आमदार गावडेंच्या आरोपांवर मंत्री तवडकरांचे उत्तर. ...‘गावडेंना गोमंत भूषण पुरस्कार द्यावा का?’ म्हणत केली उपहासात्मक टीका
मडगाव: मी आदिवासी समाजासाठी १९९६ पासून सामाजिक कार्य सुरू केले. गोविंद गावडे यांच्याशी २००८ मध्ये ओळख झाली. त्याआधीच मी लोकोत्सव, आदर्श संघ, बलराम शिक्षण संस्था सुरू केल्या होत्या आणि आमदारही झालो होतो. मग, गोविंद गावडे ‘देवचार’ बनून मला वाट दाखवत होते का?” अशा शब्दांत मंत्री रमेश तवडकर यांनी आमदार गोविंद गावडेंवर सडकून टीका केली. सरकारमधील मंत्री आणि आमदारांमधील या वादामुळे पक्षात ‘सर्व काही आलबेल’ आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मडगाव येथे पत्रकार परिषद घेत मंत्री रमेश तवडकर यांनी गोविंद गावडे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्याबाबत केलेली वक्तव्ये चुकीची असून, त्यावर गावडेंनी स्पष्टीकरण द्यावे, असेही ते म्हणाले. तवडकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी आमदार गोविंद गावडे यांनी माझ्याशी संबंधित काही जुने विषय मांडले. रमेश तवडकर आपण दाखवलेल्या वाटेवर चालतात, असे विधान गावडे यांनी केले. मात्र, आदर्श संघाची स्थापना १९९५ मध्ये झाली. तेव्हापासून माझे सामाजिक कार्य सुरू आहे. त्यानंतर १३ वर्षांनी गावडे मला भेटले. मग गावडे यांनी ‘देवचाराच्या’ स्वरूपात येऊन मला वाट दाखवली का?” असा सवाल त्यांनी केला.
लोकोत्सवाची संकल्पनाही आपली आणि बलराम शिक्षण संस्थाही आपण सुरू केली, असे गावडे यांनी सांगितले. “पण लोकोत्सव मी २००० साली सुरू केला. गेल्या २५ वर्षांपासून हा उत्सव सुरू आहे. मग गावडेंनी ही संकल्पना कशी दिली? तसेच बलराम शिक्षण संस्थेची आठ शाखा आहेत आणि ही संस्था २००७ मध्ये सुरू झाली असताना गावडेंनी ‘देवचार’ बनून या कल्पना दिल्या होत्या का? असेही तवडकर म्हणाले. साडेआठ वर्षे मंत्री असलेल्या गोविंद गावडे यांनी एक अंगणवाडीही सुरू केली नाही. मग, शिक्षण संस्था सुरू केल्याचे ते सांगत असल्यास, त्यांना अध्यक्ष करावे का? अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.
‘गोविंद गावडेंनी ताजमहाल बांधला’
गोविंद गावडे यांचे असेही म्हणणे आहे की, सुदिन ढवळीकर आणि सुभाष शिरोडकर यांना निवडून आणून मी मंत्री केले, प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी पुढाकार घेतला आणि मलाही आमदार व सभापती त्यांनीच केले. लोकशाही राज्यात शहाजहानने ताजमहाल बांधला होता, पण आताच्या लोकशाहीच्या राज्यात गोविंद गावडे यांनी ताजमहाल बांधलेला आहे, अशीही टीका तवडकर यांनी केली.
गावडेंना गोमंत भूषण पुरस्कार द्यावा का?
काजव्याला वाटते की सगळे जग आपणच प्रकाशमान करतो, तसे गावडे यांचे झाले आहे. अपक्ष असताना त्यांना मंत्री करणाऱ्या मनोहर पर्रीकर यांचीही त्यांनी नक्कल (मिमिक्री) केलेली आहे. अशा गोव्याच्या राजकारणातील गोविंद गावडे या कलाकाराला ‘गोमंतकीय भूषण’ पुरस्कार द्यावा का, हे तपासून पाहिले पाहिजे,” असे तवडकर म्हणाले. तसेच, लोकांना विषय समजावेत म्हणून हा प्रयत्न होता. यापुढे कुणी कितीही टीका केली तरीही पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार नाही, असेही तवडकर यांनी स्पष्ट केले.
‘पक्षाने सांगितल्यास मंत्रिपद सोडण्यासही तयार
आगामी काळात पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे काम करण्यास कमी वेळ मिळणार असल्याने मला मंत्रिपद नको अशी आपली भूमिका होती, असे तवडकर यांनी सांगितले. “रमेश तवडकरसारखा व्यक्ती मंत्रिमंडळात हवा असे पक्षाला वाटले, त्यामुळेच मला मंत्रिपद दिले गेले. पक्षाच्या आदेशामुळे मला मंत्रिपद घ्यावे लागले. पक्षाने सांगितल्यास मी मंत्रिपद सोडण्यासही तयार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
चुकीच्या विधानांमुळेच गावडेंवर ओढवली ही स्थिती
गोविंद गावडे हे पक्षाचे आमदार असले तरीही त्यांनी केलेले आरोप हे बलराम शिक्षण संस्था, आदर्श सेवा संघ, लोकोत्सव, श्रमधाम आणि आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होते. त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे होते आणि त्यासाठी पक्षाची मंजुरी घेण्याची गरज नाही. या विषयासंदर्भात मी पक्षाकडे तक्रार केलेली आहे. त्यांच्या चुकीच्या विधानांमुळेच ते सध्या मंत्रिपदापासून दूर आहेत, असा दावाही तवडकर यांनी केला. संकीर्ण विचार ठेवल्यास पक्ष वाढत नाही. पक्ष मोठा होत असताना विविध प्रकारचे लोक पक्षात येत असतात. पक्ष सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे काम करतो. गावडे पक्षात असावेत का, हे पक्ष ठरवेल, असेही तवडकर यांनी सांगितले.