खोतीगावच्या निसर्ग, पर्यावरण आणि विखुरलेल्या ऐतिहासिक तसेच पुरातत्वीय संचितांचे संरक्षण करून, पर्यावरणस्नेही उपक्रम लोक सहभागातून यशस्वी करण्याची नितांत गरज आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेले आणि भौगोलिकदृष्ट्या आकाराने मोठे असलेले गोव्यातील गाव म्हटल्यावर ‘खोतीगाव’. कोणाला हे नाव सांगितले तर, ‘कुठे आहे हे गाव?’ असा प्रश्न हमखास विचारला जाईल. गोव्याच्या भौगोलिकदृष्टीने आकाराने मोठा असूनही उपेक्षित गणलेला आणि इथल्या भूमिपुत्रांना शिक्षण, आरोग्य, वीज या मूलभूत सुविधांपासून एककाळी वंचित राहण्याची पाळी आलेले हे गाव खरेतर नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे. कधी काळी पर्यावरणीय संस्कृतीचे जेव्हा प्राबल्य होते, तेव्हा येथे बरीच लहान-मोठी गावे वसली होती. अन्नधान्यांच्या आणि पाण्याच्या दृष्टीने खोतीगावच्या परिसरातील गावे स्वयंपूर्ण असल्याने इथे वास्तव्य करून पूर्वापार असलेल्या आदिवासी जमातीची लोकसंस्कृती, लोकधर्म बहरला होता.
कालांतराने मानवी समाजाच्या जेव्हा गरजा वाढत गेल्या तेव्हा डोंगर, जंगल, नदी, ओहोळ, झाडे हे विकासाच्या मार्गातील अडथळे ठरू लागले. जंगलतोड, नदीनाले बुजवून, डोंगर कापून शेती, बागायतीबरोबर अन्य बाबींसाठी अशा जागा वापरल्या गेल्याने तसेच या गावात उपजीविकेची साधने कालांतराने दुर्बल झाल्याकारणाने तेथील गावे त्यागून लोक शहराकडे आणि नागरी सुविधा मिळणाऱ्या गावांकडे वळले. बोडये, अवे, आवाळी, मोने, कुंभेगाळ, शिशेव्हाळ, नडके, कुस्के, एन्ड्रा, तीरव्हाळ, कारेगाळ, अष्टगाळ, पोवासुलीमळ, बड्डे, जांभोळे, केरी अशी गावे लुप्त होऊन शासकीय महसुली दफ्तरात आज खोतीगावची नोंद झालेली आहे. १११७०.९३ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या गावाचा निम्मा अधिक भाग जंगलक्षेत्राने व्यापलेला आहे. १९६८ मध्ये काणकोणच्या ९८.०५ चौ. कि.मी. क्षेत्राला खोतीगाव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. परंतु इथल्या काही गावांत लोकवस्ती, शेतजमिनी, बागायती असल्याने तेथील लोकांनी अभयारण्याचा काही भाग वगळण्याची सातत्याने मागणी केली. त्या मागणीला अनुसरून १२.४ चौ. कि.मी. क्षेत्र अभयारण्यातून वगळल्याने आज ८५.६५ चौ. कि.मी. इतक्या जंगलाचा अभयारण्यात समावेश होत आहे. येथील बहुतांश लोक हे आदिवासी वेळीप गावकर जमातीचे असून, शेकडो वर्षांपासून ते या जंगलात वास्तव्य करून राहत होते.
परंतु महसूल दफ्तरात त्यांच्या मालकीची नोंद न झाल्याने आज त्यांच्या नशिबी भूमिहीन होण्याची पाळी आलेली आहे. अष्टगाळ, पोनसुलीमळ, एड्डा, बड्डे, कुस्के ही गावे अभयारण्यातून वगळलेली असून नडके, जांभोळे, तीरव्हाळ, कारेंगाळ, एन्ड्रा आदी गावे अभयारण्याच्या कक्षेत येत आहेत. या गावाच्या एका बाजूला काणकोणातील गावडोंगरी, सांगेतील साळजिणी आणि दुसऱ्या, बाजूला कर्नाटकाच्या सीमा भिडत आहेत.
खोतीगाव अभयारण्यापासून काही अंतरावर कर्नाटकाचे अणशी राष्ट्रीय उद्यान वसलेले असून, दुसऱ्या बाजूला गोव्यातील सगळ्यात मोठे असे नेत्रावळी अभयारण्य वसलेले आहे. खोतीगाव आणि नेत्रावळी अभयारण्यांमध्ये दक्षिण गोव्यातील ८४३ मीटर उंची असलेला रावण डोंगर आहे. याच रावण डोंगरावरून काणकोणची जीवनदायिनी असणाऱ्या तळपण नदीचे महत्वाचे जलस्रोत जन्माला येतात. परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी रावण डोंगराचे बरेच लचके खाण मालकांनी क्रूरपणे तोडले होते. एके काळी महाकाय आणि जंगल समृद्ध म्हणून ओळखला जाणारा रावण डोंगर आज पूर्णपणे गलितगात्र झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रीय उच्चाधिकार समितीने रावण डोंगरावरचा बेकायदेशीररीत्या चालणारा खाण व्यवसाय बंद केल्याने, इतिहासजमा होण्याच्या वाटेवर असणारा रावण डोंगर काही अंशी संरक्षित झालेला आहे. गावडोंगरीहून सातुर्लीमार्गे तर काणकोण-कारवार मार्गावरून पैंगिणीत पोहोचल्यावर डाव्या बाजूला असलेला अभयारण्याचा फलक खोतीगावाकडे घेऊन जातो.
