पणजी : आंदोलनाला घाबरून भाजप गोमंतकीयांना धमकावत आहे: आप

‘आमचे ४ लाख सदस्य आहेत, विचार करून आंदोलन करा’ या भाजपच्या विधानावर अमित पालेकर यांचा हल्लाबोल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
पणजी : आंदोलनाला घाबरून भाजप गोमंतकीयांना धमकावत आहे: आप

पणजी: “आम्ही चार लाख सदस्यांचे कुटुंब आहोत, त्यामुळे आंदोलन करण्यापूर्वी विचार करा,” अशा धमक्या देऊन भाजप गोमंतकीयांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांची आणि विरोधकांची एकजूट पाहून भाजप घाबरला असल्यामुळेच असे करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) गोवा संयोजक अमित पालेकर यांनी केला आहे.

रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर आंदोलकांनी भाजपच्या कार्यालयालाही लक्ष्य केले होते. त्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेत, “आमचे गोव्यात चार लाख आणि देशात १४ कोटी सदस्यांचे बळकट कुटुंब आहे. त्यामुळे दोनदा विचार करा आणि भविष्यात जबाबदारीने वागा,” असे म्हटले होते. भाजपच्या याच विधानावर आक्षेप घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अमित पालेकर बोलत होते. यावेळी आपचे नेते श्रीकृष्ण परब आणि संदेश तेळेकार उपस्थित होते.

जनगणना २०११ नुसार गोव्याची लोकसंख्या १७ लाख आहे आणि आता ती २० लाखांपर्यंत पोहोचली असेल. १७ लाख लोकसंख्या असताना भाजपचे ४ लाख सदस्यांचे कुटुंब उरलेल्या गोमंतकीयांना धमकावत आहे, असे पालेकर म्हणाले. “उरलेले १३ लाख गोमंतकीय आहेत, त्यांना गोव्यात घडणारे गुन्हे आणि गैरप्रकार योग्य वाटतात का? भाजप गुन्हेगारी घटनांवर कधीच का बोलला नाही ?” असा प्रश्न त्यांनी विचारला. शुक्रवारी झालेल्या आंदोलनात विरोधी आमदार, सामान्य जनता आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले होते. ते कोणत्याही एका पक्षाचे नसून, प्रत्येक गोमंतकीयासाठी उभे राहिले होते, असे पालेकर यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारच्या आंदोलनातील सगळ्या गोमंतकीयांची आणि विरोधकांची एकजूट पाहून भाजप घाबरला, म्हणूनच तो धमक्या देत आहे. १७ लाखांपैकी १३ ते १४ लाख गोमंतकीयांना भाजप नको आहे. त्यामुळे धमकी देण्यापूर्वी भाजपने विचार करावा, असे आव्हान देत, “जर तुमचे ४ लाख सदस्यांचे कुटुंब असेल, तर आमच्यावर मोर्चा काढून दाखवा,” असे पालेकर म्हणाले. भाजपने काही लोकांच्या मुलाखती घेऊन आंदोलनामुळे लोकांना त्रास झाला असे भासवले. परंतु आंदोलकांनी शाळेच्या मुलांना वाट दिली होती, असे ते म्हणाले. “जेव्हा भाजपला भीती वाटते, तेव्हा ते पोलिसांना पुढे करतो किंवा धमक्या देतात,” असा आरोपही पालेकर यांनी यावेळी केला.

हेही वाचा