
पणजी : गोवा सरकारने (Goa Government) निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना (Retired Government staff) खुशखबर दिली आहे. यानुसार १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतर ३० जून किंवा ३१ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना नोशनल (काल्पनिक) वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या आधारावर अशा कर्मचाऱ्यांना वाढीव निवृत्ती वेतन मिळणार आहे. केंद्रीय कार्मिक खात्याने जारी केलेल्या परिपत्रकाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
याबाबत अर्थ खात्याने काढलेल्या परिपत्रकानुसार, राज्य शासनाच्या सेवेतून अनुक्रमे ३० जून व ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनविषयक लाभ देण्यासाठी १ जुलै व १ जानेवारी रोजी काल्पनिक वेतनवाढ देण्यात येणार आहे. यावर आधारित वाढीव निवृत्तीवेतनाचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ १ जानेवारी २००६ नंतर आणि ३० एप्रिल २०२३ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना ०१ मे २०२३ पासून लागू होईल.
निवृत्ती वेतनाबाबत कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्यायालयीन निकाल असेल तर अशा प्रकरणात न्यायालयाचे विशिष्ट निर्देश लागू होतील. वाढीव निवृत्ती वेतन मिळण्यासाठी कर्मचाऱ्याने कार्मिक खात्याने २० मे २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काल्पनिक वेतनवाढ ही केवळ निवृत्तीवेतनाची गणना करण्याच्या उद्देशाने विचारात घेतली जाईल. ग्रॅच्युइटी व निवृत्ती वेतनविषयक अन्य लाभांच्या गणनेसाठी विचारात घेतली जाणार नाही.