
मडगाव : गुळे काणकोण येथे पत्नी सविता देवी हिचा खून केल्याप्रकरणी अजय उर्फ गुलझारिया मलिक याला काणकोण पोलिसांनी अटक केली होती. दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित अजय याची खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
अजय उर्फ गुलझारिया मलिक याला पत्नी सविता हिच्या खूनप्रकरणी काणकोण पोलिसांनी बिहार येथून अटक केली होती. १९ एप्रिल २०२२ रोजी सविता मलिक हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत गुळे काणकोण येथील सरकारी प्राथमिक शाळेनजीकच्या वन खात्याच्या कार्यालयामागे आढळून आला होता. तिचा दुपट्ट्याने गळा आवळून खून करण्यात आला होता. तांत्रिक देखरेख व गुप्तचरांच्या मदतीने काणकोण पोलिसांनी २० दिवस खगारिया बिहार येथील परिसरात शोध घेत अजय उर्फ गुलझारिया मलिक याला अटक केली होती. अजय याने बाजार करण्याच्या निमित्ताने पत्नी सविता हिला कदंब बसमधून काणकोण येथे नेले होते. त्यानंतर तिला गुळे काणकोण येथे नेत खून केला होता. न्यायालयात याप्रकरणी संशयिताविरोधात खटला चालला. मात्र, सरकारी पक्ष अजय याच्यावरील आरोप पुराव्यानिशी सिद्ध करू शकला नाही. आरोप सिद्ध होत नसल्याने न्यायालयाकडून संशयित अजय याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.