अफगाणिस्तानच्या इतिहासातील आणखी एक दिवस, जो तेथील नागरिकांसाठी मोठा धक्का घेऊन आला आहे. मंगळवारी तालिबान सरकारने अचानक इंटरनेट आणि मोबाइल सेवा संपूर्णपणे बंद करण्याचा आदेश देत, देशातील संवादाचे माध्यम अक्षरशः हिरावून घेतले. पहाटे काबुल, उरुझगान, मजार-ए-शरीफ आणि हेरातसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये फायबर-ऑप्टिक इंटरनेट सेवा तत्काळ ठप्प झाली. काही वेळ मोबाइल इंटरनेट धडपडत होते, पण अखेरीस टॉवर्स बंद झाल्यावर तेही शांत झाले.
हा निर्णय केवळ संपर्क साधण्याचे साधन हिरावून घेणारा नाही, तर बीबीसीच्या अहवालानुसार सॅटेलाइट टीव्ही सेवांवरही याचा परिणाम झाला आहे. तालिबानच्या या आदेशाने अफगाणिस्तान अक्षरशः 'ब्लॅकआऊट'मध्ये गेला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत ही सेवा बंदच राहील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, काबूल विमानतळावरून होणाऱ्या अनेक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला असून काही विमानसेवा रद्ददेखील कराव्या लागल्या आहेत.
पूर्वी कंदाहार, बल्ख, उरुझगान आणि निमरोजमध्ये फायबर-ऑप्टिक नेटवर्क बंद करण्यात आले होते, पण आता ही सेवा संपूर्ण देशातून काढून घेण्यात आली आहे. या अचानक झालेल्या 'ब्लॅकआऊट'मुळे आंतरराष्ट्रीय कॉल करणे अशक्य झाले आहे. मोबाइल नेटवर्क बंद झाल्यामुळे व्यावसायिक किंवा कौटुंबिक कारणांसाठी एकमेकांशी संपर्क साधण्याची सोय अफगाणी नागरिकांसाठी आता राहिलेली नाही.
तालिबानने हा कठोर निर्णय का घेतला, याचे अधिकृत कारण अद्याप दिलेले नाही. मात्र, अनैतिक आणि अयोग्य कृत्यांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे.
या निर्णयाचा सर्वात मोठा आणि गंभीर फटका अफगाणिस्तानमधील महिलांना बसणार आहे. तालिबानने मुलींना शाळा आणि विद्यापीठांमध्ये जाण्यावर आधीच बंदी घातली आहे. आता हे इंटरनेट बंद झाल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाची शेवटची आशा देखील मावळली आहे. ज्या मुली गुप्तपणे, लपून-छपून शिक्षण घेत होत्या, त्यांच्यासाठी ज्ञानाची ही खिडकी कायमची बंद झाली आहे. अफगाणिस्तानमधील महिलांवर आधीपासूनच सर्वात जास्त आणि कठोर निर्बंध आहेत, आणि आता हे डिजिटल बंधन त्यांच्या भविष्याला पूर्णपणे अंधारात ढकलणारे आहे.
यासोबतच, देशातील स्थानिक व्यवसायांवरही मोठा परिणाम होणार आहे. ऑनलाईन व्यवहार, माहितीचे आदानप्रदान आणि जगाशी जोडणी तुटल्यामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. एकप्रकारे, जगापासून आणि प्रगतीपासून अफगाणिस्तानला आणखी दूर नेण्याचे हे पाऊल आहे. अफगाणिस्तानच्या लोकांना पुन्हा एकदा एकाकी आणि अंधाऱ्या युगात ढकलले जात आहे.
- सचिन दळवी