नवरात्रीतल्या देवाच्या तरंगा..!

तरंगा मानाच्या घरी पोहचतात आणि ते घर देवाच्या आशीर्वादानं भरून पावतं. या निमित्ताने घरी देवाचा प्रसाद सर्वांना मिळतो. नकळत एक सोहळाच रंगतो. खरंतर या तरंगा मनाला तरंगायला लावतात. मन सारं विसरून देवाच्या अदृश्य अस्तित्वाच्या रुपाला शोधत राहतं. नवा ध्यास, नवी ऊर्जा, नव्या श्रद्धा पुन्हा उरात निर्माण होतात.

Story: विशेष |
05th October, 12:02 am
नवरात्रीतल्या देवाच्या तरंगा..!

आताच नवरात्रीचा उत्साह आपण सगळ्यांनी अनुभवला. देवीच्या नऊ रूपांचे लावण्य पाहून दंग व्हायला होतं. पण फक्त देवीचाच हा उत्सव नसून आपल्या इतर सर्व देवांचा हा सोहळा. नवरात्री म्हटलं की आजकाल गरबा, दांडिया आणि नाचणारी पिढी डोळ्यांसमोर येते. परंपरांना स्वैर रूप देऊन चाललेला धिंगाणा आजकाल नवा नाही तरीही याकडे थोडं दुर्लक्ष केलं तर या दिवसांत डोळ्यांपुढे तरंगा घेऊन नाचणारे पाहिले की भारावून जायला होतं. पारंपरिक वाद्ये ताल धरतात आणि इकडून तिकडे तालावर फिरणाऱ्या तरंगा भान हरपून टाकतात. 

रवळनाथ, सातेरी - भूमिका ही या मातीतली देवस्थानं. हजारो वर्षांच्या परंपरांचे साक्षीदार असलेल्या ह्या पाषाण मुर्त्या आणि देवीची वारूळं या धरेशी आपलं नातं सांगतात. इथला प्रत्येक गोंयकार आपली श्रद्धा आपल्या देवता चरणी ठेवून आहे. नवरात्रीची चाहूल लागताच देवळांचं रूपडं बदलायला लागतं. भिंती घासून पुसूच स्वच्छ होतात आणि काहीशा पावसानं शेवाळालेल्या भिंती लख्ख होऊन चमकायला लागतात. देवाचे टाक, पितळी समया, दिवे घासून ठेवले जातात. नऊ दिवसाचे नियोजन अगदी छोटेखानी चर्चेतून पार पडते. 

नवरात्र सुरू होते तसे देऊळ अधिकच प्रसन्न वाटायला लागते. स्पीकरवर वाजणारी भक्तीगीते अगदी डोळे मिटून आहे तिथे ताल धरायला लावतात. रोजची पूजा, भजने आपली सेवा देण्यात दंग असतात. या निमित्ताने का असेना, पारगावी काही कारणांनी वास्तव्यास असलेले घरी - गावी परततात. गावाला - वाड्याला जत्रेचं रूप येतं. एकमेकांची विचारपूस होते. हा सण फक्त देवाचा नसतो. तो असतो इथल्या प्रत्येक नात्याचा, आपुलकीच्या चौकशीचा आणि आपल्या मातीशी भेट घडवून आणणारा. 

देवळात देवाच्या तरंगा जशा सजायला लागतात तसे वातावरण कूस बदलायला लागते. मग वाद्यांचा आवाज घुमायला लागतो. संध्याकाळी देवळाभोवती प्रदक्षिणा सुरू झाल्या की फिरणाऱ्या तरंगा डोळ्यांत समावून घेत रहावंसं वाटतं. काहीशा जड असणाऱ्या तरंगा आवरत सावरत खांद्याला पेलून धरणारा गडी वेगळ्याच जोशात असतो. हा भक्तीभाव असाच पुढेही टिकून रहायला हवा. तरंगांची इकडे-तिकडे झुलणारी रंगीबेरंगी कपड्याची बांधणी पाहिली की भारून जायला होतं. त्यावरती असलेला हात सदैव आशीर्वाद देत राहतो. घेणाऱ्याने तो भरभरून घ्यावा. नवरात्रीत नऊवारीत बायकांचं रूप देवीशी साजेसं वाटतं. भार आला की त्यापुढं आपल्या आणि कुटुंबाच्या खुशालीसाठी श्रीफळ अर्पण करायला गर्दी होते. ही गर्दी निर्मळ श्रद्धेचं द्योतकच नाही का...? 

तरंगा मानाच्या घरी पोहचतात आणि ते घर देवाच्या आशीर्वादानं भरून पावतं. या निमित्ताने घरी देवाचा प्रसाद सर्वांना मिळतो. नकळत एक सोहळाच रंगतो. खरंतर या तरंगा मनाला तरंगायला लावतात. मन सारं विसरून देवाच्या अदृश्य अस्तित्वाच्या रुपाला शोधत राहतं. नवा ध्यास, नवी ऊर्जा, नव्या श्रद्धा पुन्हा उरात निर्माण होतात. खरंतर हिच खरी किमया या आपल्या दैवतांमधली आणि आपल्या मातीमधली. या तरंगा जशा उंच उठत रहातात तशा मनातल्या श्रद्धाही आपल्या दैवतांप्रती लीन असल्या पाहिजेत असे मनोमन वाटते. देव दिसेल की नाही माहीत नाही पण तो अनुभवता येतो हे मात्र नक्की. हा अनुभव या तरंगा नक्की देतात. 


प्रा. सागर मच्छिन्द्र डवरी