घरकामगारांना कामावर ठेवणाऱ्यांना द्यावा लागणार कल्याण निधी; नोंदणी आणि लेखी करार बंधनकारक
पणजी: शहरांमध्ये घरकाम, ड्रायव्हिंग किंवा स्वयंपाकासारखी कामे आता मोलकरीण, ड्रायव्हर किंवा कुकशिवाय करणे कठीण झाले आहे. मात्र, कर्नाटक सरकार एक नवे विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याने ही सोय आता आणखी महाग होऊ शकते. सरकार ‘डोमेस्टिक वर्कर्स बिल’ आणत असून, यानुसार घरकामगारांना ठेवणाऱ्या मालकांना त्यांच्या पगाराच्या ५ टक्के कल्याण निधी भरावा लागणार आहे.
हा कायदा लागू झाल्यास प्रत्येक घरकामगार आणि त्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांना सरकारतर्फे तयार केलेल्या डिजिटल पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असेल. या क्षेत्रातील कामगारांना अनेकदा कमी किंवा अनियमित वेतन, सामाजिक सुरक्षेचा अभाव आणि शोषणाचा सामना करावा लागतो. या विधेयकाचा उद्देश याच कामगारांना सामाजिक सुरक्षा, किमान वेतन आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.
विधेयकातील प्रमुख तरतुदी:
* घरकामगार, मालक, एजन्सी आणि ॲप-आधारित प्लॅटफॉर्मची नोंदणी अनिवार्य असेल.
* मालकांना किंवा एजन्सीला कामगाराच्या पगाराच्या ५ टक्के कल्याण निधी सरकारकडे जमा करावा लागेल.
* ही रक्कम डिजिटल व्यवहाराद्वारे दर तीन किंवा सहा महिन्यांनी जमा करावी लागेल.
* जर जमा केलेल्या रकमेत आणि दिलेल्या माहितीमध्ये फरक आढळला, तर मालकावर दंड आकारला जाईल.
घरकामगारांना लेखी कराराशिवाय कामावर ठेवणे बेकायदेशीर असेल. या करारामध्ये वेतन, कामाचे तास, सुट्ट्या आणि कल्याण निधीसारख्या अटी स्पष्टपणे नमूद असतील.
कामगारांना मिळणारे लाभ:
या निधीतून ‘कर्नाटक राज्य घरकामगार सामाजिक सुरक्षा आणि कल्याण मंडळ’ तयार केले जाईल. या मंडळाद्वारे कामगारांना अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल, ज्यात कामाच्या ठिकाणी दुखापत झाल्यास नुकसान भरपाई, वैद्यकीय खर्च, पेन्शन, शिक्षण, मातृत्व लाभ, साप्ताहिक आणि वार्षिक सुट्ट्या तसेच अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत अशा गोष्टींचा समावेश आहे.
या विधेयकाचे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. कर्नाटकचे कामगार मंत्री संतोष लाड म्हणाले की, "आम्ही असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देऊ इच्छितो आणि महिलांना याचा विशेष फायदा होईल." अनेक वर्षांच्या मागणीनंतर हे विधेयक येत असल्यामुळे त्याचे स्वागत आहे, मात्र त्यात काही बदल करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या रूथ मनोरमा यांनी सांगितले.