गेल्या आठ महिन्यांत १५० हून अधिक शाळांना धमक्या; सरकारने सुरक्षा नियमावली केली कठोर
नवी दिल्ली : दिल्लीतील शनिवारची सकाळ नेहमीसारखीच सुरू झाली होती. पण, एका क्षणात सर्वकाही बदलले. दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) द्वारका, कृष्णा मॉडेल पब्लिक स्कूल आणि सर्वोदया विद्यालय यांसारख्या अनेक शाळांना बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आणि एकच खळबळ उडाली. सुरक्षिततेसाठी तातडीने शाळा खाली करण्यात आल्या, तर डीपीएस द्वारकासारख्या शाळांनी परीक्षा पुढे ढकलल्या.
धमकीचा पहिला फोन सकाळी साडेसहा वाजता नजफगड भागातील एका शाळेतून दिल्ली अग्निशमन दलाला मिळाला. त्यानंतर कोणतीही जोखीम न घेता पोलीस पथके आणि बॉम्ब निकामी करणारी पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवून संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू झाली.
हे असे पहिल्यांदाच घडलेले नाही. गेल्या आठ महिन्यांत दिल्ली-एनसीआरमध्ये १५० हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांना अशाच धमक्या मिळाल्या आहेत. केवळ शैक्षणिक संस्थाच नव्हे, तर हॉटेल्स, रुग्णालये आणि न्यायालयांनाही धमक्या आल्या आहेत. १३ सप्टेंबर रोजी ताज पॅलेस हॉटेल आणि दोन मॅक्स रुग्णालयांना तर गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयालाही अशीच धमकी देण्यात आली होती. तपास यंत्रणा या धमक्यांमागे कोण आहेत, याचा कसून शोध घेत आहेत.
या वाढत्या घटना लक्षात घेता, दिल्ली सरकारने शाळांसाठी नवीन सुरक्षा नियमावली लागू केली आहे. यात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे, नियमित मॉक ड्रिल आणि आपत्कालीन परिस्थितीत दिव्यांग मुलांसाठी विशेष मदत यासारख्या उपायांचा समावेश आहे. तसेच शाळांना आता दर महिन्याला सुरक्षा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.