‘शिंपण’ : सुभाष बाळकृष्ण जाण

सुभाष बाळकृष्ण जाण यांच्या ‘शिंपण’ या पुस्तकातून गोमंतकीय संस्कृती, बालपणीच्या गोड आठवणी आणि माणुसकीच्या नात्यांचा सुगंध उलगडला आहे. हे केवळ आठवणींचे संकलन नसून संस्कारमूल्ये आणि गोमंतकीय संस्कृतीचे भावनिक सिंचन आहे.

Story: वाचनीय |
07th November, 10:15 pm
‘शिंपण’ : सुभाष बाळकृष्ण जाण

‘शिंपण’ या सुभाष जाण यांच्या पुस्तकात लेखक आपल्या बालपणातील गोड आठवणी, संस्कारमूल्ये आणि गोमंतकीय संस्कृतीचा सुगंध अत्यंत आत्मीयतेने उलगडला आहे. त्यांच्या लेखनातून बालपणातील साधेपणा, गावातील जीवन, नाती आणि भावविश्वाचा ओलावा वाचकांच्या मनात सहज झिरपतो.

‘चतुर्थी’ या प्रकरणात लेखक आपल्या बालपणीच्या अनुभवांकडे वळतात. या सणाच्या तयारीत स्त्रिया, पुरुष आणि मुले सगळेच उत्साहाने सहभागी होत असत, हे ते सांगतात. या वर्णनातून घरातील नात्यांचे ऊबदार चित्र आणि संस्कारांचा वारसा जिवंत होतो. लेखक आपल्या आईबद्दल बोलताना अत्यंत संवेदनशील होतात. आईकडून मिळालेल्या जीवनमूल्यांचा आणि शिक्षणाचा प्रभाव त्यांनी हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त केला आहे. “हे पुस्तक म्हणजे माझं पहिलं आपत्य आहे,” या त्यांच्या विधानातून आईवरील भावनात्मक नात्याची खोली आणि लेखकाच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय येतो.

‘पयरो’ या लेखात गोव्यातील शेती, पाणी देण्याची पद्धत आणि पारंपरिक जीवनशैलीचे वास्तव त्यांनी जिवंत केले आहे. बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ तिथेच स्पष्ट करून वाचकांसाठी वाचन अधिक सुलभ केले आहे.

लेखकाच्या लेखनात नात्यांची ओढ सर्वत्र जाणवते. कुंदा मावशी आणि गुरूजनांविषयीची कृतज्ञता त्यांनी साध्या पण हळुवार शब्दांत व्यक्त केली आहे. मावशीच्या साध्या आयुष्याचे आणि तिच्या भावनांचे त्यांनी केलेले चित्रण अत्यंत सूक्ष्म व हृदयस्पर्शी आहे. ‘प्रारब्ध’ या लेखात आईच्या आजारपणाचा उल्लेख करताना ते अत्यंत भावनिक होत जातात. “कलांडून गाढ झोपलेली आई पाहून माझ्या केलेल्या धावपळीचा थकवा शेकडो कोस दूर पळून गेला” — या वाक्यातील साधेपणातही अपार प्रेम दडलेले आहे.

नाटकाविषयीची त्यांची आवड, कोविडकाळातील अनुभव, विद्यार्थ्यांशी असलेले नाते या सर्व गोष्टींमधून त्यांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. ‘नीरफणस’ सारख्या छोट्या प्रसंगातून ते वाचकाला थेट गावाकडे घेऊन जातात. प्रत्येक लेखातून “गाव, संस्कृती आणि माणूस” यांचं शिंपण अनुभवायला मिळतं.

या पुस्तकात सुमारे २५ लेख आहेत. ‘पयरो’, ‘चतुर्थी’, ‘प्रारब्ध’, ‘दादा वैद्य’ यांसारखे लेख वेगवेगळ्या व्यक्ती, प्रसंग, सण आणि अनुभवांवर आधारित आहेत. प्रत्येक लेख वाचताना वाचकाला लेखकाबरोबरच त्या काळात, त्या गावात आणि त्या भावविश्वात प्रवेश झाल्याचा भास होतो.

डॉ. विद्या प्रभूदेसाई यांनी केलेले संपादकीय लेखनाला दिशा देते आणि वाचनाची उत्कंठा वाढवते. स्थानिक शब्दांच्या अर्थांसह, जसे ‘रतीब’, ‘पयरो’, लेखकाने केवळ भाषेचे नव्हे तर संस्कृतीचेही जतन केले आहे. संपूर्ण पुस्तकातून जाणवणारी गोष्ट म्हणजे ‘शिंपण’ हे फक्त आठवणींचं संकलन नसून गोमंतकीय संस्कृती, नाती, संस्कार आणि संवेदना यांचा भावपूर्ण साक्षात्कार आहे. लेखक आणि वाचक यांच्यातील तो संवादच या पुस्तकाची खरी ‘शिंपण’ आहे.

  पुस्तक परिचय : शिंपण

  लेखक : सुभाष बाळकृष्ण जाण


सौ. स्नेहा बाबी मळीक