प्राथमिक शाळा सुरू करून एक हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप
मडगाव : दामोदर हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचा आवश्यक परवानगी न घेता विस्तार केल्याप्रकरणी मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष पांडुरंग उर्फ भाई नायक आणि हायस्कूलच्या व्यवस्थापकीय समितीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बेकायदेशीर बांधकामात प्राथमिक शाळा सुरू करून सुमारे एक हजार मुलांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कोंब, मडगाव येथील राजीव नाईक यांनी यासंदर्भात मडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, दामोदर हायस्कूलच्या इमारतीचा तळमजला आणि पहिला मजला विनापरवाना बांधण्यात आला. दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाकडून (एसजीपीडीए) कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीत प्राथमिक विभाग सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या कारणास्तव, सार्वजनिक उपद्रव होईल असे कृत्य करत निष्काळजीपणामुळे मानवी जीव धोक्यात घातल्याच्या आरोपांखाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मडगाव पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर गावकर पुढील तपास करत आहेत.