भोवाड्याचे फुगडी गीत

चौथीचा खेळ खेळत असताना चुकून वहिनीची नेसलेली साडी साळूच्या हातून फाटते म्हणून वहिनी आपल्या ह्या निरागस नणंदेवर कोपते. फाटलेल्या साडी चोळीचा बदला म्हणून शाळेचे शीर कापून तिच्या रक्तामध्ये साडी भिजवून आणण्याचा हट्ट वहिनी आपल्या नवऱ्याकडे सुभानकडे करते.

Story: भरजरी |
05th October, 03:49 am
भोवाड्याचे फुगडी गीत

माहेरी येऊन चार दिवस सुखात घालवावे म्हणून आलेल्या साळूला सुभान तिला तिच्या सासरी पोचवतो असे सांगून घरातून घेऊन जातो. वाट चालताना साळूच्या लक्षात येते की ही तिच्या सासरची वाट नाही. पण तरीही ती भावावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जावे लागते.

गेली काय दुसऱ्या बना
आरे रे सुबाना बंदवा
माका काय न्हिदरा आली
दी रे ती तुजी ती उजवी मांडी

भाऊ घनदाट अरण्यात पोहोचतो. चालून चालून थकलेली साळू भावाला सांगते, दादा मला झोप येत आहे. मला तुझी उजवी मांडी दे, मी मांडीवर डोके ठेवून काही वेळ झोपते. पण भावाच्या मनात कपट असते. त्यामुळे भाऊ तिला उजवी मांडी न देता डावी मांडी देतो. साळू डाव्या मांडीवर निवांत झोपते. अशावेळी संधी साधून भाऊ आपल्या खिशातून सुरी काढतो. त्या सुरीने साळूची हुरी मारतो. म्हणजेच शिरच्छेद करतो. आणि घरी परततो.

दिली गे डाई ही मांडी 
उशाक घातली कड्डाची पेंडी 
काडली बोलासतली सुरी
मारिली साळूच्या हुरी
जाली गे रक्ताची तळी 
तेतुन बुडयली साडी नी गे चोळी 
केली गे तीपट घडी 
घातली बोलासाचे दुडी 

आजूबाजूला गवताची पेंडी ठेवून तिचे रक्त एकाच जागी साठवून राहील अशी व्यवस्था करतो. रक्ताची तळी झाल्यावर त्यामध्ये आपल्या बायकोची फाटलेली साडी चोळी काढून रक्तात ती भिजवतो. रक्तात भिजवलेल्या साडीची व्यवस्थित घडी घालून खिशात परत ठेवतो. निव्वळ स्त्रीहट्टापुढे आंधळा झालेला हा भाऊ क्रौर्याची परिसीमा गाठतो. 

पाठीला पाठ लावून आलेला भाऊ साळूचा आत्मघात करतो. पण तिचा धर्माचा पती मात्र तिच्यावर अपार प्रेम करत असतो. इकडे साळूचा घातपात होतो आणि सासरी साळूच्या भरताराला दृष्टांत होतो. स्वप्नी पाहिलेली घटना आपल्या मातेला सांगून साळूचा भरतार आपल्या मावाड्याची वाट धरतो. 

गेली गे भारताराच्या सपनी 
साळूचो भरतार गडबड्या उठे 
गडबड्या उठाना सपान  सांगे
येईलो आपल्या मावाड्या
साळूच्या मातेने दूर असून देखिला 
उजव्या हाती म्हणी घे डाव्या हाती पाणी 
नाको तुमचा पाणी गे 
जळो तुमची म्हणी 
जलद पाठया आमची राणी 
तुमच्या राणीक पाठविल्या लय दिस झाले 

जावई मावळ्याला येतो म्हटल्यावर जो उत्साह लेकीच्या आईच्या अंगात संचारतो, त्यात उत्साहाने साळूची आई पाणी म्हणे घेऊन त्याच्या स्वागतासाठी सामोरी जाते. पण आपल्याला झालेल्या दृष्टांतामुळे बेचैन झालेला साळेचा नवरा स्वागताचा स्वीकार न करता आपल्या राणीबद्दल म्हणजेच साळूची विचारपूस करतो. हे ऐकून साळूची आई अचंबित होते. आणि सांगते की साळूला पाठवून खूप दिवस झाले. 

पण नंतर तिला शंका येते. पुत्र सुभान साळूला घेऊन गेला होता. पण साळू सासरी पोहचली नाही. ते आपल्या पुत्राला याचा जाब विचारते. सुरुवातीला तो नकार देतो. साळूचे आई-वडील आपले सत्त्व एकत्र करून अमृत कुपी तयार करतात. आपल्या पुत्राला साळूची सारी म्हणजेच तिच्या अस्थी दाखवायला सांगतात. तो कुत्र्याची सारी दाखवतो. अमृत कुपी फिरवताच कुत्रा जिवंत होतो.

अरेरे सुबाना  पूत्रा
दाखय रे माझ्या काय साळूची सारी 
दाखवली कुत्र्याची सारे 
शिपली अमृत कुपी 
कुत्र्याक केला सजीवान

शेवटी सुभानाचा नाईलाज होतो. नाईलाजानेच का होईना पण आपले कृत्य सर्वांसमोर उघडे करतो. आपल्या मुलीवर अपार प्रेम करणाऱ्या आई-वडिलांवर आणि आपल्या बायकोवर नितांत प्रेम करणाऱ्या साळूच्या नवऱ्यावर आभाळ कोसळते. 

अरेरे सुबाना पूत्रा
दाखय रे माझ्या काय साळूची सारी 
दाखवली साळूची सारे 
शिपली अमृत कुपी 
भोंवडली बॅत नि खाटी 
साळूक केला सजीवान 

साळूची आई पुन्हा एकदा दाखवलेल्या साऱ्यांवर अमृतकुपी शिंपडून ती सारी सजीवान म्हणजे जिवंत करते. अस्थीमधून त्यांची लाडकी साळू जिवंत होते. आपल्या लेकीला पुन्हा जिवंत झालेले पाहून आई-वडिलांना भरून येते. नवऱ्यालाही अपार आनंद होतो. 

माता नी पित्याच्या काय चरणी लागली 
भावाची गळी अरणली 
माहेरचे वाटे गे भाभरीचे काटे
सासऱ्याचे वाटे गे फुलले गे चाफे
चला गे झाला सयांनो 
फुगडी घाला बायांनो 

नवीन जीवन मिळालेली साळू आपल्या मायेच्या माणसांच्या चरणी लागते. नवऱ्याच्या चरणी लागते म्हणजेच नमस्कार करते. आणि काळ बनून आलेल्या भावाला मात्र धिक्कारते. तिला समजून चुकते की जे माहेर कोणी एका काळी तिचे घर होते, ज्या घरामध्ये ती लहानाची मोठी झाली, ज्या भावावर तिने अस्सीम प्रेम केले तो भाऊ आपल्या बायकोच्या अघोरी हट्टापुढे नमता झाला, लाचार झाला. आजवर जे घर तिला फुलांचे आगर वाटायचे, त्याच माहेराच्या वाटेवर बाभळीचे काटे फुलल्यासारखे तिला वाटले. आणि ज्या सासरी तिचे मन रमत नव्हते, तिला परकेपणा वाटत होता, आज ती सासरची वाट चाफ्याच्या फुलांनी बहरून आल्यासारखी वाटली. कारण जेव्हा तिचा घातपात झाला तेव्हा तिचा नवरा तिच्या काळजाची हाक ऐकून तिच्या रक्षणासाठी धावून आला.

ही निव्वळ एक लोककथा नाही, तर समाजाचे विदारक सत्य आहे. जसा आगीशिवाय धूर निघत नसतो, तसेच घटना घडल्याशिवाय त्याची कहाणी होत नसते. इतिहासात कुठेतरी ह्या अशा प्रकारच्या घटना घडल्या असतील जिथे स्त्रीला नाहक स्वतःचा बळी द्यावा लागला असेल. तो आजही द्यावा लागतो. 

लोककथा, लोकगीते फक्त मनोरंजनासाठी नसतात. समाजाच्या विविध अंगाचे दर्शनही यातून होत असते. मानसिकतेचे दर्शन होत असते. याच लोकगीतामधून दर्शन झालेली वानगी लक्षात ठेवून येणाऱ्या पिढीने नवीन इतिहास घडवायचा असतो. समाजाला लागलेला काळीमा पुसून टाकायचा असतो. 


गाैतमी चाेर्लेकर गावस