सोमवारपर्यंत तोडगा काढण्याचे आमदार देविया राणे यांचे आश्वासन
वाळपई: पिसुर्ले सरकारी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास गावकर यांच्या बदलीला पालक-शिक्षक संघ (पीटीए), पालक आणि विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर झालेली ही बदली विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान करेल, असे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात पालक-शिक्षक संघाने पिसुर्ले पंचायतीचे सरपंच देवानंद परब यांना निवेदन दिले . सरपंचांनी हा विषय आमदार डॉ. देविया राणे यांच्यासमोर मांडला. त्यांनी सोमवारपर्यंत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्याध्यापक उल्हास गावकर यांची पिसुर्ले सरकारी माध्यमिक विद्यालयातून आमोणा येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात बदली करण्यात आली आहे, तर त्यांना खांडोळा उच्च माध्यमिक विद्यालयाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
मुख्याध्यापक उल्हास गावकर यांच्या बदलीला विरोध होण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. गावकर हे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल शिकवतात, त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर त्यांची बदली झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेचा निकाल गेली अनेक वर्षे १०० टक्के लागत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे, ते विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळी आणि रात्रीही खास वर्ग घेतात, तसेच गरज पडल्यास त्यांच्या घरी जाऊन शिकवतात. त्यांच्यामुळे शाळेत केवळ शैक्षणिकच नाही, तर सामाजिक वातावरणही उत्तम निर्माण झाले आहे. या सर्व बाबींमुळेच पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या बदलीला तीव्र विरोध दर्शवला आहे.
या सर्व बाबी लक्षात घेता, त्यांची बदली यावर्षी रद्द करून पुढील वर्षी करावी, अशी मागणी पालक-शिक्षक संघाने केली आहे. या निवेदनावर पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय केसरकर, उपाध्यक्ष शोभा नाईक आणि इतर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, यासंदर्भात मुख्याध्यापक उल्हास गावकर यांच्याशी संपर्क साधला असता, आपण दिल्ली येथे एका शिबिरासाठी गेलो असल्याचे त्यांनी सांगितले.