दोन रशियन महिलांचा खून केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. लुथरा बंधू, रोशन रेडकरच्या आस्थापनांवर ईडीने छापे टाकले. चिंबल तळ्याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याशिवाय अपघात, अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
ईडीकडून चरससह ३ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने आंतरराष्ट्रीय ड्रग्जरॅकेट विरोधात गोव्यासह महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर ८ राज्यांतील एकूण २६ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली होती. त्यात ३ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह चरस जप्त करण्यात आला होता. केरळ येथील सराईत ड्रग्जतस्कर मधूपन सुरेश शशिकला याच्यासह दिल्लीतून आणखी एका तस्कराला अटक करण्यात आली आहे.
कर्ज देण्याच्या नावाखाली सत्तरीतील महिलेची फसवणूक
कर्ज देण्याच्या नावाखाली सत्तरी तालुक्यातील एका महिलेच्या पॅन कार्ड, वीज बिल आणि फोटोचा वापर करून तिच्या नावे आस्थापनांची बनावट जीएसटी नोंदणी केली. या नोंदणीद्वारे आणि १२ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल दाखवून ३.५१ कोटी इनपुट टॅक्स क्रेडीटची (आयटीसी) मागणी करण्यात आली. या प्रकरणी आर्थिक गुन्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

रशियन सिरियल किलरची पोलिसांकडून चौकशी
उत्तर गोव्यातील हरमल आणि मोरजी या प्रसिद्ध किनारी भागांत दोन रशियन महिलांचा गळा चिरून निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी अटक केलेला संशयित आलेक्सी लिओनोव (३७) हा रशियन नागरिक पोलिसांना चौकशीत असहकार्य करत आहे. स्वत:च्या रहात असलेल्या भाड्याच्या खोलीसह केलेल्या खुनांची पूर्ण आणि खरी माहिती देत नसल्याने पोलिसांचा तपास खुंटला आहे.
सोमवार
सिद्दीकी सुलेमान खानचे जामीन अर्ज फेटाळले
जमीन हडप प्रकरणातील अट्टल गुन्हेगार सिद्दीकी (सुलेमान) खान याच्याविरुद्ध म्हापसा व वाळपई पोलिसांनी नोंद केलेल्या तीन गुन्ह्यांतील जामीन अर्ज मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा अतिरीक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहे.
पोलीस खात्यातील ३५ कॉन्स्टेबलना हवालदारपदी बढती
पोलीस खात्यातील ३५ कॉन्स्टेबलना हवालदारपदी बढती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक धर्मेश आंगले यांनी जारी केला आहे. त्यातील २२ सामान्य गटातील तर ३ अनुसूचित जाती १० अनुसूचित जमातीतील काॅन्स्टेबलचा समावेश आहे.
म्हापसा येथील बंगल्यावरील दरोडाप्रकरणी आरोपपत्र दाखल
म्हापसा येथील डाॅ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा घालून घाणेकर कुटुंबीयांना बंधक बनवून घरातील ३५ लाखांचा मुद्देमाल पळवल्या प्रकरणी गुन्हा शाखेने संशयित राजू बी, सफिकुल अमीर यांच्यासह सहा फरार बांगलादेशी दरोडेखोराविरोधात सुमारे ३०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ३६ साक्षीदारांची साक्ष नमूद करण्यात आली आहे.
मंगळवार
सहा पोलीस निरीक्षकांचे डिमोशन
पोलीस खात्यातील सहा निरीक्षकांची पदावनती (डिमोशन) करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पोलीस महानिरीक्षक अजय कृष्णन शर्मा यांनी जारी केला आहे. पदावनती केलेल्यांमध्ये पोलीस निरीक्षक टेरेंस वाझ, संध्या गुप्ता, सुनील गुडलर, विलेश दुर्भाटकर, सुशांत गावस आणि राहुल धामशेकर यांचा समावेश आहे.

