‘विजयरथ’

भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या या स्वाभिमानी वागणुकीचे कौतुकच व्हायला हवे. खेळात राजकारण आणणे चुकीचे असले तरीही भारतीय खेळाडूंना नक्वींकडून चषक घ्यायचा नव्हता, यातून पाकिस्तानविरोधात भारतीय खेळाडूंच्या मनात असलेला संतापही दिसून येतो.

Story: संपादकीय |
30th September, 12:05 am
‘विजयरथ’

विजयादशमीचे वातावरण देशात असताना आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शेवटच्या क्षणी सर्वांच्याच काळजाचे ठोके वाढवून विजयरथ खेचून आणलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन व्हायलाच हवे, तसेच तिलक वर्मा सारख्या खेळाडूने पेललेल्या आव्हानाचे कौतुकही व्हायला हवे. अंतिम सामना कसा असावा त्याचे उदाहरण म्हणजे आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामना आणि त्यात माजलेला पाकिस्तानी संघ भारताच्या विरोधात उभा ठाकला होता. मॅच सुरू झाल्यापासूनच पाकिस्तानच्या खेळाडूंचे कारनामे लाईव्ह दिसत होते. खेळाडू तर खेळाडूच, पण काही पाकिस्तान क्रिकेट चाहतेही भारतीय संघाला डिवचत होते. कोणी विमान पाडल्याचे हावभाव करून दाखवत होता, तर कोणी चौकार मारल्यानंतर हसत होता.

भारत पाकिस्तानचे संबंध बिघडलेले असताना आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची जगभर चर्चा असताना भारतीय क्रिकेट संघाच्या तावडीत पाकिस्तानचा संघ सापडला होता. या मालिकेतही दोघांमध्ये सामने झाले, पण शेवटी हे दोन्ही संघ एकत्र येतील असे कोणाला वाटले नव्हते. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने गोलंदाजी घेऊन पाकिस्तानला फलंदाजी दिली. हार्दिक पांड्या सारखा ऑल राऊंडर खेळाडू संघात नव्हता. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना बाद करण्यातही अपयश आल्यामुळे नेमके काय होणार, अशी चिंता भारतीय क्रिकेट चाहत्यांना होती. शेवटी १४६ धावांवर पाकिस्तान सर्वबाद झाल्यानंतर भारतीय खेळाडू आणि चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. कारण एवढी धावसंख्या भारतासाठी डाव्या हाताचा खेळ होता. पण फलंदाजी करताना भारतीय खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचेही अंदाज चुकले. नको त्या चेंडूवर संधी घेण्याच्या नादात भारताचे चांगले खेळाडू बाद झाले. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, शुभमन गील हे विश्वासाचे खेळाडू फलंदाजीत संघासाठी फार काही करू शकले नाहीत. धावसंख्याही मोठ्या प्रयासाने उभी राहू लागली. त्यानंतर प्रत्येक चेंडू हा धडकी भरवणाराच होता. पण तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन सारख्या खेळाडूंनी सामन्याला विजयाच्या जवळ नेले. तिलक वर्माची खेळी ही संस्मरणीय होती. शेवटी मालिकेत प्रथमच मैदानात उतरलेल्या रिंकू सिंगने भारताचा विजय आपल्या चौकाराने घोषित केला. 

पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी या मालिकेत भारताच्या विरोधात खेळताना केलेल्या असभ्य वर्तवणुकीला प्रत्युत्तर भारतीय खेळाडूंनी सभ्यतेनेच दिले. वेळ येण्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी कुठलाच आततायीपणा केला नाही. जिंकल्यानंतर खेळाडूंच्या आणि भारतीयांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. दसऱ्याच्या मुहूर्तावर पाकिस्तानला नामोहरम करून विजयरथ खेचून आणण्याचे काम भारतीय खेळाडूंनी केले होते. सामना जिंकून, पाकिस्तानचा माज जिरवून भारतीय खेळाडू गप्प बसले नाहीत, सामना संपल्यानंतरही भारतीय संघाने स्वाभिमान दाखवला. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हातून चषक स्वीकारायचा नाही, असे ठरवून संघाने व्यासपीठावर जाणेच टाळले. त्यावरूनच सध्या गदारोळ उठलेला आहे. नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आशिया क्रिकेट मंडळाचेही अध्यक्ष आहेत. पुरस्कार वितरणावेळी जेव्हा भारतीय खेळाडू वैयक्तिक बक्षिसे स्वीकारत होते, त्यावेळी व्यासपीठावर असलेल्या नक्वी यांचे हात टाळ्यांसाठीही उठत नव्हते. त्यांच्या मनात भारतीय खेळाडू आणि भारताविषयी असलेला आकस स्पष्ट दिसत होता. त्यांच्याकडून चषक स्वीकारायचा नाही, असे कर्णधार सूर्यकुमारने आधीच आयोजकांना कळवल्यामुळे आयोजकांनीही तसे जाहीर केले. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला पराभूत केले, यातच भारतीय संघाला परमोच्च आनंद मिळाला. त्यामुळे चषक मिरवण्यात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते. या विजयासाठी पाकिस्तानच्या मंत्र्याच्या हातून चषक घेणे हे आणखी अपमानास्पद वाटलेच, पण पाकिस्तानच्या नेत्याला निराश करण्याची भारतीय खेळाडूंची कृती त्यांच्या दृष्टीने स्वाभिमानाचीच आहे. आशिया चषक नक्वी यांनी आपल्याकडे ठेवला असला तरी विजय भारताचा झाला आहे, हे सत्य जगाने स्वीकारले आहे. त्यामुळे चषक नसला तरीही विजयाच्या यादीत भारताचे नाव राहणार आहे. भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या या स्वाभिमानी वागणुकीचे कौतुकच व्हायला हवे. खेळात राजकारण आणणे चुकीचे असले तरीही भारतीय खेळाडूंना नक्वींकडून चषक घ्यायचा नव्हता, यातून पाकिस्तानविरोधात भारतीय खेळाडूंच्या मनात असलेला संतापही दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विजय ‘मैदानातील सिंदूर ऑपरेशन’ म्हटले आहे. मध्यरात्री पाकिस्तानच्या गर्वाचे विमान ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून भारतीय खेळाडूंनी भर मैदानात बेचिराख केले, हे क्रिकेटच्या इतिहासात कायम लक्षात राहणार आहे.