कर्नाटकातील अजब व्यक्तीची गजब कहाणी सोशल मीडियावर व्हायरल!
शिवमोग्गा : आजकाल गाड्या इंधनाविना धावत नाहीत, पण माणूस इंजिन ऑइलवर जगू शकतो का? हा प्रश्न करणे म्हणजे जरा आगाऊपणाच वाटेल, पण कर्नाटकातील शिवमोग्गा येथील एका व्यक्तीची अशीच एक अजब कहाणी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
‘ऑइल कुमार’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या व्यक्तीचा दावा आहे की, तो गेल्या ३० वर्षांपासून रोज ७ ते ८ लिटर इंजिन ऑइल पितो. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, पण गेल्या तीन दशकांत त्याला कधीही डॉक्टरांकडे जावे लागलेले नाही किंवा कोणताही गंभीर आजार झालेला नाही असा दावा तो करतोय. त्याच्या या विचित्र सवयीमुळे तो परिसरात 'ऑइल कुमार' म्हणूनच ओळखला जातो.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये त्याला आजूबाजूचे लोक जेवण देत असतानाही तो नकार देऊन, एका बाटलीतून इंजिन ऑइल पिताना दिसत आहे. इतकेच नाही, तर तो आपल्या या असामान्य आयुष्याचे श्रेय भगवान अय्यप्पा यांच्या आशीर्वादाला देतो. दैवी शक्तीशिवाय असे जगणे शक्य नाही, असे त्याचे ठाम मत आहे.
दरम्यान, इंजिन ऑइल हे मानवी सेवनासाठी नसून आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे 'ऑइल कुमार'च्या या दाव्याची पुष्टी गोवन वार्ता करत नाही. तसेच, कृपया अशी कोणतीही कृती घरी करण्याचा प्रयत्न करू नका.