बिटस् पिलानीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची मते घेणार जाणून!

विद्यार्थी मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13 hours ago
बिटस् पिलानीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची मते घेणार जाणून!

मडगाव : बिटस् पिलानी कॅम्पसमध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दक्षिण गोवा जिल्हा समितीने शैक्षणिक संस्थेच्या सदस्यांसह विद्यार्थी प्रतिनिधी व समुपदेशकांशी चर्चा केली. आता मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक व कॅम्पसमधील विद्यार्थी यांच्याशी चर्चा करुन त्यांची निरीक्षणे जाणून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी दिली.

बिटस् पिलानी कॅम्पसमधील विद्यार्थी मृत्यूप्रकरणी जिल्हाधिकारी क्लिटस यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दक्षिण गोवा जिल्हा समितीची स्थापना केली आहे. समितीच्या बैठका वेळोवेळी घेण्यात येत असून आढावा घेतला जात आहे. समितीकडून चौकशी केली जात आहे. त्यानुसार, दोन आठवड्यांपूर्वी बिट्स पिलानी कॅम्पसला भेट देत डीनसह विद्यार्थी प्रतिनिधी व शैक्षणिक समितीतील सदस्यांशी चर्चा केली. मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी तयार केलेल्या पथकातील समुपदेशक व इतर सदस्यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाकडून यावर्षी जुलै महिन्यात जे काही निर्देश दिलेले आहेत, त्यानुसार प्रश्न विचारण्यात आले. कॅम्पसमधील समुपदेशकांशी चर्चा करुन कॅम्पसमधील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी उपाययोजना करणे, समुपदेशनासह इतर सोयी वाढवण्यावर भर दिला आहे. समितीला दिलेल्या प्रश्नांनुसार आवश्यक माहिती मिळाल्यानंतर समितीकडून अहवाल सादर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी क्लिटस यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या चिंतेचे कारण जाणून घेण्याचे प्रयत्न

समितीकडून छोटे गट तयार करून कॅम्पसमध्ये माहिती घेतली जात आहे. प्राथमिक चौकशीत विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेतून मृत्यू झालेले तीन विद्यार्थी हे तणावाखाली होते, असे दिसून आले आहे. आता त्यांच्यावर पालकांचा, शैक्षणिक अभ्यासक्रमाचा दबाव की अन्य काही कारणे होती, हे जाणून घेतले जात आहे. पालक व विद्यार्थ्यांशी आणखी संवाद साधत माहिती घेण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी सांगितले.