आज विजयादशमी म्हणजे दसरा. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेला तिथीनुसार १०० वर्षे पूर्ण झाली. गेल्या २७ सप्टेंबर २०२५ दिवशी या संघटनेला ख्रिस्ताब्द गणनेनुसार १०० वर्षे पूर्ण झाली, पण संघटनेच्या दृष्टीने विजयादशमीला जास्त महत्त्व दिले जाते. संघाची पायाभरणी झाली, संघ रुजला, वाढला अन् पसरला यामागे संघटनेचे संस्थापक व प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे जाणीवपूर्वक प्रयत्न व भरीव योगदान आहेच, पण त्याचबरोबरीने माधव सदाशिवराव गोळवलकर अर्थात गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस व वर्तमानकाळातील सरसंघचालक मोहन भागवत या चारही सरसंघचालकांची संघाच्या आजवरच्या सर्वांगीण जडणघडणीवर छाप आहे; हे नाकारता येणार नाही. या चारही व्यक्तिमत्त्वांचा विशेष उल्लेख करण्याचे कारण म्हणजे यांनी आपल्या काळात वेगवेगळ्या सामान्य व असामान्य परिस्थितीत संघाच्या स्वयंसेवकांची जी मानसिक व वैचारिक जोपासना केली, त्यातूनच आजचा हा जो संघ दिसतोय तो घट्ट पाय रोवून उभा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आकार देताना या चारही सरसंघचालकांनी आपले मन, मन आणि धन अर्पण केले व आज जो काही आसेतूहिमाचल पसरलेला हा संघरूपी वटवृक्ष झालेला पाहायला मिळतोय तो या चारही विभुतींनी घडवलेला आहे. डॉ. हेडगेवार मूळचे कॉंग्रेसमधले होते, पण कॉंग्रेसच्या हिंदु-मुस्लिम ऐक्याच्या अवास्तव कल्पनांनी व्यथित होऊन डॉक्टरांनी कॉंग्रेसचा त्याग केला व रा. स्व. संघाची स्थापना केली.
रा. स्व. संघ परिवारात अनेक क्षेत्रांत काम करणाऱ्या संघटना आहेत. या संघटनांमध्ये राष्ट्रीय व राष्ट्रवादी विचारांनी तसेच संस्कारांनी प्रेरित झालेले संघ स्वयंसेवक कार्यकर्ते म्हणून दाखल होतात व कोणत्याही पद, पैसा व प्रतिष्ठेची अपेक्षा न ठेवता सक्रिय होतात. १९७० च्या दशकानंतर संघाचे कार्य परदेशातदेखील वाढले. परदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदू स्वयंसेवक संघ ही समविचारी संघटना आपले संघटनात्मक कार्यशैली वापरून परदेशस्थ हिंदूंना संघटित करते. यामागे ज्या देशांत स्थलांतरित हिंदू राहतात त्या ठिकाणी त्यांना एकत्र आणून त्यांचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक दबाव गट निर्माण करून त्या त्या देशात भारतीयांना पूरक ठरतील अशी राजकीय धोरणे आखण्याचा प्रयत्न करते. अमेरिकेतील ज्यू दबाव गटाच्या पार्श्वभूमीवर हे प्रारूप विकसित केले गेले आहे असे म्हणता येईल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थी संघटना, भारतीय जनता युवा मोर्चा ही युवा संघटना, आदिवासींसाठी कार्यरत असलेली वनवासी कल्याण आश्रम, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद अशा सुमारे पन्नासेक संघटना रा. स्व. संघाच्या छत्रछायेखाली कार्यरत आहेत व त्या दिसामासा वाढत आहेत.
गेल्या शंभर वर्षांत १९४७, १९४८ साली गांधीहत्या, १९७७ साली आणीबाणी व १९९२ साली बाबरी मशीद पतन अशा चारवेळा प्रस्थापित राजकीय नेतृत्वाने बंदी लादूनही संघ टिकून राहिला नव्हे, तर जोमाने अधिकाधिक वाढला व वाढतच गेला.
२००८ साली भागवत यांनी सरसंघचालक म्हणून सूत्रे हातात घेतली व आत्ताचे सरकार सत्तेत आले. देशातील सरकार आपल्याला अनुकूल नसले तरी चालेल पण प्रतिकूल असता कामा नये हा खरेतर संघाचा एक विचार होता. पण बाबरी मशिदीच्या पतनानंतर उत्तरोत्तर प्रतिकूल होत जाणारी परिस्थिती लक्षात घेता संघ आमुलाग्र परिवर्तित झाला व आपल्या राजकीय विचारांची देशात सत्ता असावी हा ध्यास १९९६ साली प्रत्यक्षात आला. २००४ ते २०१४ हा अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाने एकविसावे शतक गाजवले.
आजचा संघ व संघपरिवारातील राजकीय संघटना अर्थात भारतीय जनता पक्ष व इतर सहकारी संघटना वाढल्या त्या कॉंग्रेस पक्षाच्या नाकाखाली वाढल्या व त्या पक्षाच्या नाकर्तेपणामुळे वाढल्या, हे त्या पक्षाचे समर्थक खासगीत अगदी प्रांजळपणे मान्य करतील. रा. स्व. संघ व हिंदू महासभा यासारख्या समकालीन हिंदुत्ववादी संघटनांनी राजकीय हिंदुत्व ही संकल्पना मांडली त्यावेळी देश गांधीवाद, समाजवाद, गांधीवादी समाजवाद, साम्यवाद अशा विचारसरणीच्या प्रभावाखाली होता. धार्मिक हिंदुत्व हे जागृत होते पण सकल भारतीय व परदेशस्थ हिंदूला राजकीयदृष्ट्या हिंदुत्व ही संकल्पना पटवून देणे हे विसाव्या शतकात अवघड होते. कॉंग्रेसची विचारसरणी ही जरी सर्वसमावेशक व मध्यममार्गी असली तरीही ती डावीकडे झुकणारी होती. तरीही अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या दृष्टीने कॉंग्रेस हा बहुसंख्यांकांचा पक्ष होता पण बहुसंख्यांकांच्या दृष्टीने अल्पसंख्याकांचा अतिरिक्त लांगुलचालन करणारा होता. ही राजकीय परिस्थिती संघ व परिवारातील संघटनांना वाढायला साहाय्यभूत ठरली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षांत पूर्णवेळ कार्यरत राहिला पण कॉंग्रेसच्या विचारांशी संलग्न 'राष्ट्र सेवा दल' ही संघटना हळूहळू ढेपाळत गेली व आता तर ती पूर्णपणे निष्क्रिय झाली आहे असे मानायला हरकत नाही.
आज देशात 'संघ'राज्य आहे यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोट्यवधी स्वयंसेवकांची ध्वजपूजा व उपासना आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. संघ व्यक्तिपूजा मानत नाही, संघ ध्वजाला मानतो म्हणून संघ आजवर टिकला हे वास्तव आहे. संघ स्थापनेपासूनच संघात व्यक्तिपूजेला थारा नाही. संघासाठी ध्वज हाच गुरू व ध्वज हीच व्यक्ती होय. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी ध्वज हाच गुरू म्हणून पुजला जातो. आजपर्यंतची ही शतकी वाटचाल द्विशतकाकडे गरूडझेप घेणारी ठरो व बलशाली भारत महासत्तेच्या दिशेने घोडदौड करण्यासाठी सीमोल्लंघन करो, ही सदिच्छा व्यक्त करूया.
- प्रा. विघ्नेश शिरगुरकर
(लेखक कथालेखक, अनुवादक आणि कवी आहेत.)