तीन दिवस चालेल चिंबल तळ्याचे सर्वेक्षण

सीमांकनाला सुरुवात

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
50 mins ago
तीन दिवस चालेल चिंबल तळ्याचे सर्वेक्षण

पणजी: चिंबल येथील तळ्याचे सर्वेक्षण पुढील तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. सध्या तज्ज्ञांच्या पथकाने तळ्याच्या सीमा निश्चित करण्याचे काम हाती घेतले असून, त्यानंतर बफर झोन, नैसर्गिक झरे आणि लगतच्या जमिनीची मोजणी केली जाणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तज्ज्ञ आपला अहवाल तयार करतील आणि तो सूचना व हरकतींसाठी स्थानिक ग्रामस्थांसमोर ठेवला जाईल.



मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि चिंबल ग्रामस्थ यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीत तळ्याचा 'प्रभाव क्षेत्र' (झोन ऑफ इन्फ्लुएन्स) निश्चित करण्यासह युनिटी मॉलपर्यंतच्या जागेचे सर्वेक्षण करण्यावर एकमत झाले होते. या निर्णयानुसार, संबंधित अधिकारी शुक्रवारी सर्वेक्षणासाठी दाखल झाले होते. मात्र, सुरुवातीला केवळ एकाच सर्व्हे नंबरचे (४०/१) सर्वेक्षण सुरू केल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता. तळ्याचा मुख्य भाग (हायस्ट पॉईंट) दुसऱ्या सर्व्हे नंबरमध्ये येत असल्याचा दावा करत ग्रामस्थांनी वाद घातल्यानंतर, शनिवारी सकाळी पुन्हा नव्याने सविस्तर सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली.


या सर्वेक्षणावेळी पर्यटन खात्याचे सल्लागार प्रमोद बदामी, गोवा जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप सरमोकादम, एनआयओचे तज्ज्ञ अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सध्या तळ्याच्या सीमा आखण्याचे काम सुरू असून, त्यानंतर तळ्यातील पाण्याचे स्रोत आणि नैसर्गिक झऱ्यांची पाहणी केली जाईल. या प्रक्रियेत सांतान-ताळावलीचा परिसर आणि प्रस्तावित युनिटी मॉलच्या जागेचीही तांत्रिक मोजणी होणार आहे. या संपूर्ण कामासाठी किमान तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असून, अधिकारी दररोजचा अहवाल स्थानिकांना सादर करतील, जेणेकरून त्यात काही त्रुटी असल्यास त्या त्वरित सुधारता येतील.



दरम्यान, या सर्वेक्षणावरून स्थानिक ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हे सर्वेक्षण केवळ युनिटी मॉलसाठी नसून पाणथळ क्षेत्राचे अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याचे ग्रामस्थ अजय खोलकार यांनी सांगितले. युनिटी मॉल प्रकल्पाचा भाग जर तळ्याच्या प्रभावित क्षेत्रातून बाहेर येत असेल, तरीही आम्ही या प्रकल्पाला पाठिंबा देणार नाही. हे पाणथळ क्षेत्र कायमस्वरूपी सुरक्षित राहावे आणि भविष्यात युनिटी मॉलसारखे इतर कोणतेही प्रकल्प या ठिकाणी येऊ नयेत, हाच या सर्वेक्षणामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा