करूरची दुर्घटना ही केवळ एक दुर्दैवी घटना नसून, सत्ताधाऱ्यांची विश्वासार्हता, विरोधकांची संधी आणि लोकमानसाची दिशा यावर थेट परिणाम करणारी ठरली आहे.
तामिळनाडूतील करूर येथे झालेल्या भीषण चेंगराचेंगरीनंतर राज्यभरात दु:ख आणि संतापाची लाट उसळली आहे. काही क्षणांत निष्पाप जीवांचा बळी गेलेला हा प्रसंग केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा प्रश्न नाही, तर राजकीय दृष्टीनेही मोठे पडसाद उमटवणारा ठरला आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसविण्याचा हा प्रकार भारतात नवीन नाही. मानवी दृष्टिकोनातून सामान्य माणसांना मदत करण्याऐवजी दोषारोपाचे राजकारण करीत एकमेकांवर कुरघोडी करणे हा जणू राजकारणाचा भागच बनला आहे. करूर ही जागा द्रमुक म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मजबूत मतदारसंघ मानला जातो. मात्र अशा दुर्घटनेनंतर प्रशासनावरील निष्काळजीपणाचे आरोप सरळसरळ मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर केले जात आहेत. गर्दी व्यवस्थापनाचा अभाव आणि आपत्कालीन उपाययोजनांचा विलंब हे दोन मुद्दे विरोधकांकडून सातत्याने उचलले जात आहेत. राज्य सरकारला बचावात्मक भूमिका घ्यावी लागत आहे आणि चौकशी समितीच्या आश्वासनांनी लोकशांतता राखावी लागत आहे. अण्णाद्रमुक व भाजप या दोन्ही पक्षांनी या घटनेला सरकारच्या निष्काळजीपणाचे द्योतक ठरवत तीव्र टीका सुरू केली आहे. अण्णाद्रमुक याचा वापर करून ग्रामीण भागातील सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहे, तर भाजप राष्ट्रीय स्तरावर द्रमुक सरकार अपयशी असल्याचा ठसा उमटवू पाहत आहे. त्यामुळे ही दुर्घटना येणाऱ्या निवडणूक मोहिमेत महत्त्वाचा प्रचारबिंदू ठरू शकते.
द्रमुक सरकारने पायाभूत सुविधा, कल्याणकारी योजना या मुद्द्यांवर जोर दिला असला, तरी अशा दुर्घटनांमुळे प्रशासनिक कुचराई ही प्रतिमा ठळक होते. स्टॅलिन यांच्यासाठी हा प्रसंग नेतृत्व क्षमता व जबाबदारीची कसोटी ठरणार आहे. पीडित कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या मदतीत पारदर्शकता नसल्यास सत्ताधाऱ्यांना लोकशाही आघाडीवर तोटा होऊ शकतो. या दुर्घटनेचा उपयोग केंद्रातील विरोधक व सहयोगी दोन्ही पक्ष करत आहेत. काँग्रेस लोककल्याण आणि सुरक्षिततेवरील राज्य सरकारच्या अपयशाचा उल्लेख करून जनतेला विसरलेले सरकार अशी छबी रंगवण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजप नवीन भारत या कल्पनेत राज्य सरकारांचा बेजबाबदार कारभार बसत नाही, असा सूर लावून दक्षिण भारतात स्वतःची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सामान्य जनता अशा प्रसंगात सरकारकडून तात्काळ मदत, पारदर्शक चौकशी आणि दोषींना शिक्षा या गोष्टी अपेक्षित धरते. जर या तीनपैकी कुठेही ढिलाई दिसली, तर जनतेचा संताप मतदानपेटीतून बाहेर पडेल. ग्रामीण व शहरी दोन्ही मतदारसंघांत ही घटना निवडणूक प्रचाराच्या चर्चेत केंद्रबिंदू बनू शकते. दुर्घटना ही केवळ एक दुर्दैवी घटना नसून, सत्ताधाऱ्यांची विश्वासार्हता, विरोधकांची संधी आणि लोकमानसाची दिशा यावर थेट परिणाम करणारी ठरली आहे. सत्ताधाऱ्यांनी केवळ चौकशीपुरते न थांबता दीर्घकालीन गर्दी व्यवस्थापन, सुरक्षेच्या पायाभूत सुविधा आणि उत्तरदायित्व याकडे लक्ष दिले, तरच विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल.
करूरच्या दुर्घटनेनंतर तामिळनाडूचे राजकारण बदलले आहे. दक्षिण भारतात निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असताना ही घटना द्रमुक, अण्णाद्रमुक आणि भाजप या तिघांच्या समीकरणांवर वेगळ्या प्रकारे परिणाम घडवते. द्रमुकची सत्ताधारी पक्ष ही प्रतिमा धोक्यात आली आहे. द्रमुकचे मुख्य बळ म्हणजे कल्याणकारी योजना व वलयांकित नेतृत्व, मात्र करूरसारख्या दुर्घटनांनी प्रशासनिक ढिसाळपणा समोर आला आहे. ग्रामीण भागातील मतदार, ज्यांना द्रमुकने मोफत वीज, अनुदान, शिष्यवृत्ती यामुळे आपल्याकडे खेचले होते, ते आता जीवनसुरक्षा व मूलभूत सुविधा या नव्या निकषावर प्रश्न विचारू लागले आहेत. जर चौकशी व भरपाई प्रक्रियेत पारदर्शकता दाखवली नाही, तर द्रमुकची विश्वासार्हता कमी होण्याची भीती आहे. अण्णाद्रमुक सध्या तुकड्या-तुकड्यांत विभागलेले असले, तरी करूर दुर्घटना त्यांना द्रमुक प्रशासनाच्या अपयशाने एकत्रित आणण्याची संधी देऊ शकते. जयललितांच्या काळातील शिस्तबद्ध कार्यक्रम व कार्यक्षम प्रशासन या आठवणी उकरून काढून, लोकांमध्ये तुलना करण्याचा प्रयत्न होतो आहे. ग्रामीण मतदार, विशेषत: मध्यम व गरीब वर्ग, यांना द्रमुक सरकार तुमच्या जीवाशी खेळते आहे, असा प्रचार करून अण्णाद्रमुक परत आपल्या बाजूला ओढू शकते. तामिळनाडूत भाजप अद्याप मुख्य पक्ष नाही, पण अशा दुर्घटना त्यांना केंद्र व राज्यातील प्रशासनातील फरक दाखवून देण्याची संधी देतात. द्रमुक अपयशी, आम्ही सक्षम हा संदेश देण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. यामुळे शहरी मतदारांमध्ये थोडी पकड वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व घडामोडींतून निष्कर्ष काढायचा तर असे म्हणता येईल की, द्रमुकवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला तर ग्रामीण मतदारसंघात नुकसान संभवते. अण्णाद्रमुकने योग्य वेळी एकजूट दाखवून या घटनेचा लाभ घेतला, तर ते पुन्हा पर्याय म्हणून उभे राहू शकतात. भाजप सध्या पूरक भूमिका बजावत असला, तरी भविष्यात किंगमेकर बनण्याची शक्यता वाढते.
करूरच्या चेंगराचेंगरीनंतर एक महत्त्वाचा वाद निर्माण झाला, तो म्हणजे नव्याने राजकारणात उतरलेला अभिनेता विजय दुर्घटनेनंतर पळाला. हा विरोधकांचा आरोप आहे. हा आरोप राजकीयदृष्ट्या गंभीर ठरतो, कारण अशा वेळी नेत्याची भूमिका धैर्य, जबाबदारी आणि जनसामान्यांशी एकात्मता दाखवणारी असावी, अशी लोकांची अपेक्षा असते.
काही उपस्थितांनी आणि विरोधी पक्षांनी असा दावा केला की दुर्घटनेच्या गोंधळात विजय घाईघाईने निघून गेला. विरोधक म्हणतात की, लोक मरण पावले, शेकडो जखमी झाले आणि त्याऐवजी विजय स्वतःचा बचाव करण्यासाठी पळाला. विजयच्या समर्थकांचे म्हणणे आहे की सुरक्षेच्या कारणास्तव त्याला पोलिसांनी त्वरित हलवले. विजयच्या चाहत्यांमध्ये मात्र त्याचा करिश्मा कायम आहे. तटस्थ मतदारांमध्ये अशी प्रतिमा तयार होऊ शकते की विजयला अजून राजकीय नेतृत्वाची परिपक्वता साधलेली नाही. अभिनेता ते राजकारणी हा प्रवास केवळ लोकप्रियतेवर नव्हे, तर धैर्य, जबाबदारी आणि संकटावेळी उभे राहण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो.
गंगाराम केशव म्हांबरे
(लेखक पत्रकार असून विविध
विषयांवर लेखन करतात)
मो. ८३९०९१७०४४