
अमेरिका सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या सरकारी शटडाउनचा सामना करत आहे. या शटडाउनने आता ३६ दिवसांचा टप्पा ओलांडला असून, २०१८-१९ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात झालेल्या ३५ दिवसांच्या शटडाउनचा विक्रम मोडला आहे.
हा शटडाउन १ ऑक्टोबरपासून सुरू झाला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर्सनी त्या फंडिंग बिलाला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला, ज्यामध्ये ‘ओबामाकेअर’ अंतर्गत मिळणारे कर क्रेडिट वाढवण्याची तरतूद नव्हती. जर हे कर क्रेडिट २०२५ मध्ये संपुष्टात आले, तर लाखो अमेरिकन नागरिकांसाठी आरोग्य विमा घेणे अत्यंत कठीण होईल.
रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजने सप्टेंबरमध्ये एक बिल पास केले होते, पण त्याला केवळ एका डेमोक्रॅट खासदाराने पाठिंबा दिला. तेव्हापासून स्पीकर माईक जॉन्सन यांनी हाऊसच्या बैठका स्थगित ठेवल्या. सध्या सिनेटमध्ये चर्चा सुरू आहे, जिथे नेते जॉन थ्यून यांनी बिलावर १४ वेळा मतदान घेतले, पण प्रत्येक वेळी त्यांना अपयश आले.
१०० सदस्य असलेल्या सिनेटमध्ये बिल पास करण्यासाठी ६० मतांची गरज आहे. रिपब्लिकन ५३, डेमोक्रॅट ४५ आणि २ अपक्ष अशी संख्या असताना, शेवटच्या मतदानात ५४-४४ असा निकाल लागला. रिपब्लिकन विजयाच्या जवळ होते, पण डेमोक्रॅट्सचा आवश्यक पाठिंबा मिळू शकला नाही.
या शटडाउनमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसनल बजेट ऑफिसनुसार, शटडाउनने चार आठवड्यांचा टप्पा पार करेपर्यंत ७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. जर हा कालावधी सहा आठवड्यांपर्यंत वाढला, तर हा तोटा ११ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. फूड स्टॅम्प्सवर अवलंबून असलेल्या ४२ दशलक्ष (४.२ कोटी) अमेरिकन नागरिकांना १ नोव्हेंबरपासून त्यांचे मासिक वेतन मिळालेले नाही. दोन संघीय न्यायालयांनी सरकारला आदेश दिला आहे की, ९ अब्ज डॉलर्सची गरज पूर्ण करण्यासाठी तातडीने आपत्कालीन फंडातून ४.६५ अब्ज डॉलर्स जारी करावेत.
शटडाउनमुळे सुमारे ६.७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना घरी बसवण्यात आले आहे आणि त्यांना सध्या वेतन दिले जात नाही. यामुळे सरकारची रोज ४० कोटी डॉलर्सची बचत होत आहे. दुसरीकडे, अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेले सुमारे ७.३ लाख कर्मचारी अद्याप काम करत आहेत, परंतु त्यांनाही वेतन मिळालेले नाही.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली की, एका देशभक्त नागरिकाने सैनिकांसाठी १३० दशलक्ष (१३ कोटी) डॉलर्सचे दान दिले आहे. हे दान मेलॉन बँकिंग कुटुंबातील अब्जाधीश टिमोथी मेलॉन यांनी दिले आहे.
- सुदेश दळवी