जीपीएससीच्या ९२ पदांसाठी २८ सप्टेंबर रोजी सीबीआरटी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
जीपीएससीच्या ९२ पदांसाठी २८ सप्टेंबर रोजी सीबीआरटी

पणजी: गोवा लोकसेवा आयोगामार्फत (जीपीएससी) भरती करण्यात येणाऱ्या विविध ९२ पदांसाठी संगणक आधारित भरती चाचणी (सीबीआरटी) २८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक, सहाय्यक कृषी अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक औषधशास्त्र रसायन तज्ज्ञ आणि सहाय्यक व्याख्याता अशा विविध पदांचा समावेश आहे.

उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र १९ सप्टेंबरपर्यंत डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन आयोगाने केले आहे. जे उमेदवार प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकले नाहीत, त्यांनी २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान आयोगाच्या कार्यालयातून ते मिळवणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराकडे ओळखीचा पुरावा असणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र नसलेल्या उमेदवारांना चाचणीला बसता येणार नाही.

उमेदवारांनी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहावे. चाचणी केंद्रावर पोहोचण्याची व्यवस्था उमेदवारांना स्वतः करावी लागेल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी त्यांचे ई-मेल तपासण्याचे आवाहनही आयोगाने केले आहे.

वरील पदांकरिता सीबीआरटी चाचणी ७५ गुणांची असणार आहे. सीबीआरटी चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्याकरिता खुल्या आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) प्रवर्गासाठी किमान ४५ गुण (६० टक्के), ओबीसी, दिव्यांग आणि स्वातंत्र्य सैनिकांची मुले (सीएफएफ) यांच्यासाठी किमान ४२ गुण ( ५५ टक्के ) तर एससी आणि एसटी समाजाच्या उमेदवारांसाठी किमान ३८ गुण (५० टक्के) मिळवणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा