दोन पोलीस शिपायांचा समावेश
गदग : गदग तालुक्यातील हर्लापूर परिसरात काल १८ रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पोलीस शिपायांचा समावेश असून, त्यांच्या सोबत प्रवास करणारा एक नातेवाईकही दगावला आहे. या धक्कादायक अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोप्पळकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारचे अचानक नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या दुभाजकावरून दुसऱ्या लेनमध्ये शिरली आणि समोरून येणाऱ्या गोवा कदंब महामंडळाच्या पणजी-होस्पेट बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा चुराडा झाला. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. बसचालकालाही गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने इस्पितळात हलविण्यात आले.
या अपघातात ठार झालेल्यांची नावे अर्जुन नेल्लुर (३२), रवी नेल्लुर (३५) आणि ईरण्णा उप्पर (३६) अशी आहेत. अर्जुन नेल्लुर हा हावेरी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील शिपाई तर ईरण्णा उप्पर हा कोप्पल जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी संबंधित शिपाई होता. रवी नेल्लुर हा अर्जुनचा नातेवाईक होता. हे तिघेही हावेरी जिल्ह्यातील बंकापूर तालुक्यातील हुनागुंड या गावचे रहिवासी होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह जेआयएमएस इस्पितळात पाठविण्यात आले. एका गावातील तिघेही अशा प्रकारे रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडल्याने गावात व हावेरी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांत शोककळा पसरली आहे.