ब्रिटिश अर्थव्यवस्थेला गती देण्यात भारतीयांची भरारी

Story: विश्वरंग |
09th January, 10:29 pm
ब्रिटिश अर्थव्यवस्थेला गती देण्यात भारतीयांची भरारी

ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला भारतीय समुदाय केवळ सामाजिकच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही त्या देशासाठी ‘मजबुतीची मिसाल’ ठरत असल्याचे एका नवीन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांनी गेल्या दशकभरात आर्थिक प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने (एलएसई) प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, ब्रिटनमधील भारतीयांच्या सरासरी संपत्तीत मोठी वाढ झाली असून, अनेक बाबतीत त्यांनी स्थानिक श्वेत ब्रिटिश समुदायालाही मागे टाकले आहे. याउलट, ब्रिटनमधील पाकिस्तानी समुदायाच्या आर्थिक स्थितीत मोठी घसरण झाल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

ब्रिटनमधील एकूण लोकसंख्येपैकी भारतीय समुदायाची संख्या मर्यादित असली, तरी देशाच्या एकूण उत्पन्नात आणि कराच्या स्वरूपात त्यांचे योगदान लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त आहे. ब्रिटनमधील अनेक मोठे उद्योगसमूह आणि 'स्टार्ट-अप्स'मध्ये भारतीय वंशाच्या लोकांचे नेतृत्व आहे. हजारो ब्रिटिश नागरिकांना रोजगार देण्याचे काम भारतीय उद्योजक करत आहेत. आयटी, आरोग्य आणि आर्थिक सेवा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत भारतीय व्यावसायिक आघाडीवर आहेत. ब्रिटिश आरोग्य व्यवस्थेत कार्यरत असलेले भारतीय डॉक्टर आणि परिचारिका ही या व्यवस्थेची मोठी ताकद मानली जाते.

‘एलएसई’च्या सेंटर फॉर अॅनॅलिसिस ऑफ सोशल एक्स्क्लूजनने २०१२-१४ ते २०२१-२३ या कालावधीतील आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. २०१२-१४ नंतर ब्रिटनमध्ये संपत्तीत झालेली वास्तविक वाढ प्रामुख्याने भारतीय आणि श्वेत ब्रिटिश समुदायापुरती मर्यादित राहिली. याच काळात पाकिस्तानी वंशाच्या लोकांच्या सरासरी संपत्तीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. बांगलादेशी आणि कृष्णवर्णीय आफ्रिकन-कॅरिबियन समुदायांची संपत्ती आजही शून्याच्या आसपास स्थिर आहे.

अहवालातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रिटनमध्ये जन्मलेल्या दुसऱ्या पिढीतील भारतीयांची कामगिरी. अभ्यासात असे दिसून आले आहे की, ब्रिटनमध्ये जन्मलेले भारतीय तरुण हे त्यांच्या पहिल्या पिढीतील भारतीयांपेक्षा अधिक कमवत आहेत. अनेक आर्थिक निकषांवर या तरुणांनी स्थानिक श्वेत ब्रिटिश समुदायालाही मागे टाकले आहे. घर खरेदी आणि विविध मालमत्तांमधील दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे भारतीय समुदायाला मोठी आर्थिक स्थिरता प्राप्त झाली आहे.

संशोधक डॉ. एलेनी करागियानाकी यांनी स्पष्ट केले की, हा अभ्यास कोणत्याही समुदायाची आर्थिक दिशा ठरवण्यात शिक्षण, योग्य रोजगार आणि वेळेत केलेली मालमत्ता निर्मिती किती महत्त्वाची असते, हे दर्शवतो. ब्रिटिश अकादमीच्या सहकार्याने हा शोधनिबंध तयार करण्यात आला असून, त्यामध्ये मागील दहा वर्षांतील आकडेवारीचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे.

- सुदेश दळवी