विरोधी पक्षाच्या आमदारांकडून सरकारवर टीका : प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांकडून गुंडगिरी : भाजप
पणजी : समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणावर आंदोलन पेटले असून, त्याची शुक्रवारी झळ राजकीय पातळीवरही जाणवली. पणजीत आंदोलक व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रास्तारोको केले. दरम्यान, आंदोलक आणि आमदार यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. आंदोलकांची भाजप कार्यालयावर चाल तसेच विराेधी आमदारांकडून सरकारवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आंदालनामुळे झालेल्या वाहतूककोंडीचा फटका नागरिकांना बसला.
चर्च स्क्वेअरवरून आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जात असताना, व्हेंन्झी व्हिएगस यांनी ईव्ही कदंबा बस थांबवली आणि चालकाला बस मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे नेण्यास सांगितले. त्यानंतर विजय सरदेसाई बसमध्ये चढले आणि बस मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे नेण्याचा आग्रह धरू लागले. पण आंदोलक हे पाहून नाराज झाले. जर आमदार बसने जात असतील तर सामान्य लोकांनी पायी का जावे, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी आमदारांना आपल्यासोबत चालण्याची विनंतीही केली. यावेळी विजय सरदेसाई, व्हेंझी व्हिएगस यांची आंदोलकांशी शाब्दिक बाचाबाची झाली.
भाजप कार्यालयावर निशाणा
मुख्यमंत्री निवासस्थानाकडे जात असताना आंदोलकांनी भाजपचे आल्तिनो येथील कार्यालयाला लक्ष्य केले. भाजपने यावर तीव्र आक्षेप नोंदवत म्हटले की, मुठभर कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी हिंसा व गुंडगिरीचा मार्ग अवलंबला. आंदोलन करायचे असल्यास प्रतिष्ठेने करावे. निवडणुकीत भाजपने विरोधकांना त्यांची योग्य जागा दाखवून दिलेली आहे. हे त्यांनी विसरू नये.
विरोधी पक्षाच्या आमदारांच्या प्रतिक्रिया
गुन्हेगारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा. राजकीय-गुन्हेगारी संबंधांची चौकशी करण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन व्हावी. रामा काणकोणकर आणि त्यांच्या कुटुंबाला २४ तास पोलीस संरक्षण द्यावे. दोषींना जर रविवार संध्याकाळपर्यंत अटक झाली नाही, तर आमचे आंदोलन वेगळ्या पद्धतीने चालू राहील.
- विजय सरदेसाई, आमदार, फातोर्डा
गुन्हेगारांना कठोर अटींवरच जामीन देण्यात यावा. कारागृहातून सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करू नयेत, अशी अट घालावी. आरोपपत्र तयार होईपर्यंत आम्ही सतत लक्ष ठेवणार आहोत. समाजात भीती निर्माण करणाऱ्यांना गोव्यात थारा नाही.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
गोव्यात यूपी-बिहारसारखे दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत आणि त्यावर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले. हल्ल्यांचे व्हिडिओ मास्टरमाइंडकडे पाठवले जात आहेत, मात्र अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. दोन दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. ते त्यांनी पूर्ण करून दाखवावे.
- वीरेश बोरकर, आमदार, सांतआंद्रे
गुन्ह्यांच्या मागे असलेले मास्टरमाइंड योग्य शिक्षा व्हायला हवी. प्रत्येक वेळी आश्वासन दिले जाते, पण कारवाई होत नाही. सरकार फक्त क्रिकेटसारखी खेळी खेळत आहे. गोवावासी मात्र पहिल्या चेंडूवर बाद होणाऱ्या फलंदाजासारखे बळी ठरत आहेत.
- व्हेंझी व्हिएगस, आमदार, बाणावली
हल्ल्याचा उद्देश शोधण्यासाठी तपास सुरू : पोलीस महासंचालक
समाज कार्यकर्ते रामा काणकोणकार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पोलिसांकडून सखोल आणि योग्य दिशेने तपास सुरू आहे. या हल्ल्यामागचा उद्देश नेमका काय होता, हे शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली. हल्ल्यानंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करून पहिल्या रात्री पाच जणांना अटक केली. त्यानंतर शुक्रवारी रात्री आणखी दोन जणांना अटक करण्यात आली. हल्ला का झाला आणि हल्लेखोरांचा हेतू नेमका काय होता, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. हा तपास शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही कुमार यांनी सांगितले.