पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन केली ‘अपनाघरात रवानगी
मडगाव: वडिलांच्या मारहाणीला कंटाळून घरातून पळालेला एक १३ वर्षीय मुलगा थिवी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) सापडला. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन मेरशी येथील ‘अपनाघर' येथे रवानगी केली आहे.
मडगावहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या सावंतवाडी पॅसेंजर गाडीमध्ये थिवी रेल्वे स्थानकावर आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक विजय पार्टे यांना हा मुलगा एकटाच प्रवास करताना आढळला. चौकशी केली असता, त्याने आपले नाव राजू रहमान असून तो नवी दिल्लीतील शास्त्री पार्क येथील रहिवासी असल्याचे सांगितले.
वडिलांच्या मारहाणीमुळे कंटाळून आपण घर सोडून पळालो, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर, आरपीएफने बाल सहायता केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुलाला बाल कल्याण समितीच्या स्वाधीन केले. समितीच्या आदेशानुसार मुलाची मेरशी येथील ‘अपनाघर’मध्ये रवानगी करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ या अभियानांतर्गत आरपीएफने आणखी एका मुलाला सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले आहे.