करमलघाट, काणकोण येथील अपघातात तिघे जखमी
करमलघाट, काणकोण येथे दोन कारची धडक बसून झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. त्यात दोघे विदेशी नागरिक तर एका कार चालकाचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही बाळ्ळी येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
शिवोलीत कोकेनसह नायजेरियनाला अटक
इंग्रेजवाडो, शिवोली येथे हणजूण पोलिसांनी छापा टाकून ९८ हजारांचा ९.७३ ग्रॅम कोकेन हा ड्रग्ज जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी ओनुएंग्बू उचे जस्टस (४४, रा. शिवोली) या नायजेरीयन नागरिकाला अटक केली.
राय परिसरातील टेकडीवर पाचव्यांदा आग
राय परिसरातील टेकडीवर गेल्या काही दिवसांत पाचव्यांदा आग लागण्याची घटना घडली. मडगाव अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण आणले असून ही आग जाणीवपूर्वक लावण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला. यातील दोषी सापडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही ते म्हणाले.
बुधवार
कर सल्लागाराकडून सरकारची १० कोटींची फसवणूक
गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद केलेल्या कळंगुट येथील रिसॉर्ट कंपनीचे नाव वापरून सरकारकडून १०.०६ कोटी रुपये जीएसटी इनपूट क्रेडिट टॅक्सपोटी घेतले. प्रत्यक्षात कोणत्याही मालाची वाहतूक वा सेवा न पुरवता बनावट कागदपत्रे दाखवून त्याने सरकारची ही फसवणूक केली. या प्रकरणी आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) बेळगाव (कर्नाटक) येथील नकीब मुल्ला या जीएसटी आणि कर सल्लागाराविरोधात गुन्हा दाखल केला.
बडतर्फ सरपंच रोशन रेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
माजी सरपंच रोशन रेडकर पंचायत कर्मचाऱ्यांवर प्रभाव टाकण्याच्या पदावर होता. त्यामुळे तो साक्षीदारांना धमकावू शकतो किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकून पुराव्यांत हस्तक्षेप करू शकतो, असे निरीक्षण नोंदवून बर्च क्लबमधील अग्नितांडव प्रकरणी हडफडे-नागवाचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
गुरुवार
बेरोजगारीसह महागाईविरोधात युवक काँग्रेसचा पणजीत एल्गार
बेरोजगारी तसेच महागाईच्या विरोधात युवक काँग्रेसने पणजीत मोर्चा काढला. आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानाकडे जाणारा हा मोर्चा पोलिसांनी वाटेतच रोखला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर गजाआड
हडफडेचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर हे म्हापसा न्यायालयात शरण आल्यानंतर हणजूण पोलिसांनी त्यांना बर्च अग्नितांडव प्रकरणी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने रेडकर यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दुर्घटनाग्रस्त ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला दिलेल्या परवान्यांमुळे सरपंच या नात्याने रोशन रेडकर हे वादात सापडले होते.
शुक्रवार

नावेलीतील दोन ऑटोमोबाईल आस्थापनांना टाळे
नावेली येथील रोफायर क्लासिक इमारतीतील ‘फिरदोज ऑटोमोबाईल अँड ऑटो वर्क’ तसेच ‘ड्राईव्ह ७ प्रो’ ही दोन आस्थापने सासष्टीच्या मामलेदारांनी सील केली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. या आस्थापनांमुळे परिसरातील नागरिकांना ध्वनी तसेच वायू प्रदूषणाचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.
लुथरा बंधू, रोशन रेडकरच्या आस्थापनांवर ईडीचे छापे
हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबमधील भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच ईडीने गोवा तसेच दिल्लीसह एकूण आठ ते नऊ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत लुथरा बंधू, अजय गुप्ता, तत्कालीन सरपंच रोशन रेडकर तसेच सचिव रघूवीर बागकर यांच्या मालमत्तांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
शनिवार
चिंबल तळ्याचे सर्वेक्षण सुरू
चिंबल येथील तळ्याचे सर्वेक्षण पुढील तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. सध्या तज्ज्ञांच्या पथकाने तळ्याच्या सीमा निश्चित करण्याचे काम हाती घेतले असून, त्यानंतर बफर झोन, नैसर्गिक झरे आणि लगतच्या जमिनीची मोजणी केली जाणार आहे.
विदेशात नोकरी देण्याच्या नावे ३.४५ लाखांची फसवणूक
विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून एकाची ३.४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने पैसे घेतले. नंतर नोकरी दिली नाही व पैसेही दिले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
लक्षवेधी
वास्को येथील रेल्वे स्थानकावर शनिवार, दि. १७ रोजी रात्री गस्त घालत असताना हवालदार संतोष गोगळे (४७) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. याप्रकरणी वास्को रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली.
उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात सिरियल किलिंगच्या माध्यमातून महिलांना ‘मोक्ष’ प्राप्त करून दिल्याचा दावा करणाऱ्या आलेक्सी लिओनोव या रशियनाचे आणखी कारनामे समोर आले आहेत. एखाद्या महिलेला ठार मारल्यानंतर तिच्या मृतदेहावर तो उन्मादात नाचायचा, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. हिमाचल प्रदेश आणि गोव्यात मिळून सुमारे १५ महिलांना ठार मारल्याची कबुली त्याने यापूर्वीच दिली आहे.
गोवा पोलीस खात्यातील ३० पेक्षा जास्त कर्मचार्यांवर न्यायालयात गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरू आहेत. उपनिरीक्षक आनंद नार्वेकर यांच्यासह या ३० जणांना बढती द्यावी लागणार असल्याने ६ पोलीस निरीक्षकांची पदावनती (डिमोशन) करण्याचा निर्णय पोलीस स्थापना मंडळाला घ्यावा लागला आहे.
साळावली धरण पुनर्वसन योजनेअंतर्गत भूखंड मिळालेल्या लाभार्थ्यांच्या जमिनींचे सर्वेक्षण क्रमांक तपासण्यासाठी सरकारने एक महत्त्वाची समिती स्थापन केली आहे. या समितीला म्युटेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना सरकारने जारी केली आहे.