'सेवा पखवाडा' निमित्त ९७० जणांना नियुक्ती पत्रे प्रदान; पुढील काळात अडीच हजार पदे भरली जातील
पणजी: प्राथमिक शिक्षकांच्या सध्या कंत्राटी तत्त्वावर भरलेल्या ५०० जागा पुढील सहा महिन्यांत कायमस्वरूपी भरल्या जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. ‘सेवा पखवाडा’निमित्त शुक्रवारी पणजीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, पेयजल मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंद शेट तानावडे आणि इतर आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, नोकर भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने गोवा लोकसेवा आयोग आणि कर्मचारी भरती आयोगाची स्थापना केली आहे. आज कंत्राटी नियुक्तीपत्रे मिळालेल्या ९७० कर्मचाऱ्यांना लवकरच कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळेल. कर्मचारी भरती आयोगातर्फे पुढील काळात एकूण अडीच हजार पदे भरली जातील. युवकांनी भविष्य लक्षात घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच बँकांच्या परीक्षांसाठी महाविद्यालयीन जीवनापासूनच तयारी सुरू करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
गोव्यातील मनुष्यबळ विकास महामंडळाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आज या महामंडळातर्फे २२० जणांना नोकरी देण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांत महामंडळात ५ हजार जणांना नोकरी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने सुट्ट्या आणि इतर सुविधा उपलब्ध करून त्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली आहे. तसेच, पुढील शिक्षणासाठीही महामंडळातर्फे त्यांना मदत दिली जाते.
नियुक्ती पत्रे मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी लोकांच्या मदतीसाठी काम करत आहोत, हे लक्षात घेऊन आस्था आणि आपुलकीने आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.