मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा बिहार दौरा ; पटना येथे एनडीए कार्यकर्त्यांना केले संबोधित
पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी २० सप्टेंबर रोजी बिहारमधील पटना येथे आयोजित करण्यात आलेल्या एनडीए पक्षांच्या कार्यकर्ता संमेलनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी युवा शक्ती, नारी शक्ती, किसान कल्याण आणि गरीब कल्याणच्या बळावर आम्ही बिहारच्या कानाकोपऱ्यात सेवा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, बिहारचे मंत्री नितीन नबीन, खासदार डॉ. संजय जयस्वाल आदी उपस्थित होते. डॉ. सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘विकसित भारत, विकसित बिहार’च्या संकल्पाला दुजोरा दिला. यानंतर त्यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, डबल इंजिन सरकारमुळे बिहारमध्ये मोठा विकास झाला आहे. येथे आल्यावर मला एखाद्या आंतरराष्ट्रीय शहरात आल्यासारखे वाटले. बिहारमधील जनता येत्या निवडणुकीत नक्कीच डबल इंजिन सरकारलाच पसंती देईल.
मुख्यमंत्री डॉ. सावंत आज आणि उद्या बिहार दौऱ्यावर असणार आहेत. या दरम्यान ते स्थानिक कार्यकर्ते तसेच अन्य लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या दौऱ्यापूर्वी त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट घेतली. यावेळी ‘विकसित भारत २०४७’ साठी बिहार आणि गोव्याने एकत्रितपणे काम करण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय त्यांनी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, बिहारचे मंत्री नितीन नबीन, खासदार डॉ. संजय जयस्वाल यांच्यासोबत देखील विविध विषयांवर चर्चा केली.
काँग्रेस काळातच लोकशाही आली धोक्यात
यावेळी बोलताना डॉ. सावंत यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, भारतात काँग्रेसच्या काळातच लोकशाही सर्वाधिक धोक्यात होती. आताचे मोदी सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर विश्वास ठेवते. यामुळेच संपूर्ण देशासह बिहारमध्ये मूलभूत सुविधा तसेच मनुष्यबळ विकास पाहायला मिळत आहे.