संशयिताविरोधात गुन्हा दाखल
मडगाव : मालमत्तेच्या वादातून मोड्डी नावेलीतील रहिवासी देवेंद्र कुमार प्रसाद यांच्यासह त्यांचा मोठा मुलगा सचिन कुमार प्रसाद यांना लहान भावानेच मारहाण केली. याप्रकरणी तक्रारदाराच्या मुलावर मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
नावेलीतील मोड्डी येथील देवेंद्र कुमार प्रसाद यांनी मडगाव पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. त्यानुसार, १३ सप्टेंबर रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोड्डी नावेली येथील शनिमंदिरानजीकच्या तक्रारदाराच्या घरात संशयित मुलगा व त्याची पत्नी विनीता यांनी बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. घरातील वस्तू सहमतीशिवाय हलवल्या. त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता, संशयितांनी देवेंद्र कुमार प्रसाद व त्यांचा मोठा मुलगा सचिन कुमार प्रसाद यांना मारहाण केली. मारहाणीचा प्रकार मालमत्तेच्या वादातून झाल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
मडगाव पोलिसांनी तक्रारदाराच्या संशयित मुलावर घरात बेकायदेशीररीत्या प्रवेश करणे, जाणूनबुजून अवमान करणे व जखमी करणे अशा कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर पुढील तपास करीत आहेत.