माना तेरी नजर में, तेरा प्यार हम नहीं...

सुलक्षणा यांचा जन्म १२ जुलै १९५४ रोजी झाला. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी गायला सुरुवात केली. पुढे त्यांनी मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांच्या अनेक जाहीर कार्यक्रमांमधून गाणी गायलीत.

Story: प्रासंगिक |
3 hours ago
माना तेरी नजर में, तेरा प्यार  हम नहीं...

गुरुवारी ६ नोव्हेंबरला हिंदी चित्रपटसृष्टीतली प्रख्यात पार्श्वगायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांनी जगाचा निरोप घेतला. मंगेशकर भगिनींच्या साम्राज्यात ज्या काही  गायिकांना आपली  कला दाखवण्याची थोडी फार संधी मिळाली त्यातलं हे  एक नाव.  त्यांनी गायलेल्या गाण्यांपैकी काही गाणी अविस्मरणीय म्हणता येतील अशीच आहेत. वर्ष १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दूर का राही’ या सबकुछ  किशोरकुमार (निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता-गायक-संगीतकार) असलेल्या चित्रपटात त्यांनी किशोरकुमार सोबत गायलेलं ‘बेकरार दिल तू गाए जा...’ अतिशय भावपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. गीतकार ए. इर्शाद यांनी लिहिलेल्या ह्या गाण्याचे शब्द अर्थपूर्ण आहेत-

दर्द मे डूबी धून हो, सीने में इक सुलगन हो 

साँसों में हलकी चुभन हो, सहमी हुई धडकन हो 

दोहराते रहे बस गीत ये आ, दुनिया से रहे बेगाने 

बेकरार दिल तू गाए जा...

गुलजारसाहेबांच्या लेखणीतून उतरलेलं आणि संगीतकार कनू रॉय यांनी संगीतबद्ध केलेलं एक नितांत श्रवणीय गीत १९७९ साली आलेल्या ‘गृहप्रवेश’ मध्ये गायक भूपेंद्रसिंह सोबत त्यांनी गायलंय-

रात में घोले चाँद की मिसरी 

दिन के गम नमकीन लगते हैं 

नमकीन आँखो की नशीली बोलियाँ 

बोलिए सुरीली बोलियाँ…

सन १९७५ मधल्या ‘संकल्प’ या चित्रपटात त्यांनी एक अतिशय अर्थवाही प्रार्थना गायली आहे-

पाप क्या पुण्य क्या ये भूला दे

कर्म कर फल की चिंता मिटा दे

यह परीक्षा न होगी दोबारा 

धुंडता है तू किसका सहारा

तू ही सागर तू ही किनारा...


हे गाणं गीतकार  कैफी आझमी यांनी लिहिलं असून संगीतकार खय्याम यांनी स्वरसाज चढवला आहे. 

त्यांचं १९८१ मध्ये आलेल्या ‘आहिस्ता आहिस्ता’ या चित्रपटातलं ‘माना तेरी नजर में तेरा प्यार हम नहीं, कैसे कहे के तेरे तलबगार हम नहीं...’ हे दर्दभरं गाणं (गीतकार- नक्श लायलपुरी, संगीतकार- खय्याम) खासच आहे.

सुलक्षणा यांना संगीताचा कुटुंबातूनच वारसा लाभला होता. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक  पंडित जसराज त्यांचे काका होते. तर वडील प्रताप नारायण पंडीत हे  देखील शास्त्रीय गायक होते. सुलक्षणा यांना सात बहीण-भाऊ होते. विख्यात संगीतकार जोडी जतीन-ललित,  मंधीर हे भाऊ तर माया, संध्या आणि अभिनेत्री विजयता ह्या बहिणी. सुलक्षणा यांचा जन्म १२ जुलै १९५४ रोजी झाला. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी गायला सुरुवात केली. पुढे त्यांनी मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांच्या अनेक जाहीर कार्यक्रमांमधून गाणी गायलीत. 

 १९७५ मधल्या ‘उलझन’ या चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. संजीवकुमार यात त्यांचा नायक होता. नंतर त्यांनी तत्कालीन आघाडीच्या सर्वच अभिनेत्यांसमवेत काम केलं. उदा. शशी कपूर, राजेश खन्ना, विनोद खन्ना, जितेंद्र, ऋषी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, फिरोज खान  इत्यादि. जितेंद्र सोबत त्यांनी सर्वाधिक सिनेमे केले. त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. अभिनेता संजीवकुमार याच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. त्यांना त्याच्याशी लग्न करायचं होतं. पण संजीवकुमारने त्यांच्याशी लग्न केलं नाही. सुलक्षणा आणि संजीवकुमार विवाह बंधनात अडकले नाहीत मात्र त्यांच्यात अदृश्य असा प्रेमाचा धागा होता. संजीवकुमारला दारूचे भयंकर व्यसन होतं. त्यामुळे त्याचा अकाली मृत्यू झाला. सुलक्षणा यांनी हयात असे पर्यंत त्याची खूप काळजी घेतली. १९८५ मध्ये ६ नोव्हेंबरला संजीवकुमारचं निधन झालं. त्याच्या निधनाने सुलक्षणा यांना मोठा धक्का त्यांना बसला आणि त्या अवसादग्रस्त झाल्या. योगायोग असा की संजीवकुमारच्या स्मृती दिनीच सुलक्षणा यांनीही अखेरचा श्वास घेतला! 

१९६७ मधल्या ‘तकदीर’ या चित्रपटांत सुलक्षणा यांना पहिल्यांदा पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली. ती सुद्धा लता मंगेशकर सोबत! ‘सात समुंदर पार से, गुडिया के बाजार से...’ हे ते गाणं. (गीतकार- आनंद बक्षी, संगीतकार- लक्ष्मीकांत-प्यारेलाल) ‘संकल्प’ या चित्रपटातल्या ‘तू ही सागर है, तू ही किनारा’ या गाण्यासाठी त्यांना १९७६ चा उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत त्यांनी जवळपास ८० चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं. सख्खे बंधू लोकप्रिय आणि आघाडीचे संगीतकार (जतीन-ललित) असूनही त्यांनी सुलक्षणा यांना फारशी संधी दिली नाही! साधरणत: ३० चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचं दर्शन घडवलं. ‘अपनापन’, ‘हेराफेरी’, ‘खानदान’, ‘चेहरे पे चेहरा’, ‘धरम काटा’, ‘वक्त की दीवार’ ही काही उल्लेखनीय चित्रपटांची  नावं सांगता येतील. १९८०च्या ‘दो वक्त की रोटी’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘गंगा’ची भूमिका गाजली होती. वर्ष १९९६च्या ‘खामोशी-द-म्युझिकल’ या चित्रपटातलं उदित नारायण सोबत गायलेलं ‘सागर किनारे दो दिल है प्यासे...’ हे युगल गीत त्यांचं शेवटचं पार्श्वगायन असावं.

‘जिसके लिए सबकुछ छोडा...’ (सोबत –रफी/साजन की सहेली), ‘जब आती होगी याद मेरी...’ (रफी/फांसी), ‘सोमवार को हम मिले...’ (किशोरकुमार/अपनापन), ‘आंखो में तुम...’ (बप्पी लाहिरी/तेरे प्यार में), ‘परदेसीया तेरे देश में...’ (रफी/गरम खून), ‘जाना कहा...’ (बप्पी लाहिरी/चलते-चलते), ‘तुम से कहेना है के...’ ( चेहरे पे चेहरा), ‘ सपनों का राजा...’ (शैलेन्द्रसिंह/ चलते-चलते), ‘आज बहुत सी बाते हमने दिल से की...’ (जज्बात - गझल अल्बम), ‘घडी मिलन की आयी...’ (रफी/एक बाप छह बेटे), ‘चल चल कही अकेले में...’ (हेमलता/सलाखे), ‘मिल जाते है मिलनेवाले...’ (फांसी), ‘क्या जाने यह दुनिया क्या जाने...’ (अमितकुमार/टूटे खिलौने), ‘आज सोचा है खयालों में बुलाकर तुमको...’ (रफी/चेहरे पे चेहरा), ‘जब जब अपना मेल हुआ...’ (रफी/महुआ), ‘प्यार के बदले प्यार चाहिये...’ (पांचवी मंझील), ‘खाली प्याला धुंदला दर्पन...’ (स्पर्श), ‘इक बार कहो मुझे प्यार करती  हो...’ (बप्पी लाहिरी/इक बार कहो), ‘आज प्यारे-प्यारे से लगते है आप...’ (किशोरकुमार/उलझन), ‘देखो कान्हा नहीं मानत बतिया...’ (पायल की झंकार), ‘आसमान से तोड के तारे...’ (किशोरकुमार/वो दिन याद करो), ‘ये दुनिया है नकली...’ (किशोरकुमार/शंकर शंभू ), ‘खिले ना कागज के फुल...’ (किशोरकुमार/जमानत), ‘अरे प्यार किया है करेंगे...’ ( किशोरकुमार/ हंसते-खेलते) यासारखी श्रवणीय गाणी श्रोत्यांना देणाऱ्या गायिका आणि अभिनेत्री  सुलक्षणा पंडित यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 


- प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

(लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.)