ओंकार हत्ती अॅटमबॉम्बला जुमानेना...

भातशेतीसह केळी, कवाथ्यांवर ताव : दुसऱ्या दिवशीही तांबोसे गावात ठाण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
ओंकार हत्ती अॅटमबॉम्बला जुमानेना...

पेडणे : पेडणे तालुक्यातील तांबोसे भागात महाराष्ट्रातून आलेल्या ओंकार हत्तीने दोन दिवसांपासून भातशेती, केळी, कवाथे आणि नारळाच्या झाडांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकरी आता शेतात जाण्याचे धाडस करत नाहीत, कारण हत्ती अचानक अंगावर धावून येऊ शकतो, त्यामुळे नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत.
वन खात्याचे हंगामी कर्मचारी आणि प्रशिक्षित कर्मचारी हत्तीला हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत. अॅटमबॉम्बचा आवाज देऊन ओंकार हत्तीला दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला; तरीही हत्ती कुणालाही जुमानत नाही आणि तो शेतात ठाण मांडून आहे.
ओंकार हत्तीने दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. भातशेती, केळी व कवाथ्यांना मोठा फटका बसला आहे. पोफळी, नारळाच्या झाडांचीही त्याने नासधूस केली. तसेच दिलीप सामंत यांचा ट्रॅक्टरही त्याने उलटवून टाकला.
शेतकऱ्यांच्या मते, हत्ती मोठ्या प्रमाणात खाल्ल्यानंतर तीन तास लोळत राहतो, नंतर परत इतर झाडांकडे लक्ष केंद्रित करतो आणि तिथे नुकसान करतो.
शेतकऱ्यांची मागणी
प्रशिक्षित हत्ती तज्ज्ञ घेऊन ओंकार हत्तीला सुरक्षितरीत्या नियोजित ठिकाणी सोडण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी भीतीमुळे स्वतःच्या शेतात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तज्ज्ञांच्या हस्तक्षेपाशिवाय परिस्थिती नियंत्रणात आणता येणार नाही, असे शेतकरी म्हणत आहेत.

हेही वाचा