सहा चाकी, अवजड वाहनांना मार्ग मोकळा
मडगाव : अनमोड घाटातील रस्ता खचल्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व प्रकारची वाहतूक बंद केली होती. मात्र, सर्वसामान्यांना होणार्या त्रासाची दखल घेत दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी शुद्धीपत्रक जारी करत आता अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, सहा चाकी वाहतुकीसह अवजड वाहनांना परवानगी दिली आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अंमलबजावणी विभागाला सहा चाकी वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती दुरुस्तीची कामे करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्ता अवजड वाहनांसाठी बंद झाल्यामुळे सर्वसामान्य जनता आणि मालवाहतूक करणार्यांना गैरसोय होत होती, ती आता कमी होईल. अनमोड घाटातील भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या सुरक्षिततेच्या कारणास्तव यापूर्वी अनमोड घाटावर दोन्ही बाजूंनी सर्व जड व्यावसायिक वाहनांची वाहतूक प्रतिबंधित केली होती. याच आदेशाला अनुसरुन दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांकडून अनमोड घाट मार्गावर सहा चाकी वाहतूक वाहनांच्या वाहतुकीला परवानगी देणारे शुद्धीपत्रक १२ रोजी जारी करण्यात आले होते. यानंतर अखिल भारतीय वाहतूक संघटना व दक्षिण गोवा वाहतूक संघटनेने अवजड वाहनांना जास्त अंतर कापावे लागते, इंधन व इतर खर्च वाढतो असे सांगत परवानगी देण्याची विनंती केली होती. अन्यथा वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला होता. आता दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी पुन्हा मागील आदेशाचे शुद्धीपत्रक काढत यात सुधारणा केली असून आता अत्यावश्यक सेवा वाहने, प्रवासी बस, सहाचाकी वाहनांसह अवजड वाहनांनाही वाहतुकीची परवानगी देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे.