माशेलातील देवकीकृष्णाचा मखरोत्सव

गोव्यात आज ठिकठिकाणी मखरोत्सव साजरे होत असले तरी माशेलातील देवकीकृष्णाच्या मंदिरात संपन्न होणारा आश्विन नवरात्रातील मखरोत्सव आनंद, भक्ती, उत्साह यांचा अनोखा त्रिवेणी संगमच इथे घडवतो!

Story: विचारचक्र |
01st October, 12:20 am
माशेलातील देवकीकृष्णाचा मखरोत्सव

अंत्रुज महालातील वरगावचे माशेल देवकीकृष्णाच्या मंदिरासाठी संपूर्ण गोव्यात ख्यात आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवद्वीगीतेचा संदेश देणाऱ्या श्रीकृष्णाची माता म्हणून देवकीचे स्थान भारतीय संस्कृतीत वंदनीय ठरलेले आहे. अशा देवकीमातेच्या कुशीत श्रीकृष्ण म्हणजे माता आणि पुत्र यांचे हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शारदीय नवरात्रात मखरोत्सवाच्या सोहळ्यात नऊ रात्री एकरूप होताना भाविकांना भक्तिगंधाचा अपूर्व अनुभव देते.

भारतीय लोकधर्माने देवतांची पूजा सनातन काळापासून सातत्य, वंशवृद्धी तसेच सामर्थ्यवृद्धीसाठी आरंभलेली असून गोव्यात शक्तिपूजेच्या व्यापक स्वरूपाचे दर्शन घडते. शक्तीची पूजा ही इथे पार्वतीच्या स्वरूपाशी निगडित असल्याने गोव्यात ती सातेरी, शांतादुर्गा, भूमका, माऊली, कालिका, भगवती अशा रूपांत आढळते. परंतु चोडण बेटावर पोर्तुगीज पूर्वकाळात देवकी आणि तिच्या कडेवर बसलेल्या कृष्णासह पूजन करण्याची परंपरा वंशवृद्धी अधोरेखित करते.

सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीज मूर्तिभंजकांनी तिसवाडीतली मंदिरे जमीनदोस्त करण्यास प्रारंभ केल्यावर भाविकांनी देवकीकृष्णासह वरगावात पलायन केले आणि सौंदेकर संस्थानच्या ताब्यात असलेल्या माशेलच्या गावणेवाड्यावर देवकीकृष्णाची स्थापना केली.

देवकी ही श्रीकृष्णाची जन्मदात्री म्हणून तिलाही शेकडो वर्षांपूर्वीपासून इथला कष्टकरी समाज शक्तिरूपिणी म्हणून पूजत आला आहे. त्यामुळे नवरात्रातील नऊ रात्री तिच्या या रूपाला त्याच रूपात पुजून मखरोत्सवाच्या झुल्यावर झुलवणे योग्य मानलेले आहे. धार्मिक छळामुळे व अन्य काही कारणांसाठी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि अन्य प्रांतात स्थलांतरित झालेल्या चोडणकरांना देवकीकृष्णाची विलक्षण ओढ आहे. त्यामुळे वर्षभर चालणाऱ्या महत्वाच्या जत्रा, उत्सवप्रसंगी माशेलला येणे, ही या भाविकांसाठी पर्वणी असते. गोव्यातील कालोत्सवाची सुरुवात कार्तिकात देवकीकृष्णाचा माशेलातील काला साजरा करूनच होते. इथे भरणारी मालिनी पुनवेची जत्रा तर कष्टकरी शेतकऱ्याऱ्यांना काम करण्यासाठी लागणारी ऊर्जाच नव्हे तर खणणे, कापणी आदी कृषिकामांसाठी आवश्यक असणारी अवजारे, साहित्य याची पुरवणी करणारी पर्वणी असते. अशा देवकीकृष्णाला नवरात्रोत्सवात संपन्न होणाऱ्या लाकडी मखरात स्थानापन्न केले जाते, ते मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने.

नवरात्रीसाठी खास मखरोत्सव साजरा करण्यासाठी तयार केलेल्या लाकडी चौकटीला रंगीबेरंगी कागदांच्या कलाकुसरीने आणि आकर्षक फुलांनी सुंदररित्या सजवले जाते. मंदिराशी पूर्वापार निगडित असलेली कुटुंबे जी जबाबदारी दिलेली आहे, ती पार पाडण्यासाठी आत्मियतेने उत्सवप्रसंगी माशेलला येतात. सजवलेल्या मखरात देवकीकृष्णाची उत्सवमूर्ती स्थानापन्न केली जाते. नवरात्रातील कीर्तन हार्मोनियम आणि तबल्याच्या ठेक्यावर रंगू लागते तेव्हा भक्तीचा परीस स्पर्श झालेले तनमन कीर्तनानंतर संपन्न होणाऱ्या झुलणाऱ्या मखरोत्सवाचे दर्शन घेऊ लागते आणि दिव्यत्वाची प्रचिती अनुभवू लागते. ढोल, तासे, कासाळेसारख्या पारंपरिक लोकवाद्यांच्या संगीतावर मखर झुलवण्याची आणि फिरवण्याची कृती याद्वारे नवरात्रातील आल्हादायक चांदण रात्रीला जणू काही आगळी वेगळी प्रभाच प्राप्त होते.

गोमंतकीय लोकसंगीताची नजाकत अनुभवण्यासाठी उत्सव हे एक प्रभावी माध्यम असते. विद्या, ज्ञान, पैसा, श्रीमंती हे सारे विसरून आपल्या आराध्याप्रती असलेल्या असीम अशा श्रद्धेपायी भाविक मंदिरातील वडिलोपार्जित जबाबदारी पार पाडण्यासाठी येतात. परमेश्वर भावभक्तीला भुकेलेला असल्याने कला, संस्कृती यांच्या आविष्काराद्वारे त्याला जसे समाधान लाभते तसेच त्या प्रसंगी उपस्थित असलेल्यांनाही अनोखे क्षण अनुभवण्याची संधी लाभते.

काही मंदिरात नवरात्रात ललिता पंचमीपासून मखरोत्सवयुक्त दोलोत्सवास प्रारंभ होतो, तर देवकीकृष्णासारख्या मंदिरात मात्र पहिल्या दिवसापासून महानवमीपर्यंत मखरोत्सव चालतो. देवकीकृष्णाच्या मंदिरात संपन्न होणाऱ्या झुल्यावरच्या मखरोत्सवातून गोमंतकाच्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडते.

भगवान श्रीकृष्णाचे बालपणातले रूप भारतीय लोकमानसाला पूर्वापार विशेष प्रिय असल्याकारणाने बाळकृष्णाला आपल्या कवेत घेतलेल्या देवकी मातेसह तिसवाडी तालुक्यातील चोडण बेटावर असलेले मंदिर सोळाव्या शतकात अंत्रुज महालातील वरगावच्या माशेल येथे स्थलांतरित करण्यात आले. चोडण बेटावरील देवकीकृष्णाचे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना होते. त्यामुळे भाविकांनी नव्याने जेव्हा त्याची उभारणी माशेल येथे केली, तेव्हा जुन्या मंदिराचा साज त्याला लाभावा यासाठी प्रयत्न केले. पोर्तुगीज अमदानीतील धार्मिक छळवादामुळे कंटाळून महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पळून गेलेल्या भाविकांनी चोडण येथील देवकीकृष्ण रवळनाथाचे संस्थान नव्या काबिजादीत समाविष्ट होणाऱ्या माशेलात आणले. वर्षभर पूर्वी जे सण, उत्सव चोडण बेटावरील शेतात कष्टकऱ्याऱ्यांकडून साजरे केले जायचे, त्याचे उत्स्फूर्त सादरीकरण भाविकांनी माशेल येथे करण्याची परंपरा निर्माण केल्याने, बदलल्या कालखंडातही हा वारसा चोडणकरांनी राखून ठेवलेला आहे. हे संस्थान जरी मूळ चोडण बेटावरून पलायन केलेल्या नाना जातीजमातीतील लोकांशी निगडित असले तरी आज त्याच्याशी माशेल येथे गेल्या कित्येक वर्षांपासून स्थायिक झालेल्या भाविकांचे नातेही निर्माण झालेले आहे, त्याची प्रचिती विविध उत्सवांच्या प्रसंगी अनुभवायला मिळते.

माशेल येथील देवकीकृष्ण रवळनाथ संस्थानात आश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापनेद्वारे नवरात्रीच्या उत्सवाला प्रारंभ होतो. आश्विन शुक्ल प्रतिपदा ते आश्विन शुक्ल नवमीपर्यंत दररात्री देवकीकृष्णाच्या मंदिरातील माता आणि तिच्या पुत्राला कुशीत धारण केलेली उत्सवमूर्ती सुरेखरित्या सजवलेल्या मखरात विराजमान केली जाते आणि त्यानंतर पारंपरिक ढोल, तासे, कासाळे यांच्या संगीतावर हे मखर झुलवले जाते. मखराची सजावट करण्यासाठी कलाकार जसे तन्मयतेने कलाकुसर करतात, त्याचप्रमाणे मखराला झुलवताना संगीताचा अनोखा साज त्याला लाभावा म्हणून लोककलाकार तितक्याच आत्मियतेने एकरूप होतात. नऊ रात्री मखरोत्सव संपन्न झाल्यावर विजयादशमीला सीमोल्लंघन रौप्य शिबिकोत्सव होऊन या उत्सवाची त्यानंतर सांगता कौलप्रसादाने होते. देवकीकृष्ण रवळनाथ देवस्थानातील हा मखरोत्सव भाविकांना आगळ्यावेगळ्या भक्तिरसाचे दर्शन घडवतो. गोव्यात आज ठिकठिकाणी मखरोत्सव साजरे होत असले तरी माशेलातील देवकीकृष्णाच्या मंदिरात संपन्न होणारा आश्विन नवरात्रातील मखरोत्सव आनंद, भक्ती आणि उत्साह यांचा अनोखा त्रिवेणी संगमच इथे घडवत असतो!


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५