पंजाब : लग्नाचे आमिष दाखवून अमेरिकन महिलेचा खून; मृतदेह जाळला अन् हाडे फेकली नाल्यात!

आर्थिक व्यवहारातून हत्येचे गुपित उघड; ब्रिटनमधून रचला गेला होता कट

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
पंजाब : लग्नाचे आमिष दाखवून अमेरिकन महिलेचा खून; मृतदेह जाळला अन् हाडे फेकली नाल्यात!

चंदिगढ: मसाला थरारपटाप्रमाणे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, लग्नाचे आमिष दाखवून भारतात बोलावलेल्या एका अमेरिकन महिलेची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर आरोपीने महिलेचा मृतदेह कोळशावर जाळून तिची हाडे नाल्यात फेकून दिली. पैशांच्या व्यवहारातून या भयंकर गुन्ह्याचा उलगडा झाला असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

रुपिंदर कौर पंधेर (वय अंदाजे ४०), अशी या मृत महिलेचे नाव असून, त्या अमेरिकेच्या नागरिक होत्या. दोनदा घटस्फोट घेतलेल्या रुपिंदर कौर यांची ब्रिटनमध्ये राहणाऱ्या व्यावसायिक चरणजीत सिंग याच्यासोबत मैत्री झाली होती. चरणजीतने त्यांना लग्नाचे वचन दिले आणि त्याच आशेने त्या १२ जुलै रोजी भारतात आल्या होत्या. मात्र, भारतात आल्यानंतर अनेक दिवसांपासून त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्या नातेवाईकांना संशय आला. त्यांनी अमेरिकेच्या दूतावासाशी संपर्क साधून शोध घेण्याची मागणी केली.

पोलिसांनी केलेल्या तपासातून या गुन्ह्यातील धक्कादायक माहिती समोर आली. रुपिंदर कौर यांनी चरणजीतकडे लग्नासाठी सातत्याने आग्रह धरला होता. मात्र, तो टाळाटाळ करत होता. त्यामुळे संतापलेल्या रुपिंदरने त्याच्यावर लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. यावर चरणजीतने ब्रिटनमधूनच रुपिंदरला संपवण्याचा कट रचला. त्याने रायपूर येथील सुखजीत सिंग उर्फ सोनू याला हत्या करण्याची सुपारी दिली.

तपासादरम्यान, पोलिसांनी सुखजीत सिंग उर्फ सोनू याला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली दिली असून, त्यानेच बेसबॉलच्या बॅटने रुपिंदरला मारहाण करून तिची हत्या केल्याचे सांगितले. हत्येनंतर ओळख पटू नये यासाठी मृतदेह पेटत्या कोळशांवर ठेवून जाळण्यात आला आणि उर्वरित हाडे नाल्यात फेकून देण्यात आली. रुपिंदर कौरने आरोपी सोनू आणि त्याच्या भावाच्या बँक खात्यात मोठी रक्कम पाठवली होती, याच आर्थिक व्यवहारावरून हत्येचे गुपित उघडकीस आले. पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, तर या प्रकरणात आणखी काही आरोपींच्या अटकेची शक्यता आहे.

हेही वाचा