पणजी : गोव्यातील भूजल पातळी कमी होत आहे. तसेच भूजल दूषित देखील होत आहे. जल प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नात सर्वांची साथ असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. शुक्रवारी पणजीत विविध खात्यांतर्फे आयोजित सरोवर पुनः निर्माण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. शरद काळे, पर्यावरण खात्याचे संचालक सचिन देसाई, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष लेव्हीसन मार्टिन, डॉ. गीता नागवेकर, जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याचे सौंदर्य हे केवळ किनाऱ्यांमध्ये नाही. ते जंगल, झरे, तलाव आणि पर्यावरणात देखील आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी आतापासूनच लहान मुलांमध्ये जागृती केली पाहिजे. कचरा पिशवीत गुंडाळून तो नदीत टाकण्याची सवय देखील मोडता आली पाहिजे. पाण्यातील प्लास्टिक आता माशांच्या पोटात पोहोचले आहे. पर्यायाने ते आपल्या शरीरातील देखील जात आहे. प्लास्टिक विघटनासाठी १ हजार वर्षांहून अधिक काळ लागतो. त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच तसेच पुढच्या पिढीला भोगावे लागतील.ते म्हणाले, पीएम अमृत सरोवर योजनेअंतर्गत गोव्यातील १५० तळ्यांचे संवर्धन करण्यात येत आहे.
सरोवर पुनः निर्माण अंतर्गत आणखी ३९ तळ्यांचे संवर्धन करण्यात येईल. हे काम केवळ सरकारचे नसून लोकांनी देखील यामध्ये मदत करणे अपेक्षित आहे. सरकारी पातळीवर दुर्लक्ष होत असेल तर जलस्त्रोत खात्याकडे तक्रार करावी. राज्यातील तळी ही खाजगी मालकीची नसून सरकारच्या मालकीची आहेत. मात्र काही लोकांना ही गोष्ट समजत नाही. मेरशी येथे दरवर्षी जाणीवपूर्वक तळे बुजवण्यात येते. निसर्ग नष्ट करण्याची ही मानसिकता बदलली पाहिजे.
देशात प्रथमच पाणथळ जागांचा ॲटलास
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जलस्त्रोत खात्याने राज्यातील सर्व तालुक्यातील पाणथळ जागांचा अॅटलास तयार केला आहे. असे करणारे गोवा देशातील पहिले राज्य आहे. या ॲटलासमधून सर्व तळ्यांची माहिती मिळते. भविष्यात कोणी तळी पुरवण्याचा प्रयत्न केल्यास या अटलाच्या सहाय्याने तिथे आधी तळी होती हे सिद्ध करता येते.