जून २०२२ मधील प्रकरणावर न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

म्हापसा: कोलवाळ कारागृहात जून २०२२ मध्ये उघडकीस आलेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी कायदेशीर घडामोड झाली आहे. मेरशी येथील अतिरीक्त सत्र न्यायालयाने या प्रकरणात सूरज शिवाजी गावडे (जेलगार्ड), विकट सुरेंद्र भगत (कारागृहातील कैदी) आणि योगेश नागेश पागी (ड्रग्ज पॅडलर) या तिन्ही संशयित आरोपींविरुद्ध आरोप निश्चितीचा (Framing of Charges) आदेश दिला आहे. न्यायाधीश क्षमा जोशी यांनी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) कलम २१(ब) आणि २९ अन्वये हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.
काय घडले होते नेमके?
हा ड्रग्ज तस्करीचा प्रकार २२ जून २०२२ रोजी उघडकीस आला होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जेलगार्ड सूरज गावडे (रा. कुंकळ्ळी) कारागृहात ड्युटीवर जाण्यासाठी जात असताना, कारागृहाच्या तपासणी नाक्यावरील राखीव दलाच्या पोलिसांना त्याच्यावर संशय आला. तपासणी केली असता, संशयित जेलगार्ड गावडे याच्याजवळ ४ ग्रॅम कोकेन (किंमत सुमारे ५२ हजार रुपये) सापडला.
राखीव दलाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुशांत जोशी यांनी तात्काळ ही माहिती कारागृह प्रशासन आणि कोलवाळ पोलिसांना दिली. कोलवाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून जेलगार्डला एनडीपीएस कायद्याखाली अटक केली व कोकेन जप्त केले.
तपासात उघड झालेली माहिती
चौकशीदरम्यान संशयित जेलगार्ड गावडे याने खुलासा केला की, हा ड्रग्ज त्याला योगेश पागी (रा. आगोंद, काणकोण) याने कैदी विकट भगत याला पुरवण्यासाठी दिला होता. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी २५ जून रोजी आरोपी पागी याला अटक केली आणि नंतर कैदी विकट भगत यालाही ताब्यात घेतले.
तपासात असेही उघड झाले की, कैदी भगत याने ड्रग्ज तस्करीसाठी पॅडलर योगेश पागी याच्याशी संपर्क साधण्यासाठी ज्या मोबाईल सिमचा वापर केला होता, ते सिम केसरकर नावाच्या व्यक्तीच्या नावावर होते आणि ते २०१७ मध्ये हरमल येथे हरवले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुणाल नाईक यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील एस. सावंत यांनी, तर आरोपींच्या वतीने ॲड. ए. गवंडळकर, ॲड. एम. नाझारेथ व ॲड. व्ही. वालादारीस यांनी युक्तिवाद केला. आता आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रकरणाची नियमित सुनावणी लवकरच सुरू होणार आहे.