बेताळभाटीतील घटना; बस चालक ताब्यात
मडगाव: बाजारातून सामान घेऊन बसमधून उतरल्यानंतर अचानक रस्त्यावर पडल्याने एका वृद्ध महिलेचा बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नागवाडा, बेताळभाटी येथे घडली असून, मरण पावलेल्या महिलेचे नाव बेर्था मारिया मास्कारेन्हस पिंटो (वय ७३) आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून बस चालकाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी ११ वाजता घडला. बेर्था पिंटो बाजारातून घरी जाण्यासाठी बसमधून उतरल्या. बस थांबल्यानंतर त्या इतर प्रवाशांसोबत खाली उतरल्या आणि घराकडे जाण्यासाठी बसच्या उजव्या बाजूने जात असताना रस्त्यावर पडल्या. हे लक्षात न आल्याने चालकाने बस पुढे घेतली आणि बसचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.