आम्ही थायलंडला पळून गेलो नव्हतो : लुथरा बंधू

तीन दिवसांचा दौरा पूर्वनियोजित : जामीन अर्जावरील सुनावणीवेळी न्यायालयात माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th January, 11:31 pm
आम्ही थायलंडला पळून गेलो नव्हतो : लुथरा बंधू

म्हापसा : बर्च क्लबमधील दुर्घटनेनंतर आम्ही थायलंडला पळून गेलो नव्हतो. आमचा फुकेतचा दौरा हा पूर्वनियोजित होता. प्रस्थान व परतीची तिकीट आम्ही ट्रॅव्हल एजन्सीद्वारे आधीच बुक केली होती. परतीचा प्रवास तीन दिवसांतच होता. मात्र, हणजूण पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने आमचा पासपोर्ट रद्द केल्यामुळे आम्हाला मायदेशी परतता आले नाही, असा दावा संशयित लुथरा बंधूंनी न्यायालयात केला.

शनिवार, दि. १७ रोजी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात संशयित सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. गौरव लुथरा यांच्यावतीने अ‍ॅड. सुबोध कंटक यांनी युक्तिवाद केला. मात्र हा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी सोमवार, दि. १९ जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. त्या दिवशी प्रथम गौरव लुथरा यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण होणार असून त्यानंतर सौरभ लुथरा यांच्यावतीने युक्तिवाद केला जाणार आहे.

ही दुर्घटना केवळ एक अपघात असून त्याला थेट आम्हाला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद लुथरा बंधूंच्या वकिलांनी केला. देशभरात आमच्या एकूण २७ आस्थापना असून सर्व ठिकाणी स्वतंत्र कर्मचारी व व्यवस्थापक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे बर्च क्लबमधील दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी आमच्यावर टाकता येणार नाही, असा दावा त्यांनी केला.

क्लबमधून बाहेर पडण्यासाठी पुरेशी वाट नव्हती आणि अग्निसुरक्षा उपकरणे नव्हती, हा हणजूण पोलिसांचा दावा खोडून काढताना अ‍ॅड. कंटक यांनी सांगितले की, क्लबमध्ये सर्व आवश्यक अग्निसुरक्षा उपकरणे उपलब्ध होती. तसेच कर्मचाऱ्यांना फायर एक्स्टिंग्विशर वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यासंदर्भातील कागदपत्रे व छायाचित्रे न्यायालयात सादर करण्यात आली.

क्लबच्या पहिल्या मजल्यावर आग लागली तेव्हा तेथे सुमारे १३० लोक उपस्थित होते आणि ते सर्व सुखरूप बाहेर पडले. मात्र तळमजल्यावर असलेल्या लोकांचा दुर्दैवाने धुरामुळे श्वासोच्छ्वासाच्या त्रासाने मृत्यू झाला, असा दावाही वकिलांनी केला.

फिर्यादी पक्ष हा केवळ क्लबमधील जागेच्या अनियमिततेवर लक्ष केंद्रित करत आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यासाठी आम्ही कसे जबाबदार आहोत, याचे कोणतेही ठोस पुरावे ते न्यायालयासमोर सादर करू शकलेले नाहीत, असा युक्तिवादही करण्यात आला.

इलेक्ट्रिक फटाक्यांमुळे आग लागल्याचा दावा

आम्ही एका इव्हेंट कंपनीसोबत करार केला होता. मात्र ही कंपनी नेमके काय सादर करणार किंवा कोणत्या साहित्याचा वापर करणार, याची आम्हाला कल्पना नव्हती. मुळात घटनास्थळी पायरो (इलेक्ट्रिक फटाके) वापरण्यात आल्यामुळेच आग लागली, असा दावा करत त्या दिवसाचा व्हिडिओ अ‍ॅड. कंटक यांनी न्यायालयात सादर केला.

दुर्घटनास्थळी २० वर्षे इतर क्लब सुरू 

फेब्रुवारी २०२४ मध्ये आम्ही हडफडे येथे बर्च क्लब सुरू केला होता. मात्र, यापूर्वी गेली २० वर्षे त्याच जागेत इतर रेस्टॉरंट व क्लब कार्यरत होते. त्या काळात कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेने कारवाई केली नव्हती. ज्या जागेत बर्च क्लब सुरू होता, त्या रचनेत आम्ही कोणताही बदल किंवा फेरफार केलेला नाही. आम्ही या जागेचे मूळ मालक नसून सुरिंदर कुमार खोसला हे मालक आहेत. आम्ही ही जागा भाडेपट्टी करारावर घेतली होती.

हेही वाचा