तुये इस्पितळ पूर्ण क्षमतेने सुरू करा, अन्यथा उपोषण; पेडणेवासीयांचा सरकारला इशारा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
52 mins ago
तुये इस्पितळ पूर्ण क्षमतेने सुरू करा, अन्यथा उपोषण; पेडणेवासीयांचा सरकारला इशारा

पेडणे: तुये येथील १०० खाटांच्या इस्पितळाला गोमेकॉशी संलग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, या इस्पितळातील सर्व ओपीडी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा पूर्णपणे कार्यान्वित कराव्यात, अशी आग्रही मागणी पेडणे तालुक्यातील रहिवाशांनी सरकारकडे केली आहे. इस्पितळाच्या सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष करून केवळ कागदोपत्री लिंक केल्यास त्याचा फटका आरोग्य सेवेला बसेल, अशी भीती व्यक्त करत स्थानिकांनी या संदर्भात सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.




सरकारने तुये इस्पितळ 'जीएमसी'ला जोडण्याबाबतची अधिसूचना जारी केली असली तरी, या निर्णयाच्या घाईमुळे स्थानिक रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत हे इस्पितळ पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक डॉक्टर, कर्मचारी आणि यंत्रसामग्री उपलब्ध होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया पुढे नेऊ नये, अशीही भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. पेडणेसारख्या ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा मिळणे हा स्थानिकांचा हक्क असून, केवळ कागदोपत्री सोपस्कार करण्यापेक्षा प्रत्यक्ष सुविधांवर भर देण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली आहे.

या संदर्भात रहिवाशांनी प्रशासनाकडे २७ जानेवारीपर्यंत लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. या मुदतीपर्यंत इस्पितळ पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी सरकार कोणती पावले उचलणार आहे, याची स्पष्ट रूपरेषा जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने यावर समाधानकारक उत्तर दिले नाही, तर २८ जानेवारीपासून बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

स्थानिक नेत्यांच्या मते, हे आंदोलन पेडणेवासीयांच्या हक्काच्या आरोग्य सुविधेसाठी आहे. तुये इस्पितळाचा मूळ उद्देश हा स्थानिक जनतेला सर्व सोयींयुक्त उपचार मिळावेत हाच असायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. आता यावर सरकार काय भूमिका घेते आणि २७ जानेवारीपूर्वी काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा