मागील आठवड्यात कर्नाटक उच्च न्यायालयात बलात्काराच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. न्यायालयाने आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. निर्णय देताना न्यायालयाने ‘मनुस्मृति’चा उल्लेख करून स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षण करण्याची आवश्यकता स्पष्ट केली. ज्या ‘मनुस्मृति’ला तथाकथित विचारवंतांनी दूषणे दिली, तिचा उल्लेख उच्च न्यायालयाने निवाडा देताना करावा, हे धक्कादायक वाटले. यामुळेच ‘मनुस्मृति’ आहे तरी काय, याबद्दल कुतुहलापोटी ‘गुगल’वर सर्च केले असता अनेक सकारात्मक गोष्टी लक्षात आल्या. यापूर्वीही अनेक न्यायालयांनी निर्णय देताना या ग्रंथातील श्लोक उद्धृत केल्याचेही दिसून आले.
कर्नाटक उच्च न्यायालयातील प्रकरण बिहारमधील बांका येथील १९ वर्षीय आदिवासी युवतीच्या बलात्काराशी संबंधित आहे. निवाडा देताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिदैया रचैया यांनी ‘मनुस्मृति’तील ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः । – (अध्याय ३, श्लोक ५६) हा श्लोक उद्धृत केला. याचा अर्थ आहे – ‘जिथे स्त्रियांचा सन्मान होतो, तिथे देवता वास करतात आणि जिथे त्यांचा अपमान होतो, तिथे सर्व कर्मांचे महत्त्व कमी होते.’
यापूर्वीही न्यायाधिशांनी घेतला
‘मनुस्मृति’चा आधार
महर्षी मनु जन्माने ब्राह्मण नाहीत, तर क्षत्रिय. ते इक्ष्वाकु म्हणजेच भगवान श्रीरामाच्या वंशातील होत. भारताचा पहिला कायदाकर्ता अशी ओळख असलेल्या महर्षी मनुचा पुतळा राजस्थान उच्च न्यायालयाच्या परिसरात उभारला आहे. ‘मनुस्मृति’चा आधार यापूर्वीही न्यायाधिशांनी निवाडा देताना घेतला आहे. झारखंड उच्च न्यायालयाने भारतीय विवाहांमधील सांस्कृतिक जबाबदारीवर भर देत ‘मनुस्मृति’तील काही मुद्द्यांचा उल्लेख करून नमूद केले की, ‘पत्नीने पतीच्या कुटुंबातील वृद्ध सदस्यांची सेवा करणे अनिवार्य आहे.’ आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या वडिलांना उज्जैनमध्ये विशेष न्यायाधिशांनी (पॉक्सो कायदा) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निवाडा देण्यापूर्वी विशेष न्यायाधीश डॉ. आरती शुक्ला पांडेय यांनी ‘मनुस्मृती’तील श्लोक वाचला आणि त्याचे हिंदीत भाषांतरही सांगितले. ‘पिताचार्यः सुहृन्माता भार्या पुत्रः पुरोहितः। नादण्ड्यो नाम राज्ञोऽस्ति यः स्वधर्मे न तिष्ठति।।’ (अध्याय ८, श्लोक ३३५) अर्थात ‘वडील, आचार्य, मित्र, आई, पत्नी, पुत्र किंवा पुरोहित यांनी स्वधर्माचे पालन केले नाही, तर ते राजासाठी आदरणीय असू शकत नाहीत. राजाने त्यांना अवश्य दंड करावा.’
डॉ. आंबेडकरांचे
‘मनुस्मृति’विषयी कौतुकोद्गार
भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही ‘मनुस्मृति’विषयी कौतुकोद्गार काढले आहेत. २४ फेब्रुवारी १९४७ रोजी ‘संविधान निर्मिती सभे’त डॉ. बाबासाहेब म्हणाले, ‘‘ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या, त्यांच्यामध्ये याज्ञवल्क्य आणि मनु यांच्या स्मृती अव्वल दर्जाच्या आहेत. दोघांनीही मुलींना पैतृक (पित्याच्या) संपत्तीचा एक चतुर्थांश हिस्सा दिला आहे. मनुस्मृति अध्याय ९, श्लोक ११७ मध्ये म्हटले आहे, ‘सर्व बंधूंचे कर्तव्य आहे की, आपल्या हिश्श्यातील चौथा भाग बहिणींना द्यावा. असे न करणार्या भावांना पतित म्हटले जाते.’’ ११ जानेवारी १९५० रोजी सिद्धार्थ महाविद्यालयात डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘‘मी घटस्फोटासाठी पराशर स्मृतीचा, स्त्रियांच्या अधिकारासाठी बृहस्पती स्मृतीचा आणि वारसा हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.’’
‘मनुस्मृति’चे ब्राह्मणवादाला
प्रोत्साहन नाही
‘मनुस्मृति’ दलितविरोधी नाही किंवा ब्राह्मणवादाला प्रोत्साहन देत नाही. ती फक्त मानवी कर्तव्यांबद्दल बोलते. दलित हा शब्द प्राचीन संस्कृतीत अस्तित्वातच नव्हता. चातुर्वण्य म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या चार जाती नाहीत, तर मनुष्याच्या चार श्रेणी आहेत, ज्या त्याच्या गुणवत्तेवर आधारित आहेत. मनु म्हणतो : 'जन जयते शूद्र' म्हणजेच सर्व मानव शूद्र म्हणून जन्माला येतात. पुढे गुणवत्तेच्या आधारे तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र होतो. महर्षी मनु म्हणतो ‘शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम। क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च।’ (अध्याय १० श्लोक ६५) अर्थात कर्मानुसार ब्राह्मणाला शूद्रत्व प्राप्त होते आणि शूद्राला ब्राह्मणत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे क्षत्रिय आणि वैश्यांपासून जन्मलेली मुलेही इतर वर्णांमध्ये जातात. ज्ञान आणि क्षमतेनुसार सर्व वर्णांची मुले इतर वर्णांमध्ये जाऊ शकतात. एखादी व्यक्ती शूद्रापासून ब्राह्मण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. उदा. भगवान श्रीरामाचे गुरु वशिष्ठ महाशूद्र चांडाल यांचे पुत्र होते, परंतु सामर्थ्याच्या जोरावर ते ब्रह्मर्षी बनले. मच्छीमार आईचा मुलगा व्यास ‘महर्षी व्यास’ झाला. विश्वामित्र आपल्या क्षमतेने क्षत्रियापासून ब्रह्मर्षी झाले.
‘मनुस्मृती’ किंवा भारतीय धर्मग्रंथ मूळ स्वरूपात आणि त्याचा खरा अर्थ समजून घेऊन वाचले पाहिजेत. विद्वानांनीही योग्य आणि मूळ गोष्टी समोर आणल्या पाहिजेत, तरच लोकांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
- प्रदीप जोशी