गोव्यात अनेक चांगल्या अन्न प्रक्रिया प्रकल्प, उत्पादन कंपन्या आणि फार्मा कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये चांगल्या नोकऱ्या गोव्यातील तरुणांना मिळतील, यासाठी कंपन्यांवर सरकारचा थोडा दबाव असणेही गरजेचे आहे.
विद्यमान सरकारचे सर्वात मोठे यश कुठले असेल तर ते सरकारी नोकऱ्या गुणवत्तेवर देण्यासाठी कर्मचारी भरती आयोगाच्या परीक्षा कंप्युटरवर आधारित घेण्याच्या निर्णयाचे. राजकीय वशिलेबाजीला मूठमाती देण्यासाठी म्हणून कर्मचारी भरती आयोग स्थापन केला आणि त्याच्या परीक्षाही सीबीटी पद्धतीने घेण्याचे ठरवले, हे फार महत्त्वाचे आहे. पण आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षांचा दर्जा आणि त्या दर्जाशी गोव्यातील तरुण परिचित आहेत का, असा प्रश्न राहतो. त्यामुळे गुणवत्ता असूनही अनुभव आणि सराव नसल्यामुळे परीक्षेत तरुण मागे पडू शकतात. त्यासाठी राजकीय नेत्यांनी त्यांना नोकऱ्यांचे आश्वासन देण्यापेक्षा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी विशेष वर्ग सुरू करावेत. गोव्यात अशा वर्गांची गरज आहे. नोकरी देता येत नाही, पण परीक्षेसाठी उमेदवारांना तयार करण्याचे काम सुरू झाले तर तरुणांमध्ये स्पर्धा वाढेल आणि चांगल्या गुणवत्तेचे लोक निवडले जातील.
मुख्यमंत्र्यांनी डिचोलीत एका रोजगार मेळाव्यात सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन तरुणांना केले आहे. त्यांच्या मते रोजगार भरती मेळाव्यालाही तरुण मोठ्या प्रमाणात येत नाहीत. फक्त सरकारी नोकरीच हवी, असे म्हणणाऱ्या तरुणांनी रोजगारासाठी कुठलीही चांगली नोकरी स्वीकारण्याची मानसिकता ठेवावी लागेल. त्यासाठी तरुणांना मार्गदर्शन व्हायला हवे. स्वतःकडे गुणवत्ता असेल तर खासगी क्षेत्रातही नोकरीच्या अनेक चांगल्या संधी आहेत, हे तरुणांना पटवून देण्यासह त्यांना खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळाव्या यासाठी कंपन्यांनाही सरकारने निर्देश देण्याची आवश्यकता आहे. डिचोलीत आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यासाठी फक्त शंभरच्या आसपास तरुणांनीच हजेरी लावली. खासगी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी गोव्यातील तरुणांमध्ये एवढी नकारात्मकता का, हा संशोधनाचा विषय आहे. याच नोकऱ्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याहून लोक येऊन मिळवतात, पण गोव्यात आपल्याच गावाशेजारी असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये जाण्यासाठी गोव्यातील तरुण मागे का हटतात, हे कोडेच आहे. नोकऱ्यांमध्ये सुरक्षा नाही किंवा चांगले वेतन दिले जात नसेल तर हा विषयही सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. एकेकाळी गोव्यात एसीजीएल, एमआरएफ सारख्या मोठ्या कंपन्यांनी गोव्यातील शेकडो तरुणांना चांगल्या पगाराच्या कायमस्वरुपी नोकऱ्या दिल्या. असे प्रकल्प आता गोव्यात येत नसतील तर हे बदल का झाले आहेत, त्याचाही अभ्यास व्हायला हवा.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील तरुण रोजगार मेळाव्याला येत नाहीत हे पाहून उघडपणे नाराजी व्यक्त केली. गोव्यात कर्मचारी भरती आयोग स्थापन करून पारदर्शक परीक्षा घेण्याचे श्रेय त्यांनाच जाते. मुख्यमंत्र्यांमुळेच आज गुणवत्तेवर तरुण नोकऱ्या मिळवत आहेत. कर्मचारी भरती आयोगाने आतापर्यंत घेतलेल्या नोकऱ्यांच्या परीक्षेत गोव्यातील अनेक होतकरू, गुणवंत तरुण उत्तीर्ण झाले आहेत. आयोगाने एलडीसी भरतीची अंतिम यादी जाहीर केली आहे, ज्यात अडीचशे तरुणांना त्यांची गुणवत्ता पारखून अंतिम यादीत स्थान मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात राजकारण्यांच्या वशिल्याने नोकऱ्या मिळतील हे आता विसरावे लागेल, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री वारंवार ही गोष्ट सांगत आहेत. गोव्यातील तरुणांनी स्वाभिमानाने, स्वतःच्या गुणवत्तेवर नोकरी मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी गोवा कर्मचारी भरती आयोग आणि गोवा लोकसेवा आयोग यांच्या परीक्षांचा दर्जा आणि त्या परीक्षांच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सोबतच गोव्यातील खासगी उद्योगांमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळवण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. गोव्यात अनेक चांगल्या अन्न प्रक्रिया प्रकल्प, उत्पादन कंपन्या आणि फार्मा कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये चांगल्या नोकऱ्या गोव्यातील तरुणांना मिळतील, यासाठी कंपन्यांवर सरकारचा थोडा दबाव असणेही गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी नोकरी तुमच्या घरापर्यंत येणार नाही, नोकऱ्या देण्यासाठी व्यवसाय, उद्योग सुरू करतानाच चांगली नोकरी मिळेल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन तरुणांना केले आहे. गोव्यातील तरुणांनी खरोखरच नोकऱ्यांच्या विषयावर अंतर्मुख होऊन विचार करावा. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल अशा राज्यांमधून येऊन तरुण गोव्यातील कंपन्यांमध्ये आज नोकऱ्या करत आहेत. इतक्या दूर येऊन त्यांना नोकऱ्या परवडतात, तर गोव्यातील तरुणांना त्या का परवडत नाहीत? गोव्यातील कितीतरी होतकरू तरुण खासगी कंपन्यांमध्ये काम करतात, पण सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले अनेकजण अशा कंपन्यांमध्ये काम करू पाहत नाहीत. पण सरकारी नोकरी कोणाच्या वशिल्याने मिळणार नाही त्यासाठी गुणवत्तेवर, हिमतीवर उत्तीर्ण व्हावे लागेल, याचे भान ठेवून त्या पद्धतीने युवकांनी स्वतःमध्ये बदल घडवण्याची गरज आहे. गोव्यातील तरुण कोणतेही काम करण्यासाठी सदैव तयार असतो. त्यामुळेच आज अनेक तरुण, महिला मनुष्यबळ विकास महामंडळातील सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी अशा वेगवेगळ्या नोकऱ्या करत आहेत. खासगी क्षेत्रातही इतका पगार देणाऱ्या चांगल्या नोकऱ्या आहेत, त्या मिळवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केला तर बेरोजगारी राहणार नाही. मात्र यासाठी त्यांची मानसिकता बदलण्यासाठी राजकीय व्यवस्थेने थोडे प्रयत्न करायला हवेत.