पैंगिणी पंचायत क्षेत्रातील दाबेल येथे अभयारण्यातील लोकांचे पुनर्वसन करण्याची वन खात्याची योजना होती. परंतु ती आजतागायत शीतपेटीत पडून आहे. खोतीगावात बारामाही नैसर्गिक सौंदर्याचे विविधांगी पैलू दृष्टीस पडतात. परंतु पावसाळी मोसमात इथल्या वनश्रीची शोभा ती काय वर्णावी? सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावरच्या कातळावरून खाली कोसळणारे जलप्रपात, नागमोडी वळणे घेत हिरवाईतून मस्तपणे खळाळणारे ओहोळ, गवे, काळा बिबटा, शेकरू, पट्टेरी वाघ, चितळ, भेकरे... यासारखी जंगली श्वापदे, घोटींग, माडत, किंदळ यासारखे महाकाय वृक्ष... यांच्या संपत्तीने खोतीगाव समृद्ध आहे.
पिढ्यांपिढ्या निसर्ग आणि पर्यावरणाकडे आत्मियतेचे स्नेहबंध होऊन इथल्या वेळीप जमातीने खोतीगावात वास्तव्य केले होते. आज हे भूमिपुत्र परागंदा; तर सत्ता, संपत्ती असणारे मात्र जंगलाचे वैभव लुटत आहेत. गावडोंगरी आणि श्रीस्थळ येथील मल्लिकार्जुन किंवा मलकाजाण हा आदिवासी जमातीचा मुख्य देव. त्याचीच वेगळी मंदिरे खोतीगावात उभारलेली आहेत. कुस्के आणि अवे येथे असलेली मल्लिकार्जुनाची मंदिरे आदिवासी जमातीच्या लोकधर्मावर प्रकाशझोत टाकतात. बड्डे येथे निरंकार, जल्मी, सरका पुरीस, भुमिपुरुष, अवे येथे साठपुरव, जल्मी-भुमची पुरीस, पायक, वाघ्रो आणि मल्लिकार्जुन, येडा येथे येडकान्न, सरकापुरीस, खुटी, घोड्या पायक, आवळी येथे जल्मी, पुरव, पाच पुरीस, नासापुरीस, घरवय, महाबळेश्वर, साताई देवी, कुलगती पुरीस, पायक, घोड्यापायक ही दैवते आहेत. कुस्के येथे महादेव मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे. आज खोतीगावात बऱ्याच ठिकाणी सिमेंट काँक्रिटची मंदिरे उभारली असली तरी शिमग्याच्या आणि अन्य महत्त्वाच्या सण, उत्सवाच्या प्रसंगी येथील वेळीप, गावकर डोंगरमाथ्यावर वसलेल्या देवराईत म्हणजे देवादाणोत येतात. शिमग्यात जवळजवळ पंधरा दिवस घरादाराचा त्याग करून विजेच्या रोशणाईपासून दूर जंगलात झोपड्या बांधून शाकाहारी अन्न सेवन करून या जमातीचे लोक राहतात.
आसाडी पुनव, श्रावणातील कोडु पुनव, देंडलो, गोरवा पाडवा, उष्टणा, मल्लिपुनव, धिल्लो, शिमगो आदी पारंपरिक सण, उत्सवात इथल्या आदिवासी जमातीची निसर्गाविषयी असलेली आत्मियता स्पष्ट होते. आवळी दाण्याचा आणि कुस्केचा धबधबा, केरी येथील पवित्र तरोन्नात दिव्यत्वाची प्रचिती देणारी वृक्षवेलींची संपदा... हे सारे खोतीगावचे वैभव आहे. प्रसिद्धीपासून अलिप्त असलेला खोतीगाव नैसर्गिक सौंदर्याचे आणि संपत्तीचे आगर आहे. खोतीगावातील जंगलात कधीकाळी ज्या आदिम जमाती वास्तव्यास होत्या, त्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा जंगलात विखुरलेल्या आणि उपेक्षित स्थितीत असलेल्या पहायला मिळतात. याच जंगलात नदीकिनारी वसलेल्या शिलाखंडावर पुरातत्वीय संचिते कोरलेली आढळतात, त्यावरून या परिसराच्या गतकालीन इतिहासाची प्रचिती येते. खोतीगावच्या निसर्ग, पर्यावरण आणि विखुरलेल्या ऐतिहासिक तसेच पुरातत्वीय संचितांचे संरक्षण करून, पर्यावरणस्नेही उपक्रम लोक सहभागातून यशस्वी करण्याची नितांत गरज आहे.

- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५